नात्यातल्या पेचांना फाटे फुटतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 01:55 AM2021-01-16T01:55:54+5:302021-01-16T01:56:28+5:30

आजारपण एकट्यात नि मृत्यूही एकाकी, या जाणिवेने माणसं हादरली! पण आपण एकटे नाही, मिळून सोसू, मार्ग काढू हा विचार रुजेल हे नक्की!

When a relationship breaks down ... | नात्यातल्या पेचांना फाटे फुटतात तेव्हा...

नात्यातल्या पेचांना फाटे फुटतात तेव्हा...

Next

सानिया

हे वर्ष प्रचंड स्थित्यंतराचं ठरलं, या वर्षातले ताणतणाव व त्याचे दूरगामी परिणाम पाहता...? 

खरंय. वर्षभर एका वेगळ्या आपत्तीमध्ये आपण जगतो आहोत आणि त्यातून आली असुरक्षितता, अनिश्‍चितता. लोकांच्या मनात एक भय, काळजी, चिंता आहे. ती आजाराबद्दल आहेच, पण हा आजार जे एकटेपण घेऊन येतो त्याबद्दल ती जास्त आहे. आजारपण एकट्यात काढायचं नि मृत्यूही एकाकी ही सगळ्यांत हादरवून टाकणारी गोष्ट! त्याचं सावट इतकं की, त्याबद्दल विचारही करू नये, असं वाटतं. परिस्थितीचंही भय किती अंगानं? अनेकांच्या नोकऱ्या-धंदे गेले, घरी बसावं लागलं, शाळा-कॉलेज बंद! या स्थितीचा परिणाम होतो. माणसं घरात महिनोन्महिने कोंडून बसली आहेत, अशा काळाची कुणी कल्पनाही केली नव्हती. असा काळ आपण सदेह अनुभवला. अजूनही अनुभवतो आहोत.  या वरवंट्यात मजुरांचे, गरिबांचे हाल झाले. अजूनही होताहेत. हातची भाकरी गेली त्यांचे प्रश्‍न गंभीर आहेत. आपला समाज आधीच विषम, त्यात वेगवेगळ्या धर्म, जाती व वर्गांप्रमाणे प्रचंड भेद. या अस्वस्थ काळात हे भेद नि दऱ्या अधिकाधिक रुंद होत गेल्या आणि या भेदातील दमनाचं, वेदनांचं एक नवं भान येत गेलं. 

आजवर मानवजाती समूहानं राहात आल्या, संस्कृतीत अनेक वेळा उलथापालथ होत गेली. किती युद्धं, रोगराई, दुष्काळ, पूर, अन्याय यांचा कहर मानवजातीनं सोसला. माणसांचा समूह त्यातून कधी मोठ्या संख्येनं नाहीसा झाला, पण  पुष्कळसा तगूनही राहिला.  आपल्या साठसत्तरीच्या आयुष्यात आपण असा कुठला काळ बघू, अशी कल्पना कोण करतं? जे घडलं ते मागं व जे घडेल ते दूरच्या भविष्यात हे आपण धरून चालतो. त्यामुळे अशा भयचकीत करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा म्हणून धक्का असतो. त्यातून जे सामाजिक वर्तमान बदलतं, त्याचा ताण येतो.

कशा प्रकारचा हा ताण? नैराश्यानं ग्रासून टाकल्याची परिस्थिती झाली का? काम कसं चालू ठेवलंत? 

मी एक लेखिका आहे व घरी बसून एकटीनं लिहिणे, हे मी अनेक वर्षे करत आलेय. त्यामुळं तशा अर्थानं माझं लेखनवाचन सुरू होतं, पण एक जाणीव सतत जागी होती की, मला घर आहे, सुखसोयी आहेत, कामासाठी लॅपटॉप व इंटरनेट आहे, आणखीही बरंच मला करता येतं, बघता येतं. माझं जीवन सुरू राहिलं आहे. बाकीच्यांचं काय? दुसऱ्या बाजूला एका स्वयंसेवी संस्थेतर्फे मी समुपदेशनाचं काम करत होते. पूर्वी ते असायचंच, पण आता वाढलं व माध्यम बदललं. प्रत्यक्षातऐवजी फोन व ऑनलाइन असं. माणसांच्या अनुभवातलं थेट कळण्यातून विषमतेचा फटका माणसांना कशा तऱ्हेनं बसतो आहे, हे एक सजग नागरिक व संवेदनशील माणूस म्हणून जाणवत गेलं. व्यक्तिगत पातळीवरही हा अस्वस्थतेचा काळ आहे. 

