मिताली राज अनेकांना झोंबेल असं बोलते तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 08:55 AM2021-07-09T08:55:12+5:302021-07-09T08:55:28+5:30
‘मी लोकांना खुश करण्यासाठी खेळत नाही’ असं मिताली म्हणते, तेव्हा ती खेळाच्या जेंडरलेस होण्याची गोष्ट सांगत असते !
मेघना ढोके, मुख्य उपसंपादक, लोकमत ः
‘आय डोण्ट सीक व्हॅलिडेशन फ्रॉम पिपल’- मी लोकांना खुश करण्यासाठी खेळत नाही, मला कुणाच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही, असं कालपरवा मिताली राज म्हणाली तेव्हा अनेकांच्या कानाला हे वाक्य खटकलं. काहींना झोंबलंही. खेळाडू असून (आणि बाई असूनही) मिताली म्हणते की, गरज नाही लोकांनी माझ्या खेळावर शिक्कामोर्तब करण्याची.. हे काही बरं आहे का? पण मिताली असं म्हणते तेव्हा तिच्या पाठीशी उभी असते तिची २२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द, स्वत:ला मैदानात टिकवून ठेवण्यासाठीच नाही तर स्वत:चा खेळही उंचावण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न.
आय डोण्ट सीक व्हॅलिडेशन असं ती म्हणते तेव्हा वेगळ्या अर्थानं ती भारतीयच नाही तर उपखंडातल्या महिला खेळाडूंच्या मनातली खेळाच्या जेंडरलेस होण्याची गोष्ट सांगत असते. भारतीय उपखंडात रीत अशी की, खेळाडू म्हणून बाई कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी तिच्या अवतीभोवतीच्या समाजानं तसं म्हणत तिला शाब्बासकीची प्रमाणपत्रं वाटली पाहिजेत, तरच तिचं कर्तृत्व झळाळून उठतं. मिताली आता २२ वर्षांनंतर ही जुनी रीत नाकारते आहे. कसोटी आणि वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारी हायेस्ट रनमेकर भारतीय महिला खेळाडू होण्याचा विक्रम नुकताच मितालीच्या नावावर नोंदला गेला. त्याआधी मार्चमध्ये तिनं दहा हजार धावांचा टप्पा गाठला होता.
२६ जून १९९९ रोजी तिनं सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. १९९९ चा काळ आठवा. तेव्हा मोबाईल फोनही देशात धड आलेले नव्हते. पाकिस्तान संघ प्रदीर्घ काळानंतर भारत दौऱ्यावर होता. सचिन तेंडूलकरची पाठदुखी, अनिल कुंबळेनं पाकिस्तानचा सारा संघ बाद करणं, तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी स्वत: शांततेचा पैगाम घेऊन लाहोरला जाणं आणि कारगिल असे ते दिवस. तो काळ ते आज समाजमाध्यमी, टी ट्वेण्टीचा झटपट काळ ! खेळात फक्त स्ट्राईक रेटच महत्त्वाचा. तंत्र नंतर, हायर ॲण्ड फायर हेच सूत्र ही या काळाने आणलेली नवी नीती. हा काळ आता तुमची कालची कामगिरीच नाकारतो आणि म्हणतो, फक्त आजचा परफॉर्मन्स दाखव नाहीतर निघ !!
- एवढं सगळं बदललं तरीही तेव्हाची मिताली राज आज खेळतेच आहे. नवीन आलेल्या तरुण मुलींसोबत स्पर्धेत उभी आहे, स्ट्राईक रेटवरुन बोलणी खातेय, प्रशिक्षकांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचे आरोप-टीका सहन करत, अजूनही चुका करत शिकतेच आहे.
मितालीची गोष्ट फक्त क्रिकेट स्कोअर बोर्डपुरती मर्यादित नाही. या २२ वर्षात तिने स्वत:ला शोधलं. खेळाच्या भाषेत सांगायचं तर ‘रि इनव्हेण्ट’ केलं, स्वत:लाही आणि स्वत:च्या खेळालाही. ‘बायकांना कुठे क्रिकेट कळतं’ असे टोमणे देऊन केवळ ग्लॅमरस एक्स्ट्रा इनिंगच्या विदुषकी सिली पॉईंटवरच महिला क्रिकेट आणि प्रेक्षकांना उभं करण्यात आलं होतं, त्याकाळात तिनं खेळायला सुरुवात केली. तेव्हा भारतीय महिला क्रिकेटपटू ‘आमच्याकडे खेळाडू म्हणून पहा’ अशी विनवणी करत होत्या. आमची कामगिरीही ‘क्रिकेट’ म्हणून मोजा म्हणत होत्या, व्हॅलिडेशन मागत होत्या ! त्याकाळात मिताली, झुलन गोस्वामीचा प्रवास सुरु झाला. तो आता स्मृती मन्धाना, हरप्रीत कौर, शफाली वर्मा या खेळाडूंपर्यंत येता येता व्यावसायिक क्रिकेटची परिभाषाच बोलू लागला आहे.
पुरुष क्रिकेटची स्पर्धा, लोकप्रियता, पैसा, वर्षाकाठी क्रिकेट खेळावं लागतं ते दिवस इथपर्यंत यायला अजूनही वेळ लागेल. तोवर समान वेतनाचे फुसके बार फोडण्यातही काही हशील नाही हेही महिला क्रिकेटला चांगलंच माहिती आहे.
आर्थिक समानता केवळ मागून मिळत नाही तसं ‘व्हॅलिडेशन’ही मागून मिळत नाही.. ते मिळवावंच लागतं.. २२ वर्षे खेळण्याची हिंमत, फिटनेस आणि दर्जा राखून मितालीने ते ‘व्हॅलिडेशन’ कमावलंय. खेळाकडे खेळ म्हणून पाहण्याची आणि त्यातून लिंगभेद पुसला जाण्याची आशा वाटावी इतपत हा बदल आशादायी आहे.. मितालीच कशाला, पुन्हा पुन्हा स्वत:ला पणाला लावणारी मेरी कोम पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचं नेतृत्व करायला निघाली आहे. लॉकडाऊन काळात लग्न करुनही आपल्या तयारीवरचा फोकस अजिबात न हलवता जागतिक स्पर्धा जिंकणारी तिरंदाज दीपीका कुमारी.. आणि त्यांच्यासारख्या अनेक महिला ॲथेलिट हेच सांगताहेत, आता आमच्या खेळाचं मापन खेळाच्या दर्जावर होणार, आता ना बाई म्हणून आम्हाला कौतुकं हवीत, ना हेटाळणीची आम्ही फिकीर करतो ! मितालीची गोष्ट म्हणूनच तिची एकटीची नाही.. सगळ्या अडचणींवर मात करुन कारकीर्द घडवणाऱ्या अनेकींची आहे.
meghana.dhoke@lokmat.com