सावधान; खवळलेला समुद्र, प्रचंड लाटा वरचेवर दिसणार; वादळं धडकत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:27 AM2020-06-04T05:27:49+5:302020-06-04T06:31:17+5:30

‘अम्फान’पाठोपाठ भारतीय किनाऱ्यावर धडकलेल्या ‘निसर्ग’ वादळाने केवळ किनारपट्टीलाच नव्हे, तर संपूर्ण देशालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळांचे आगमन आणि त्यांच्या संहारक क्षमतेतली वाढ आता वरचेवर अनुभवावी लागेल.

When cyclones are common ... | सावधान; खवळलेला समुद्र, प्रचंड लाटा वरचेवर दिसणार; वादळं धडकत राहणार

सावधान; खवळलेला समुद्र, प्रचंड लाटा वरचेवर दिसणार; वादळं धडकत राहणार

googlenewsNext

पाबूक, फणी, वायू, हिक्का, क्यार, महा, बुलबुल आणि पवन! ही नावे आहेत जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभराच्या काळात भारतीय किनाºयावर धडकलेल्या वादळांची. बारा महिन्यांत तब्बल आठ वादळांचा सामना भारताने याआधी १९७६ मध्ये केला होता. यंदाचे पहिले चार महिने किनारपट्टीला किंचित उसंत मिळाली; पण मे महिन्याच्या मध्यावर आलेल्या अम्फान वादळाने ओडिशाला आणि पश्चिम बंगालसह बांगलादेशाला झोडपून काढले. त्या वादळाने विस्कळीत केलेले जनजीवन स्थिरावतेय, तोपर्यंत अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ वादळाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धडक  दिलीय.

एरवी मान्सूननंतर भारतीय उपखंडात एक-दोन वादळे निर्माण व्हायची. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या तर वाढलीच, शिवाय मान्सूनपूर्व काळातही वादळांची निर्मिती होते आहे. दोन वादळांमधला कालावधी कमी होतो आहे आणि वादळांची संहारक क्षमताही वाढत चालली आहे. १३ मे रोजी श्रीलंकेजवळ समुद्रात तयार झालेले अम्फान वादळ १६६ कि.मी. प्रतितास इतक्या जोराने वाहणारे वारे घेऊन किनाºयावर धडकेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने देत त्याला दुसºया श्रेणीचे वादळ म्हणून घोषित केले होते. ही घटना १६ मे रोजीची. मात्र, १८ मे ची सकाळ उजाडताना वाºयाचा वेग २४० कि.मी.वर जात अम्फानचे महावादळात परिवर्तन झाले होते. अवघ्या २४ तासांत ही किमया घडली. वादळ ही नैसर्गिक उत्पत्ती असली तरी त्यांच्या निर्मितीतले सातत्य आणि त्यांच्या हिंसक क्षमतेत झालेली वाढ ही गेल्या चार-पाच दशकांतली अनुभूती आहे. भारतीय समुद्राचे गतीने वाढणारे तापमान या वादळांच्या तीव्रतेमागचे प्रमुख कारण असून, भविष्यात देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांना धडकणाºया वादळांची संख्या वाढतच जाईल, असे इशारे तज्ज्ञ देताहेत. समुद्रसपाटीवरले तापमान वाढले की वादळाची संहारक क्षमताही वाढते आणि मुसळधार पाऊस पडतो. त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे वादळाला अंतर्भागापर्यंत जात आपला इंगा दाखवायची शक्ती आणि गती प्राप्त होते. वातावरण बदलामुळे घनघोर वादळांचा सामना आपल्याला नित्यनेमाने करावा लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्गामुळे निर्माण झालेली ९० टक्के उष्णता समुद्र शोषून घेत असतो. समुद्राच्या पोटातली ही उष्णता वादळांच्या रूपाने जमिनीच्या भेटीला येत असते. यापुढे आपल्याला खवळलेला समुद्र, प्रचंड संहारक लाटा यांचे दर्शन वरचेवर घडणार आहे.

किनारपट्टीच्या आश्रयाने राहणाºयांना वित्तहानी आणि मनुष्यहानीचा अनुभव नियमितपणे येत राहील. अम्फान वादळाने केलेले नुकसान १३ अब्ज रुपयांच्या घरात गेले. किनारपट्टीतील उद्यमालाही वादळांच्या सातत्याने धोक्याचा इशारा दिलेला आहे. वादळी वारे, समुद्राच्या पातळीतली वाढ आणि अथक पावसाला जोड मिळते ती किनारपट्टीतील अनियोजित भूविकासाची. पाण्याचा निचरा, सखल आणि पाणथळ भागांचे महत्त्व याविषयी अनभिज्ञ असलेल्या घटकांकडून उभी केलेली बांधकामे वादळानंतरच्या संकटांची निर्मिती करतात. समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरते. गगनचुंबी इमारतींना त्याचा विशेष त्रास होत नाही; पण या इमारतींच्या भरवशावर उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांना आणि मध्यमवर्गाच्या वस्त्यांना ते उद्ध्वस्त करते.

वादळाच्या धडकण्याला समुद्रभरतीची साथ मिळाली, तर संहाराची व्याप्ती प्रचंड वाढते. सखल भाग आणि कांदळवनांवरले आक्रमण याच्या मुळाशी असल्याचे तज्ज्ञ गेली अनेक वर्षे घसे खरवडून सांगत असले, तरी त्यांचे इशारे पुराचे पाणी ओसरल्याबरोबर विस्मृतीत ढकलले जातात. निसर्गनियमांकडे सातत्याने दुर्लक्ष करून उभा राहिलेल्या भौतिक विकासाने आज मुंबई, कोलकातासारख्या शहरांबरोबरच किनारपट्टीतल्या जनजीवनासमोर अस्तित्वाचे संकट निर्माण केले आहे. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या जागतिक पर्यावरण दिनाला भपकेबाज कार्यक्रमांसह साजरा करणे तूर्त शक्य नाही. मात्र, आजवर केलेल्या चुकांची उजळणी करून त्यांची पुनरावृत्ती टाळण्याची शपथ घेतली, तर पर्यावरण दिन सुयोग्यरीत्या साजरा होईल.

 

Web Title: When cyclones are common ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.