बोर्ड परीक्षेत १०० टक्के मार्कांची किंमत शून्य होते, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:59 AM2021-08-23T07:59:14+5:302021-08-23T07:59:40+5:30
कोरोनाकाळाने विद्यार्थ्यांना मानसिक ताणाचे अवडंबर माजवायला शिकविले. आता प्रत्येकाने स्वतःला विचारावे, ‘मला खरोखरच ‘शिकायचे’ आहे का?’
- डॉ. वृंदा भार्गवे उपप्राचार्य, एचपीटी महाविद्यालय, नाशिक
विषय ताजा, ज्वलंत आणि स्फोटक. दहावी आणि बारावी- ५० पासून ८० टक्क्यांपर्यंतचे सगळेच विद्यार्थी क्षणार्धात सामान्य झाले, कारण ९० ते १०० टक्क्यांमध्ये असणारे विद्यार्थी अमाप. महाविद्यालयांमधील मर्यादित जागांवर नव्वदीच्या पुढच्यांचा कब्जा, त्यामुळे अगदी ८०-८५ वाल्यांनासुद्धा किंमत शून्य! कारण नामांकित, दर्जेदार महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळणे केवळ दुरापास्त. आपल्या मुला/मुलीने इतका मानसिक, बौद्धिक ताण घेऊनदेखील ‘हेचि फल काय मम तपाला’ अशी पालकांची संत्रस्त अवस्था. आता याला जबाबदार कोण? गेली दीड-दोन वर्षे भयव्याकूळ अवस्थेत गेली. कोरोना हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे वास्तव स्वीकारले नाही तर शिक्षणाला काही ठिकाणी तरी नक्कीच काडीमोड मिळेल, अशी स्थिती तयार झालेली दिसते. कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखांव्यतिरिक्त शिक्षण असूच शकत नाही या समजात सुशेगात जगणारी असंख्य कुटुंबे. काहींना डिग्री हवी असते; पण ती महाविद्यालयात न जाता. कोविड काळात अशी संधी आली. ऑनलाइन वर्गात न येता गुगल मीटवर डोकावून पटकन लेफ्ट होणारे खूप विद्यार्थी होते. प्रथम या तंत्राचे अप्रूप म्हणून पालकही औत्सुक्याने गुगल/ झूमवर चक्कर मारून जायचे.. नंतर त्यांचा रस आटला आणि मुलांचादेखील संपला. त्यातून ९ वी आणि ११ वी म्हणजे विश्रांतीची वर्षे. रेस्ट इयर्स! जो काही जीव काढायचा तो दहावीत आणि बारावीत..त्यामुळे केवळ त्या वर्षाचा अभ्यास या दोन वर्षांत मुले रेटत राहिली.
अकस्मात ९ वी आणि ११ वीचे मूल्यमापन, मूल्यांकन करण्याचा फतवा आल्यावर सगळ्यांची गाळण उडाली. त्यामुळेच कदाचित दहावीच्या अकरा लाख विद्यार्थ्यांनी आपल्याला सीईटी-सामाईक प्रवेश परीक्षा- द्यायला आवडेल असे प्रामाणिकपणे सांगितले. न्यायालयाने मात्र या प्रवेश परीक्षेस हरकत घेतली आणि बट्ट्याबोळ म्हणावा तशी अद्भुत परिस्थिती ओढवली. काही विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीमध्ये भरपूर गुण मिळविले. वेगवेगळी डिव्हाइस वापरून सिनिअर मित्रांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींना मौलिक मदत केल्याने अनेकांना पैकीच्या पैकी गुणांचे दान पडले. खरीखुरी अभ्यास करणारी, संकल्पना समजावून घेऊन उत्तरे देणारी, प्रकल्पासाठी जिवाचे रान करून संदर्भ मिळविणारी, नव्या तंत्रज्ञानाला आत्मविश्वासाने सामोरे जात कष्ट करणारी मुले होती, त्यांना मात्र फटका बसला. ८५ व ८८ टक्के मिळूनही ती अस्वस्थ होत गेली.
या काळात काहीही झाले तरी परीक्षा नकोच असा धोशा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लावला. शिक्षक, प्राध्यापक मात्र या कोरोना काळात २४ बाय ७ ऑनलाइन असत. गुगल फॉर्म, गुगल मीट आणि whatsapp वर सातत्याने संवाद हाच त्यांचा उद्योग. परीक्षा आली की बहुपर्यायी प्रश्नपेढी(MCQ) तयार करायची! इमानेइतबारे शिकविणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या संगणकीय पडद्यावर दिसायचे ते फक्त चिकटविलेले फोटो. विद्यार्थी गायब. तरी नेटाने अभ्यासक्रम पूर्ण करण्याची धडपड काही शिक्षकांनी केलीच.
परंतु या काळात शिकण्याकडे पाठ फिरविणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मात्र मानसिक ताणाचे अवडंबर माजविले. कमी गुण मिळाले तर आपण आत्महत्या करू किंवा या साऱ्याला जबाबदार यंत्रणेला धरू , असा दबाव टाकायला प्रारंभ केला. आता मनाजोगत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर तेच अस्त्र बाहेर काढले जाईल.
विद्यार्थ्यांनी काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत : आपल्याला खरोखर शिकायचे आहे का? आपली कुवत नेमकी काय आहे? या कोविड काळात आपण किती वेळ वाया घालविला? नवीन काय शिकलो, कोणती कौशल्ये अवगत केली? मी काय वाचले, ऐकले, पाहिले त्याची नोंद माझ्याकडे आहे का? माझ्या अभ्यासाची दिशा कोणती? या काळात एखादी नवी भाषा, नवी तंत्रे मी अवगत् केली का?
- किमान त्या त्या महाविद्यालयांनी तरी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे असे प्रश्न विचारावेतच. प्रवेश, स्पर्धा, गुण यांना अवास्तव महत्त्व दिल्याने माणूस म्हणून आपण खुजे राहिलो आहोत. खुज्यांची रांग वाढत गेली की नजर आणि दृष्टीदेखील कोती राहणार; हे वैश्विक सत्य आहे. असे होऊ नये म्हणून किमान आता तरी गुणांची सूज काढून आपल्याला नेमके काय करायचे आहे, आपल्या मुलाला आपण काय मार्गदर्शन देऊ शकू याचा पालकांनी विचार करावा. महाविद्यालय कोणतेही असो, पायाभूत सुविधांचा फारसा विचार न करता स्वयंअध्ययनाचे धडेच आता जरुरीचे आहेत. या विपरीत काळात जो कुणी माहितीची कवाडे बंद करील, नुकसान त्याचेच होणार आहे. भावनिकतेपेक्षा बुद्धीनेच हे प्रश्न सोडवावे लागतील.
- bhargavevrinda9@gmail.com