विशेष लेख - जुन्या पुस्तकामध्ये नवी ऊर्जा भरली जाते, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:15 AM2022-05-27T06:15:40+5:302022-05-27T06:16:12+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषद गेली ११५ वर्षे मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी कार्यरत आहे. आज परिषदेचा वर्धापनदिन! त्यानिमित्ताने.......

When the old book is filled with new energy, with Masap | विशेष लेख - जुन्या पुस्तकामध्ये नवी ऊर्जा भरली जाते, तेव्हा...

विशेष लेख - जुन्या पुस्तकामध्ये नवी ऊर्जा भरली जाते, तेव्हा...

Next

२०१६ मध्ये कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने “साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे”, ही भूमिका  समोर ठेवून परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपल्या कार्यशैलीत बदल केला.  साहित्य परिषदेतर्फे विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन  आणि शाखा मेळावा हे महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले. मसाप तालुका पातळीवर आणि छोट्या गावातही पोहोचली. परिषदेच्या शिवार साहित्य संमेलनांना  ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. साहित्य परिषदेत सारस्वतांचे स्मृतिदिन, व्याख्याने आणि पारितोषिकांचे वितरण एवढेच कार्यक्रम होत असत. त्यात बदल करून  ज्येष्ठ लेखिका वैदेही, डॉ. प्रतिभा राय, सितांशु यशचंद्र या अन्य भाषांतील थोर सारस्वतांना परिषदेच्या वर्धापनदिन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेने लोक चळवळ उभारली, पंतप्रधानांना एक लाख पत्रे, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी पत्रव्यवहार आणि नेत्यांच्या गाठी-भेटी हे सारे करीत असताना राजधानी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी विविध संस्थांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनात साहित्य परिषदेचा लक्षणीय सहभाग होता या आंदोलनाला यश आले. या कायद्याचे प्रारूप कसे असावे यासाठीच्या लेखक आणि विधिज्ञांच्या महत्त्वपूर्ण बैठका परिषदेतच झाल्या. 

साहित्य संमेलना अध्यक्षपदासाठी निवडणुकांचा पर्याय होता तेव्हा प्रतिभावंत सारस्वतांना मतांसाठी याचना करावी लागत असे.  समाजमनातही त्याविषयी खदखद होतीच. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठाम भूमिका घेऊन निवडणुकीऐवजी ‘सन्मानपूर्वक निवड’ या पर्यायाचे समर्थन केले. तसा ठराव मसापच्या कार्यकारी मंडळात प्रथम मंजूर केला आणि महामंडळातही तो मंजूर व्हावा यासाठी पुढाकार घेतला. सर्व संस्थांच्या सहमतीने हा पर्याय स्वीकारला गेला आणि डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे यांच्या रूपाने वाचकांच्या मनातील संमेलनाध्यक्ष संमेलनांना मिळाले. तंत्रस्नेही समाजाला साहित्य परिषदेने संकेतस्थळ, फेसबुक पेज, व्हॉटसॲप ग्रुपच्या साहाय्याने जोडले. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित करणारी मसाप ही भारतातील एकमेव साहित्यसंस्था आहे. हा वाङ्मयाचा इतिहास ई-बुक रूपात आणला.  महापुरात उद्ध्वस्त झालेल्या सांगलीच्या नगर वाचनालयाला अकरा हजार पुस्तके परिषदेने भेट म्हणून दिली. कोरोनाच्या संकटकाळात निवडणुका घेणे शक्य नसल्याने आणि या कठीण काळात निवडणुकीवर होणारा  खर्च वाचविण्यासाठी परिषदेच्या कार्यकारी मंडळाने पाच वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवला.  काळाची गरज ओळखून विद्यमान कार्यकारी मंडळाला सर्वसाधारण सभेने पाच वर्षांची मुदतवाढ दिली. 

आता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील आणि विश्वस्त यशवंतराव गडाख, दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून परिषदेत नूतनीकरण सुरू आहे. साहित्य परिषदेचे ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृह वातानुकूलीत आणि ध्वनिप्रतिबंधित होत आहे.  वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे नूतनीकरण होत आहे.  परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवीत आज साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे. 
- अंजली कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री

Web Title: When the old book is filled with new energy, with Masap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.