देवेंद्रभाऊंचा मेसेज जीव वाचवतो तेव्हा...
By राजा माने | Published: April 2, 2018 12:16 AM2018-04-02T00:16:49+5:302018-04-02T00:16:49+5:30
आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी यावेळी कुठलीही असाईन्मेंट न देता केवळ इंद्रदेवांचा एक खलिता देवेंद्रभाऊंना देण्याची जबाबदारी सोपविली. बंद खलिता हाती पडल्यानंतर त्यात नक्की कोणता संदेश असेल, याविषयीची त्याची उत्सुकता ताणली गेली.
आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी यावेळी कुठलीही असाईन्मेंट न देता केवळ इंद्रदेवांचा एक खलिता देवेंद्रभाऊंना देण्याची जबाबदारी सोपविली. बंद खलिता हाती पडल्यानंतर त्यात नक्की कोणता संदेश असेल, याविषयीची त्याची उत्सुकता ताणली गेली. मुंबापुरीतील ‘वर्षा’ महालाकडे तो निघाला असतानाच, नारदांचा फोन त्याला आला. तो फोन म्हणजे खलित्यात काय दडले आहे, हे जाणण्याची संधी, म्हणूनच त्याने नारदांचा फोन घेतला आणि बोलू लागला...
यमके : प्रणाम... गुरुदेव! देवेंद्रभाऊंच्या खलित्यात काय दडले आहे?
नारद : तूच अंदाज बांधून मला सांग.
यमके : मंत्रिमंडळ विस्ताराचा ‘मुहूर्त पेपर’ फोडण्याविषयी असेल, निलंग्याच्या संभाजीराजांना दिलेल्या क्लीन चिटबद्दल असेल किंवा मग, ‘मातोश्री मनोमिलनाबद्दल’ असेल...
नारद : शिळ्या बातम्या सांगण्याची तुझी सवय काही जाणार नाही. आता तुला एक ‘क्लू’ देतो... ‘सोलापूर’!
यमके : आलं लक्षात! २०१४ सालानंतर मराठी भूमीत बळीराजाच्या आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढल्याचे शरदराव बोलले, तेच ना?
नारद : परत चुकतो आहेस शिष्या...
यमके : (हातातील मोबाईलने डोके खाजवत) हं... साखरेचा भाव २८०० रुपये आणि शेतातल्या ऊसतोडणीपासून साखर पोत्यात भरेपर्यंतचा खर्च ३२०० रुपये या गणिताबद्दलच ना!
नारद : अरे, मनमोहनसिंगांनी केलेल्या ७१ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून ते थेट देवेंद्रभाऊ-सुभाषबापूंनी मराठी भूमीत गाजविलेल्या डिजिटल कर्जमाफीपर्यंतचे सर्व विषय आता जुने झाले आहेत, हे तुला कळत कसे नाही?
यमके : मग, आता देवेंद्रभाऊंनी असे काय केले आहे की, ज्यामुळे त्यांना इंद्रदरबारात पाचारण न करता फक्त खलिताच पाठविला जातोय?
नारद : अरे, रेशीमबाग आणि खुद्द सरसंघचालक सोशल मीडियाबद्दल नाराजी व्यक्त करतात. ‘मी, मला आणि माझे’ या आत्मकेंद्री मनोवृत्तीत सोशल मीडिया माणसाला गुरफटून टाकतो, असे ते सांगत असताना देवेंद्रभाऊ मात्र वॉर रूम, महामित्र आणि डिजिटल विश्वाशी असलेले आपले नाते घट्ट करताना दिसतात. तेही त्याच्या वापराने लोकहित कसे साधले जाते, हे आपल्या कृतीने सिद्ध करतात...
यमके : महागुरू...मला अजूनही आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे, ते समजेना. कृपया, या खलित्यात काय दडले आहे, ते सांगा.
नारद : ऐक शिष्या... सरत्या सप्ताहात सोलापूर नगरीतून एका पीडित महिलेने पोटगी मिळण्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळल्याचा ‘एसएमएस’ देवेंद्रभाऊंना पाठविला होता. त्यात आपल्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास उद्या सकाळी आपण आत्महत्या करणार असल्याचे त्या भगिनीने नमूद केले होते. मेसेज पाहताच संवेदनशील देवेंद्रभाऊ अस्वस्थ झाले. तातडीने त्यांनी आपला दरबार गतिमान केला. त्या भगिनीकडे दूत पाठविले. तिची समजूत काढून पोटगी मिळवून देण्याचे अभिवचन दिले. अखेर तिने आत्महत्येचा निर्णय रद्द केला. तिचा जीव वाचविला म्हणून इंद्रदेवांनी देवेंद्रभाऊंचे अभिनंदन करणारा खलिता पाठविला आहे.
यमके : बळीराजाला तशी संधी ते कधी देणार?