नात्यात आधीच असणारे ताण  सक्तीच्या एकत्रपणात उघड होत गेले व कुटुंबांतर्गत असलेली सत्तेची उतरंडही जास्त ठळक होत गेली. नोकरी वा अन्य कारणाने या एकत्रपणातून बाहेर पडण्यासाठी स्त्रीला वाट होती, ती बंद होऊन तिची विशेषत: कुचंबणा झाली, नात्यातल्या पेचांना फाटे फुटत गेले, असंही एक चित्र आहे. ज्यावेळेला विशिष्ट चौकटीतून तात्पुरते तरी बाहेर पडण्याचे मार्ग खुले असतात, तेव्हा निदान तुम्हाला काही दिलासे शोधता येतात. कोरोनाच्या काळात ताणलेले नातेसंबंध, तसेच क्लिष्ट अवस्थेत राहिले. हे अवघड असतं. कुटुंबसंस्थेचे कितीही गोडवे गायले, तरी या व्यवस्थेतील ताण अधिक गुंतागुंतीचे असतात. तिथली सत्तास्थानं व शोषण त्रासदायक असतं. तसं जिथं कमी असतं, तिथं माणसांचा एकमेकांना आधार असू शकतो.  स्वातंत्र्य म्हणजे काय, याचे नवेच प्रश्‍न तयार होताना आपण माणसा-माणसातले संबंध घनिष्ट करू शकतो का? संवाद साधू शकतो का? हेच नव्यानं तपासून सोडवावं लागणार. चौकट मोडून बाहेर पडण्याबाबतीत व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय पातळीवर प्रचंड प्रश्‍न आहेत. त्या दृष्टीनं स्वत:ची समज वाढविली, स्वभाव, स्वसामर्थ्य वाढवलं, तर नैराश्य कमी वेळा हल्ले करेल, असं वाटतं. 

व्यवस्थांनी जबाबदारी झटकणं, जगभरच उलथापालथ होणं यातून काय घडेल असं वाटतं...? 

एक व्यवस्था म्हणून राजकीय वर्गाकडं नीट पाहिलं, तर विषमता अधिक कशी वाढेल, याचंच जणू त्यांनी संधान बांधलं आहे. सत्ताधारी वर्गाला सामान्य लोकांच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, असंच दिसतंय सध्या.  धर्म, जात, वर्ग, लिंगसापेक्षता अशा सगळ्या पातळ्यांवर ‘आम्ही आणि तुम्ही’, ‘आपण आणि ते’ असं आपण बघत राहिलो, तर भेद वाढतच जाणार आहेत. म्हणून दृष्टिकोन निरोगी करणं मला महत्त्वाचं वाटतं या काळात. ही गोष्ट सोपी नव्हे, पण सुदृढ समाजासाठी अपरिहार्य आहे. या काळात मानवी जीवनाला व्यापून उरलेला स्पर्श हरवलाय, पण तंत्रज्ञानामुळे आपण एकमेकांना सहज ऐकू-पाहू शकतो. वर्षभर लोकांनी इतकं झटून काम केलं, शोध घेतले की, कोरोनावरची लस तयार होऊ शकली. हे इतकं वेगवान आधी कधी झालं होतं का? आपला काही ताबा नाही, असं वाटवणाऱ्या परिस्थितीत कितीही टोकाचं भरडणं वाट्याला आलं, तरी आशा असतेच. तिला धुमारे फुटतात, बहर येतात. कुठलाही काळ फार वर्षे आहे, त्या परिस्थितीत राहात नसतो. भवतालची राजकीय परिस्थिती, सामाजिक दुरवस्था सगळं बदलेल. पदरी आल्या प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याचं काम मानवी समूह करत आलाय, आपण एकटे नाही, मिळून सोसू व मिळून मार्ग काढू हा विचार रुजेल, अशी आशा मला कायम वाटत राहते. 

( ख्यातनाम लेखिका )
मुलाखत : सोनाली नवांगुळ

Web Title: When a relationship breaks down ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.