अंधश्रद्धांमधून सुटका कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:54 PM2018-05-15T23:54:45+5:302018-05-15T23:54:45+5:30
अकोला जिल्ह्यातील धोतर्डी नामक छोट्याशा गावात, गत बुधवारी एका पित्याने केवळ अंधश्रद्धेतून पोटच्या तीन चिमुकल्यांना ठार केले अन् नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.
अकोला जिल्ह्यातील धोतर्डी नामक छोट्याशा गावात, गत बुधवारी एका पित्याने केवळ अंधश्रद्धेतून पोटच्या तीन चिमुकल्यांना ठार केले अन् नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीस सुन्न करून सोडणाऱ्या या घटनेने आपल्या समाजाच्या एकंदर जडणघडणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या कुटुंबात ही घटना घडली ते कुटुंब आत्यंतिक दारिद्र्यात दिवस कंठत होते. ज्या पित्याने हे हत्याकांड घडविले तो अशिक्षित आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याच्यावर अंधश्रद्धांचा पगडा असल्याचे म्हणावे, तर इंडियन प्रीमिअर लीगमधील एका संघाची मालकीण असलेल्या अब्जाधीश महिलेच्या कृतीचा उलगडा कसा करावा? धोतर्डीतील घटनेच्या आगेमागेच त्या अब्जाधीश महिलेची एक चित्रफित समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली. त्यामध्ये आपला संघ विजयी व्हावा म्हणून त्या काही तरी पुटपुटत वारंवार स्वत:चे डोळे, मस्तक व डोक्यावरून हात फिरवताना दिसतात. त्यांच्या बाबतीत तर दारिद्र्य किंवा शिक्षणाच्या अभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. मग तरीही अंधश्रद्धेचा एवढा पगडा? त्या ज्या देवास किंवा बाबास संघाच्या विजयाचे साकडे घालत होत्या, तो देव किंवा बाबा एवढा शक्तिशाली असेल, तर मग कोट्यवधी रुपये मोजून नामवंत क्रिकेटपटू विकत घेण्याची गरजच काय? थोडक्यात काय, तर आपल्या देशात अंधश्रद्धा आणि सांपत्तिक स्थिती किंवा शिक्षणाचा काहीही संबंध नाही. उलट गर्भश्रीमंतच जास्त अंधश्रद्धाळू असल्याची अनेक उदाहरणे नित्य बघायला मिळतात. ज्या देशात अवकाश विज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणाºया संस्थेतील उच्च पदांवरील शास्त्रज्ञच प्रत्येक अवकाशयानाच्या प्रक्षेपणापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहाची प्रतिकृती घेऊन, देवाच्या दरबारी प्रक्षेपण यशस्वी होऊ देण्याचे साकडे घालण्यासाठी पोहोचतात, त्या देशात इतरांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करावी? जेव्हा असे प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सांगड न घालण्याचा शहाजोग सल्ला दिला जातो; पण या दोहोतील सीमारेषा एवढी धूसर आहे, की श्रद्धा संपून अंधश्रद्धा कुठे सुरू होते, हे कळतच नाही! जोपर्यंत अंधश्रद्धा निरुपद्रवी असते, तोपर्यंत तिच्याकडे दुर्लक्ष करता येते; पण जेव्हा ती धोतर्डीसारखी जीवघेणी ठरते, तेव्हा निदान बाविसाव्या शतकात तरी आपण यामधून बाहेर पडू शकू की नाही, हा विचार मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. केवळ राज्यघटनेत केलेली तरतूद किंवा विविध कायदे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुरेसे नाहीत, हे सत्यच धोतर्डीतील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.