शहाण्यासुरत्या लोकांच्या डोक्यात हे भोंदूबाबा कधी घुसले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:57 AM2022-02-28T07:57:58+5:302022-02-28T07:58:46+5:30

अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होत असत, आता त्या हव्यासातूनदेखील निर्माण होत आहेत. सुशिक्षित लोकांमधील या अंधश्रद्धा येत्या काळात मोठे आव्हान असेल!

when did this bhondu baba get into the heads of wise people | शहाण्यासुरत्या लोकांच्या डोक्यात हे भोंदूबाबा कधी घुसले?

शहाण्यासुरत्या लोकांच्या डोक्यात हे भोंदूबाबा कधी घुसले?

googlenewsNext

- हमीद दाभोलकर

राष्ट्रीय शेअर बाजार यासारख्या देशाच्या आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्थेमधील मुख्य अधिकारी या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रह्मण्यम यांचे अनेक कारनामे गेल्या काही दिवसांत आपल्या समोर आले आहेत. त्यामधील आर्थिक घोटाळे तर गंभीर आहेतच; पण दैनंदिन काम पाहण्यासाठी आध्यात्मिक गुरुच्या नावाखाली भोंदूबाबाचा सल्ला घेणे हीदेखील अत्यंत शरमेची बाब आहे. शेअर बाजारातील को-लोकेशन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सेबीच्या समोर दिलेल्या जबाबात चित्रा  रामकृष्ण यांनी आपण आनंद सुब्रह्मण्यम यांची नेमणूक आणि इतर बाबींमध्ये आपल्या हिमालयातील आध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत होतो असे नमूद केले आहे. या गुरूचा ठावठिकाणा विचारला असता, ‘त्यांना मानवी देह नाही’ असे अतींद्रिय शक्तीचा दावा करणारे उत्तर दिले. चित्रा रामकृष्ण यांच्या मते प्रत्यक्षात देहाने अस्तित्वात नसलेला आणि हिमालयात राहणारा हा बाबा त्यांना ई-मेलने संपर्क करत असे ! ऐकावे ते नवलच! 

एक तर चित्रा रामकृष्ण यांना कोणा भोंदूबाबाने  फसवले आहे किंवा त्या आणि त्यांचे सहकारी या हिमालयातील बाबाच्या नावावर आपल्या सर्वांना फसवत आहेत. चित्रा रामकृष्ण या गोष्टीवर विश्वास ठेवत असतील ही शक्यता अजिबातच अशक्य कोटीतील आहे असे नाही. ज्या देशात राफेल विमानाला संरक्षणमंत्री लिंबू-मिरची बांधतात किंवा  पंतप्रधानाच्या पदावरची व्यक्ती चंद्रास्वामीसारख्या तांत्रिकाचा सल्ला घेते, तेथे  काहीही अशक्य नाही. 

आपण आपल्या खासगी आयुष्यात कशावर विश्वास ठेवावा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण  देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्त्वाचे कार्यालयीन निर्णय हे भोंदूबाबांच्या सल्ल्याने घेणे हे मात्र सर्व जनतेची घोर फसवणूक आहे. प्रत्यक्षात शरीराच्या शिवाय माणसाचे अस्तित्व शक्य नाही हे साधेसुधे वैज्ञानिक सत्य असले तरी आपल्या देशात आत्मा, अतींद्रिय शक्ती, योगिक ताकद अशा  वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींच्या अस्तित्वावर विश्वास  असलेल्या लोकांची काही कमी नाही. या अशास्त्रीय गोष्टींवर सुशिक्षित आणि उच्चपदस्थ लोक देखील विश्वास ठेवतात, हे माहीत असल्यानेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे दावे केले जातात.  

आश्वासक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजाराचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे आणि महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अतींद्रिय शक्तींचा दावा करून लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील महाराष्ट्र अंनिसने केली आहे. प्रत्यक्षात  अशा स्वरूपाचे दावे करणे आणि थेट लोकांच्या हिताशी संबंधित गोष्टीमध्ये असे सल्ले घेणे यामध्ये गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होणे हे कधी होईल हे आपल्याला माहीत नाही पण यामध्ये शिकण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे केवळ शिक्षण आणि डिग्री मिळाली म्हणून चिकित्सक मनोवृत्ती तयार होत नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत त्याप्रमाणे, ‘आपण केवळ विज्ञानाची सृष्टी घेतली आणि पण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही.’ हे टाळायचे असेल तर शालेय वयापासून वैज्ञानिक दृष्टिकोन आयुष्यात कसा बाणवला पाहिजे याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने त्याची वैयक्तिक धारणा म्हणून काय मानावे किंवा मानू नये हा त्याचा खासगी प्रश्न असू शकतो पण आपल्या कामासंबंधी निर्णय घेताना वैयक्तिक धार्मिक धारणा बाजूला ठेवायला शिकणे आवश्यक आहे. अधिक-अधिक गोष्टी मिळण्याच्या हव्यासाला मानवी मनाला उद्युक्त करणारी जीवनशैली, त्यामधून निर्माण होणारी अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा हे एक दुष्टचक्र आहे.  अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होतात तसेच हव्यासातून देखील अंधश्रद्धा निर्माण होत आहेत. सुशिक्षित लोकांमधील या अंधश्रद्धा येत्या काळातील एक महत्त्वाचे आव्हान असेल. त्याला सामोरे जाण्याची तयारी आपल्या सर्वांना करावी लागणार आहे. 
hamid.dabholkar@gmail.com
 

Web Title: when did this bhondu baba get into the heads of wise people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.