‘हिरो’ भगतसिंग यांना देश पराभूत करतो तेव्हा!

By admin | Published: March 23, 2016 03:47 AM2016-03-23T03:47:53+5:302016-03-23T03:47:53+5:30

आज २३ मार्च. भगतसिंंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीला ८५ वर्षे झाली. वास्तविक पाहता हजारो क्रांतिकारक आणि देशभक्तांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले

When the 'Hero' defeats the country of Bhagat Singh! | ‘हिरो’ भगतसिंग यांना देश पराभूत करतो तेव्हा!

‘हिरो’ भगतसिंग यांना देश पराभूत करतो तेव्हा!

Next

संजय नहार (संस्थापक, सरहद) आज २३ मार्च. भगतसिंंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीला ८५ वर्षे झाली. वास्तविक पाहता हजारो क्रांतिकारक आणि देशभक्तांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले. त्या सर्वांचे एक मुख्य स्वप्न होते परकीय ब्रिटीश सत्तेपासून ‘आझादी’ आणि त्या आझादीबरोबरच भारताचे नवनिर्माण. या सर्व क्रांतिकारकांमध्ये भगतसिंंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याला आजही देश विसरलेला नाही किंंबहुना आज त्यांच्या विचारांची अधिकच गरज वाटू लागली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही भगतसिंंग फाऊं डेशनच्या माध्यमातून काम सुरु झाले आहे आणि त्यांना कष्टकऱ्यांचा- शेतकऱ्यांचा मोठा पाठिंंबा मिळत आहे, एकीकडे पाकिस्तान धर्माधिष्ठित राष्ट्र असूनही त्यांना हळूहळू साम्यवादी, कम्युनिस्ट, धर्माधिष्ठित राजकारणाला विरोध करणाऱ्या भगतसिंगांच्या क्रांतीच्या विचारांची गरज वाटू लागली आहे, तर दुसरीक डे भारतात मात्र एक छोटासा गट नथुराम गोडसे आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांची तुलना भगतसिंगांशी करू लागला आहे. तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते. कारण हिंंसा अथवा सूड हा भगतसिंगांच्या विचारांचा पाया कधीच नव्हता. भगतसिंगांच्या काळात जी अस्थिर आणि गोंधळाची परिस्थिती होती, सामान्य माणूस हताश झाला होता, तीच आणि तशीच परिस्थिती भारत आज जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जात असला तरी तशीच आहे.
भगतसिंगांच्या कुटुंबियांशी आलेल्या संपर्कानंतर आणि भगतसिंगांच्या जीवनाचा शोध घेताना काही माहिती माझ्या हाती लागली. विदर्भात आज दुष्काळाची परिस्थिती आहे, तशीच तेव्हा म्हणजे १८९८ मध्येही होती. शेतकरी आत्महत्त्या करीत होते. उपासमारीमुळं माणसं मरत होती. हे जेव्हा भगतसिंगांचे वडील सरदार किशनसिंंग यांच्या लक्षात आलं, तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांनी लाला बिशंबर सहाय, लाला शिवराम वकील यांच्या सोबतीनं ‘विदर्भ सहायता समिती’ स्थापन केली. पंजाब हा धनधान्यानं समृद्ध भाग असल्यानं या समितीच्या माध्यमातून त्यांनी लोकांकडून धान्य गोळा केलं. ट्रक-ट्रक भरून ते विदर्भात नेलं आणि त्याचं वाटप केलं. फिरोजपूर ते विदर्भ यातल्या अंतराचा जरी विचार केला, तरी त्या काळी केलेली कृती ही किती मोठी होती, याचा अंदाज येईल. इतकंच करून ते थांबले नाहीत. तर दुष्काळ संपतासंपता किशनसिंंग यांच्या असं लक्षात आलं, की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या, जे दगावले, त्यांची मुलं अनाथ झाली आहेत व मदत करून त्यांचा फक्त दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटेल. या मुलांसाठी काही करावं म्हणून त्यांनी विदर्भातील ५० मुलं दत्तक घेतली आणि फिरोजपूरला एक अनाथाश्रम काढला. पंजाबमधल्या लोकांनी विदर्भातल्या या मुलांचं पालनपोषण आणि शिक्षणाची व्यवस्था केली. हा आश्रम पुढे खूप वर्षं सुरू होता. दरम्यानच्या काळात १९०० मध्ये गुजरातमध्ये दुष्काळ पडला. १९०४ मध्ये कांगडामध्ये भूकंप झाला.
