बाईला ‘डाकीण’ ठरवून चटके दिले जातात, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:37 AM2022-04-29T06:37:10+5:302022-04-29T06:37:21+5:30

एखादी स्त्री डाकीण असते, माणसं-प्राण्यांचा जीव घेते, पिकपेरा कमी करते, गाई-म्हशीचे दूध आटवते यावर आजही लोकांचा विश्वास बसतो, याला काय म्हणावे?

When a woman is given a click by declaring her a 'witch' | बाईला ‘डाकीण’ ठरवून चटके दिले जातात, तेव्हा...

बाईला ‘डाकीण’ ठरवून चटके दिले जातात, तेव्हा...

googlenewsNext

विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्ह्यातील सर्व प्रमुख, संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पूर्ण एका दिवसाची परिषद, त्या परिषदेत डाकीण प्रश्नावर सखोल चर्चा आणि प्रबोधन झालेले, प्रत्येक गावात असलेल्या पोलीस पाटलांचे प्रशिक्षण झालेले, प्रत्येक गावात असलेल्या अंगणवाडी सेविका, पाडा सेवक, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी या सगळ्यांचे प्रशिक्षण झालेले, पोलीस पाटलांची तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘डाकीण प्रथाविरोधी संकल्प परिषद’ पार पडलेली, गावागावात प्रबोधनासाठी काढलेल्या अक्काराणी ते याहामोगी संवाद यात्रा, डाकीण ठरवत असलेल्या होऱ्यापाणीच्या चंपालाल महाराजाचा भांडाफोड, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पाड्यापाड्यावर प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्यक्रम, कितीतरी डाकीण पीडित महिलांना समोर आणून त्यांच्या व्यथा समाजासमोर आणल्या, त्याच्यावर एक पुस्तक; ज्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ‌्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला, सर्व अधिकारी, राजकीय पुढारी यांच्याशी संवाद, त्यांच्या सहभागाने अनेक कार्यक्रम... इतका विविधांगी प्रयत्न कदाचितच कोणी एखाद्या विषयावर सातत्याने केला असेल; पण तरीही डाकिणीचा प्रश्न आपली क्रूरता जराही कमी करायला तयार नाही.

गेल्या आठवड्यात एका तरुण महिलेला निर्वस्त्र करून, ‘तू कोणाकोणाला खाल्लं? अजून कोण तुझ्यासोबत आहे? त्यांची नावं सांग’, अशी विचारणा करीत तिला चटके देऊन छळ केला जात असतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला.  कार्यकर्ते, प्रशासन, पत्रकार सगळ्यांनाच हादरवून टाकणाऱ्या या व्हिडिओने डाकीण प्रश्नाचे आव्हान किती भयंकर आहे, याची परत जाणीव करून दिली.
२१ व्या शतकात ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणतो, अशा युगात आजही, ‘एखादी स्त्री डाकीण असते. ती माणसांना खाते, मारून टाकते, प्राण्यांचा जीव घेते, पीकपेरा कमी करते, गाई-म्हशीचे दूध आटवते, अपघात घडवते, आजारी पाडते, जंगली प्राण्यांच्या रूपाने हल्ला करते’ असे भ्रम घेऊन जगणारी माणसे आहेत. या अघोरी अंधश्रद्धेतून कितीतरी महिलांना डाकीण ठरवून मारहाण करणे, गावातून हाकलून देणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नग्न करून तिचा छळ करणे आणि प्रसंगी तिचा खूनच करणे हे सारे काही आजही घडत आहे.

शिक्षण क्षेत्राने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, भारताच्या संविधानाने कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवायला आपण सारेच कमी पडलो. मोबाइलचा डाटा पोहोचला, रस्ते पोहोचले, योजना पोहोचल्या, विजेचे खांब पोहोचले, सौरदिवे पोहोचले, आदिवासी पाडे प्रकाशमय झाले, पण मनातील अंधश्रद्धांचा अंधकार दूर करण्यासाठी विवेकाच्या प्रकाशाची साधी एक तिरीपही तिथे पोहोचली नाही... हे सारे मन विषन्न करणार आहे. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणून म्हणत होते, ‘ही शतकांची लढाई आहे, ती अधिक निकराने लढावी लागणार आहे.’ - ही लढाई केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लढून भागणार नाही तर येथील राजकीय पुढारी, प्रशासन, शिक्षण संस्था, माध्यमे, विविध संस्था, संघटना या सर्वांनी मिळून लढायची आहे. पोलीस प्रशासनाची जबाबदारी यात  मोठी आहे. पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्यांचा सर्व गावांची थेट संबंध येतो. जादूटोणाविरोधी कायद्याचा धाकदेखील पाड्यापाड्यावर पोहोचण्याची गरज आहे.

मंत्रतंत्र, जादूटोणा जगात  अस्तित्वात नाही. कोणत्याही घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाचे पायाभूत तत्त्व पोहोचण्यासाठी सर्व माध्यमांना पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जमेल ती भूमिका पार पाडायला हवी. ज्याला याविरोधात बोलणे शक्य त्याने बोलावे, ज्याला संघटित कामात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संघटनेत सहभागी व्हावे, एखाद्याने पीडित महिलेला मदत करावी, एखाद्याने याबाबत लिहावे...  अशा सगळ्या मार्गांनी सगळ्यांनी कृतिशील राहूया..

vinayak.savale123@gmail.com

 

Web Title: When a woman is given a click by declaring her a 'witch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.