गर्दीतील विकृतपणा थांबणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:46 AM2017-10-08T02:46:03+5:302017-10-08T02:46:20+5:30
मुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात.
- अमर मोहिते
मुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात. त्यातून महिलांची होणारी कुंचबणा आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे. महिला, मुलींना रेल्वे प्रवास, रेल्वे स्थानके व रेल्वे पुलांवरील गर्दीत होणारे वाईट स्पर्श हा विषय काही नवीन नाही़ अनेक वेळा अशा स्पर्शांबाबत बोलले जाते, चर्चाही होते़ घरात नसली, तरी मित्र-मैत्रिणींशी हे विषय हमखास शेअर होतात. हा विकृतपणा थांबण्याची गरज आहे.
मुंबईत सर्वच रेल्वे पूल निमुळते आहेत़ या पुलांवर कार्यालयीन वेळेत चालणे म्हणजे महिला, मुलींसाठी दिव्यच असते़ आॅफिस, शाळा, कॉलेजला जाण्याच्या घाईमुळे गर्दीत मार्ग काढत महिला, मुली ये-जा करत असतात़ या मार्गात गैरफायदा घेणारे अनेक जण तग धरून उभे असतात़ बहुतांश वेळा वाईट स्पर्शाचा अनुभव येऊनही महिला, मुलींना प्रतिकार करायलाही वेळ नसतो़ असे स्पर्श होत असताना त्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेणारे प्रवासीही आहेत. गर्दीत होणारा स्पर्श सांगणे व सिद्ध करणे हेही तसे किचकट काम आहे़
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवरील घटनेनंतर मुंबईतील गर्दीवर पुन्हा नव्याने विचारमंथन सुरू झाले आहे. गर्दी किती घातक ठरू शकते, याचा भयानक अनुभव मुंबईकरांनी या निमित्ताने घेतला आहे. गर्दीत महिला, मुलींना येणाºया वाईट अनुभवांवर सर्वांचेच तूर्त तरी मौनच आहे़ रेल्वे पुलावर असणा-या गर्दीत महिला, मुलींना सांगता न येणासारखे अनुभव येतात़ गर्दीचा फायदा घेत महिला, मुलींना कोठेही व कसाही स्पर्श करण्याची मजल अनेकांची जाते. काही धाडसी महिला, मुली याला सडेतोड उत्तर देत विरोधही करतात़ हे अनुभव काही नवीन नाहीत़, पण अशी कृत्ये थांबत नाहीत़ अशा अनुभवांना कसे उत्तर द्यावे किंवा त्याचा प्रतिकार कसा करावा, यासाठी ठोस अशी पावले अजूनही प्रभावीपणे उचलली गेलेली नाहीत़
कायद्यामध्ये विनयभंगाच्या व्याख्येत काही कृत्ये शिक्षेस पात्र आहेत़ महिलेकडे एकटक बघणे, तिच्यासमोर आक्षेपार्ह हावभाव करणे, ही कृत्य शिक्षेस पात्र आहेत़़ ही कृत्ये सबळ पुराव्याने सिद्ध करावी लागतात़ मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध हात पकडणेही गुन्हाच आहे़ या कायदेशीर बाबीत महिला, मुलीने पुढे येऊन गर्दीत होणाºया वाईट अनुभवांची पोलिसांत तक्रार केली, अशा आरोपीला शिक्षा झाली, असे तूर्त तरी एकही उदाहरण नाही़ रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांची संख्या अधिक असते़ रेल्वे अपघतातील मृतदेह उचलण्यासाठी गर्दुल्ल्यांचा वापर केला जातो़ हेच गर्दुल्ले महिलांवर सर्रास हल्ला करतात़ महिला प्रवाशांवर हल्ला झाल्याच्या घटनाही वारंवार घडतच असतात़ तरीही त्यावर ठोस तोडगा काढला गेला नाही़ काही दिवसांपूर्वी चर्चगेट स्थानकावर एका मुलीचा विनयभंग झाला़ तरुणाने अगदी सहजपणे पीडितेजवळ जाऊन विनयभंग केला़ सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे ही घटना उघडकीस आली़ अशी गंभीर घटना घडल्यानंतरही प्रवासात महिलांना येणाºया वाईट अनुभवांसाठी ठोस उपाययोजना करायला हवी, असे रेल्वे प्रशासनाला वाटत नाही़ सामाजिक संघटना किंवा अन्य कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला याविषयी प्रबोधन अथवा ठोस कार्यक्रम आखावा, असे सूचले नाही़ एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर गर्दी आणि चेंगराचेंगरीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे़ या निमित्ताने तरी महिला, मुलींना होणारे वाईट स्पर्श रोखण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या ठोस असे काही केले जाईल, अशी अपेक्षा करू या!