१९०५ मध्ये श्रीनगरमध्ये प्रचंड पूर आला. या सगळ्या घटनांत आपल्या देशाच्या भागावरचं संकट म्हणजे आपलंच संकट, या भूमिकेतून त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. भगतसिंगांचे चुलते सरदार अजितसिंंग हेही शेतकऱ्यांचे मोठे नेते होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी वेचले. हेच संस्कार भगतसिंगांवर झाले. भगतसिंंग यांनाही शेतकरी आणि कामगार यांच्याबद्दल प्रचंड आस्था होती. हीच भूूमिका थोडी विस्तारून भगतसिंगांनी १९२६ मध्ये ‘नौजवान भारतसभे’ ची स्थापना केली होती. तिची उद्दिष्ट्ये होती.
एक: शेतकरी आणि कामगारांना एकत्र करून त्याचं गणराज्य स्थापन करणे.
दोन: राष्ट्र निर्मितीसाठी तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे.
तीन: देशात जी काही आर्थिक, सामाजिक आंदोलनं सुरू आहेत. त्यांना सहानुभूतीनं मदत करणे.
चार: धर्मांध आणि सांप्रदायिक शक्तींच्या विरुद्ध शेतकऱ्यांची आणि कामगारांची एकजूट करणे.
यात मुद्दा असा आहे, की नौजवान भारत सभेची १९२६ मध्ये स्थापना करताना जे उद्देश भगतसिंगांनी ठेवले होते. त्याच उद्देशांची इतका मोठा काळ गेला, तरी पुन्हा गरज वाटते, म्हणजेच मूलभूत मु्द्यांक डे लक्ष देण्याऐवजी आणि प्रश्न सोडवण्याऐवजी हाताळणीसाठीच आपण सर्व यंत्रणा वापरीत आहोत.
भगतसिंंग हा अनेकांचा आजही ‘हिरो’ आहे. मात्र दुर्दैवाने भगतसिंंगांमधील विचारांचा खून करून त्याच्या मधल्या हिरोला जिवंत ठेवले गेले, हा भगतसिंगांच्या विचारांचा केलेला पराभव आहे, असं मला वाटतं. खुद्द भगतसिंंग यांनीच म्हणून ठेवलंय की -
पिस्तोल और बंम कभी इन्किलाब नही ला सकते, बल्कि इन्किलाब की तलवार विचारोंकी तानपर तेज होती है।
आजही ‘देशभक्ती’ की ‘देशद्रोह’ हेच मुद्दे विविध पातळ्यांवर समोर येत आहेत. त्याही वेळी लाला लजपतराय हे हिंंदुत्ववादी होते, तर भगतसिंंग आणि मंडळी समाजवादी. त्यांच्यामध्ये अनेकदा संघर्ष झाले. लालाजी भगतसिंगांना रशियाचे एजंट म्हणत असत मात्र त्याच लालाजींच्या हत्त्येचा बदला घेण्यासाठी झालेल्या सँडर्सच्या खुनासाठी भगतसिंंग आणि सहकाऱ्यांना फाशी झाली. त्यावेळी आमच्यात काहीही मतभेद असले तरी साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध आम्ही एकत्र आहोत ही भगतसिंगांची भूमिका होती. त्या काळातही धार्मिक कारणांवरून दंगली सुरू झाल्या होत्या. भगतसिंगांचे नाव घेणाऱ्या सर्व पक्ष आणि संघटनांनी वैचारिक आणि राजकीय लढाईचे परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होणार नाहीत याची काळजी शेतकरी आणि सामान्य माणूस होरपळून निघत असताना घेण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
राजकुमार संतोषी यांनी ‘द लिजंड आॅफ भगतसिंंग’ हा चित्रपट बनविला, तेव्हा भगतसिंंग यांचे लहान भाऊ कुलतारसिंंग पुण्यात आले होते. राजकुमार संतोषी मला म्हणाले, ‘आमचा चित्रपट अधिकृत आहे, असं कुलतारसिंंग म्हणाले तर ‘त्यांच्या भगतसिंंग फाऊंडेशन’ला आम्ही मोठी आर्थिक मदत करू’. हे मी कुलतारसिंगांना सांगितले तेव्हां त्यावरील त्यांचे उत्तर होते, ‘बेटे उसको कहो, भगतसिंंग जब जिंंदा थे तो हमारी अमानत थे, जब शहीद हुए, वह देश की अमानत बने. जो अमानत हमारी नहीं, उसकी किमत हम कैसे ले? बस भगतसिंंग एक सोच थी, उसे सिर्फ हिरो मत बनाओ’. भगतसिंंगला हिरो मानणाऱ्या आणि त्याला मालमत्ता समजणाऱ्यांना कुलतारसिंगांनी दिलेला सल्ला अमलात आणणे हीच खरी त्या शहीदास खरी श्रद्धांजली ठरेल.

Web Title: When the 'Hero' defeats the country of Bhagat Singh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.