लुंगी नेसून किचनमध्ये गेले की 'महाद्या' बनवूनच बाहेर यायचे...; 'गिरीश भाऊं'ची आगळीवेगळी मैफल
By अतुल कुलकर्णी | Published: March 29, 2023 04:41 PM2023-03-29T16:41:04+5:302023-03-29T16:41:59+5:30
आर. आर. पाटलांची फिरकी घेण्यात गिरीश भाऊंना खूप मजा वाटायची. आर. आर. देखील बोलायला भारी. त्या दोघांच्या गप्पा ऐकणे ही एक पर्वणी असायची...
- अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई
गिरीश बापट अत्यंत अवलिया व्यक्तिमत्व होते. मित्र जमवणे, त्यांच्यासाठी खाण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणे, आणि गप्पांची मैफल सजवणे हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि आनंद देणारा कार्यक्रम असायचा. दिवसभर मंत्रालयातील काम आटोपले की रात्री मॅजेस्टिकवर या असा निरोप यायचा. त्यात सर्वपक्षीय नेते असायचे. आम्ही काही पत्रकारही असायचो. आम्ही जमायच्या आधीच गिरीशभाऊंची लगबग सुरू असायची. हिरवेगार मटार सोलण्यापासून ते कांदा विशिष्ट पद्धतीने कापला पाहिजे, अमुक मसाले असले पाहिजेत... याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. एखाद्या सुगरण गृहिणीला देखील लाजवेल इतकी जय्यत तयारी ते करायचे. सगळ्या गोष्टी त्यांना विशिष्ट पद्धतीने हव्या असायच्या. महाद्या हा त्यांच्या अत्यंत आवडीचा पदार्थ. तो खाण्यासाठी ते सगळ्यांना बोलवायचे. कधी आर. आर. पाटील असायचे... कधी देवेंद्र फडणवीस असायचे... वेगवेगळ्या पक्षाचे नेते भाऊंच्या मॅजेस्टिक मधल्या खोलीत खाली जमिनीवर मांड्या घालून मैफल सजवायचे. गप्पा रंगायच्या... एक से बढकर एक जोक्स, किस्से सांगून गिरीश भाऊ सगळी मैफल स्वतःच्या ताब्यात ठेवायचे. सर्वपक्षीय नेते त्या मैफलित असले तरी मोहन जोशी त्यात कॉमन असायचे. आम्ही गिरीश भाऊंना चिडवायचो. तुम्ही भाजप मधले काँग्रेसी आहात... तेव्हा मोहन जोशी हसत हसत म्हणायचे, आमच्यातला कोणीतरी एक जण भाजपमध्ये असावा की नको... आणि मग हास्य विनोद रंगायचा... आर. आर. पाटलांची फिरकी घेण्यात गिरीश भाऊंना खूप मजा वाटायची. आर. आर. देखील बोलायला भारी. त्या दोघांच्या गप्पा ऐकणे ही एक पर्वणी असायची...
भाजपचे सरकार आले तेव्हा ते अन्न व औषधी प्रशासन विभागाचे मंत्री बनले. मंत्री झाल्यानंतर अनेक नेते रात्रीतून बदलताना पाहिले आहेत. मात्र गिरीश भाऊ कधीही बदलले नाहीत. आमदार असताना ते जसे वागायचे, तसेच मंत्री असतानाही वागले. मंत्री असताना त्यांना वेळ कमी मिळायचा. तरीही आवर्जून ते बंगल्यावर बोलवायचे. ज्ञानेश्वरी बंगल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरांचा अतिशय भव्य फोटो लावला होता. त्याच्या समोर खुर्ची ठेवून ते बसायचे. मी त्यांना गमतीने म्हणायचो, तुमच्या मागे ज्ञानेश्वर माऊलींचे वलय दिसत आहे... तेव्हा ते म्हणायचे, आपली कुठे तेवढी लायकी... एवढा मोठा फोटो केलाय... कारण ज्ञानेश्वरांच्या पायाशी बसलो हे कळलं पाहिजे... हा सच्चेपणा, साधेपणा, नम्रपणा त्यांच्याकडे होता.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गैरकारभाराविषयी लोकमतने एक मालिका लिहिली होती. त्यावर महेश झगडे यांची कमिटी नेमण्यात आली होती. कमिटीचा रिपोर्ट आधीच्या सरकारने स्वीकारला होता. हे जेव्हा गिरीश भाऊंना कळाले, तेव्हा त्यांनी तो रिपोर्ट जशाच्या तसा अमलात आणला जाईल, असे सांगितले. त्यासाठी कठोर भूमिका घेतली. वर्षानुवर्ष ठराविक भागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना कठोरपणे त्यांनी बदलले. त्यावेळी त्यांना त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी चिंतामणी जोशी यांची मिळालेली साथ जबरदस्त होती.
जिवाभावाचा सोबती, मंत्रिपदानंतर दुरावला...निधनाच्या आदल्या दिवशीच भेटून गेला
सगळ्या पक्षात जीवाभावाचे मित्र करण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे उल्हासदादा पवार, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांना देखील भरून आले ते उगाच नव्हे... बाला हा त्यांचा जिवाभावाचा सोबती. मात्र गिरीष भाऊ मंत्री झाल्यानंतर थोडी कटूता आली. बाला भाऊपासून दूर गेला... मात्र मंत्रीपद नसताना हाच बाला भाऊंकडे जाऊन गप्पा मारत बसायचा. निधनाच्या आदल्या दिवशी त्यांनी बालासमोर मन मोकळं केलं... त्यातून त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते हे लक्षात येते. कायम हसतमुख राहणारे, मित्रांवर जीवापाड प्रेम करणारे, येणाऱ्या मित्रांना खाऊ घालण्यात धन्यता मानणारे, एखादा विषय समजला नाही तर तो समजून घेण्यात कसलाही कमीपणा न मानणारे, आयुष्यभर भाजपावर जीवापाड प्रेम करणारे... अशी अनेक रूप गिरीश भाऊंची होती.
लोकसभेला उभे राहायचे की नाही याविषयी त्यांच्या मनात द्विधा मनस्थिती होती. आपण लोकसभेला गेलो तर मुलगा विधानसभेला उभा राहील... सून ऍक्टिव्ह आहे. ती देखील पुढे तिच्यातले राजकीय नेतृत्व दाखवून देईल, याविषयी त्यांना प्रचंड अप्रूप होते. लोकसभेत निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळेल असेही त्यांना वाटले होते. पुण्यातल्या नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत नाकाला नळी लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअर वर येऊन प्रचार करणारे गिरीश भाऊ पाहून अनेकांना अस्वस्थ वाटले. त्यांना अशा अवस्थेत प्रचारासाठी आणणे अनेकांना आवडले नाही. कित्येक जणांचे डोळे भरून आले. अर्थात ह्या सगळ्या भावना त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक होत्या...
यापुढे मॅजेस्टिक आमदार निवासासमोरून जाताना किंवा ज्ञानेश्वरी बंगल्यावर जाताना किचन मधून लुंगी गुंडाळलेले गिरीश भाऊ येतील आणि महाद्या तयार झाला आहे... चला गप्पा मारत बसू.... अशी हाक देतील असे सतत वाटत आहे... गिरीश भाऊ... भावपूर्ण श्रद्धांजली...!!