श्रीमंत अधिक श्रीमंत होतो, तेव्हा गरीब आणखी गरीब होतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 08:33 AM2024-03-25T08:33:26+5:302024-03-25T08:34:05+5:30
जगातील एकंदर संपत्ती वाढू शकेल; परंतु तिचे लोकसंख्या आणि प्रदेशाच्या विविध भागांत होणारे वितरण मात्र वेगवेगळे असू शकते.
- डॉ. एस. एस. मंठा
(माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद)
समाजातील संपत्तीचे वाटप आणि विषमता या गरिबीवर चर्चा करताना महत्त्वाच्या गोष्टी होत. जेव्हा श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो तेव्हा गरीब आणखी गरीब होत जातो काय? जगातील संपत्ती आहे तेवढीच आहे काय? संपत्तीचे संवर्धन ही संकल्पना वस्तूचे संवर्धन किंवा ऊर्जा संधारण याच्यासारखीच आहे काय? आधुनिक रसायनशास्त्राचा पिता मानला जाणारा अँटोइन ऑलिव्हियर याने असे म्हटले आहे की, निसर्गात काहीच निर्माण केले जात नाही आणि काहीच नष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट बदलते. जगातील एकंदर संपत्ती वाढू शकेल; परंतु तिचे लोकसंख्या आणि प्रदेशाच्या विविध भागात होणारे वितरण मात्र वेगवेगळे असू शकते.
विलग प्रणालीतील एकंदर वस्तुमान दीर्घकाळ कायम राहते. वस्तुमान संवर्धनाच्या प्रणालीतील प्रक्रिया, विलग प्रणालीची ऊर्जा या कशाचाच परिणाम त्यावर होत नाही. या दोन्ही गोष्टी पदार्थ विज्ञानातील मूलभूत मानल्या जातात. वस्तुमानाची फेररचना करता येते; किंवा त्यात बदल करता येतात. मात्र निर्माण किंवा नष्ट करता येत नाही. एकंदर ऊर्जा ही नित्य राहते. लाकूड जळते तेव्हा हवेतील प्राणवायूशी रासायनिक प्रक्रिया होऊन कर्बद्वीप्राणील वायू निर्माण होतो. पाण्याचे ऊर्ध्वपातन होते. वस्तूचे एकूण वस्तुमान, कर्ब आणि पाणी, जळालेले लाकूड आणि प्राणवायू यांचे वस्तुमान सारखेच असते. बर्फाचे पाणी होते किंवा वाफेचे पाणी होते तेव्हाही एकूण वस्तुमान सारखेच राहते.
या बदलाच्या प्रक्रियेत रेणू फेररचना करून घेतात. मात्र, वस्तुमान वाढत नाही किंवा कमी होत नाही. या उदाहरणांतून वस्तुमानाच्या संधारणावर शिक्कामोर्तब होते. हलता लंबक ऊर्जेच्या संधारणाकडे बोट दाखवतो. लंबक एका टोकाला जातो तेव्हा असलेल्या ऊर्जेचे सतत आदानप्रदान होत असते. बदल होत असतानाही एकूण यांत्रिक ऊर्जा बाहेरून काही प्रतिरोध नसेल तर होती तेवढीच राहते. याचा अर्थ पृथ्वीवरील एकंदर कच्चा माल होता तेवढाच राहतो असा होत नाही काय? संपत्ती जर त्यातूनच निर्माण होत असेल तर ती कमी-जास्त होते हे कसे? वस्तुमान किंवा ऊर्जेच्या संधारणाचे नियम संपत्तीला थेट लागू होत नाहीत.
कारण संपत्ती ही मानवनिर्मित कल्पना असून, विपुल साधनसामग्री, वस्तू आणि सेवा यांच्याशी संबंधित असते. मानवी निर्णयांचा, आर्थिक प्रणालीचा आणि धोरणांचा त्यावर परिणाम होतो. संपत्ती ही दाखवता येईल अशी वस्तू नाही. किंबहुना मालमत्ता साधनसामग्री आणि वस्तूंच्या मूल्यमापनाचे ते परिमाण आहे. आर्थिक प्रणालीमध्ये उत्पादन, उपभोग, गुंतवणूक आणि विविध व्यवहार येतात. त्यातून संपत्तीची निर्मिती किंवा नाश होतो.
संपत्तीवर मानवीय निर्णयानुसार, नव्या शोधांचा, आर्थिक धोरणांचा आणि इतर प्रत्यक्ष बाबींचा परिणाम होतो. वस्तुमानाचे तसे नसते. आर्थिकसंदर्भात नवे शोध, उद्योजकता आणि आर्थिकवाढीतून संपत्ती निर्माण करता येते. त्याचप्रमाणे आर्थिक ऱ्हास, आर्थिक पेचप्रसंग आणि अव्यवस्थेतून संपत्ती नष्ट होऊ शकते. संपत्ती ही गतिमान आणि बदलत जाणारी संकल्पना आहे. मानवी निर्णय आणि बाह्य घटकांच्या परस्पर प्रक्रियेचा तिच्यावर परिणाम होतो. पदार्थ विज्ञानात ज्याप्रमाणे वस्तुमानाच्या बाबतीत ठराविक तत्त्वे चालतात तसे संपत्तीचे होत नाही.
आर्थिक प्रक्रियेतून उप-उत्पादने आणि कचरा निर्माण होतो. त्यातून वस्तुमान संवर्धनात बाधा पोहोचते. अकार्यक्षमता, प्रदूषण व इतर घटकांमुळे आर्थिक मूल्य त्या प्रमाणात न वाढताही वस्तुमानाचे नुकसान होऊ शकते. संपत्तीच्या निर्मितीसाठी प्रत्यक्षातील साधनसामग्री आवश्यक आहे. उपयुक्त कामातून त्याचे मूल्य वाढते. एखादा माणूस कुदळीने खड्डा खणील, दुसरा यंत्र वापरून त्यापेक्षा खोल खड्डा तेवढ्याच वेळात खणू शकेल. संपत्तीच्या निर्मितीसाठी केवळ साधनसामग्री लागत नाही तर संपत्ती सांभाळण्यासाठीही ऊर्जा लागते. मानवता शक्य असेल तेवढी संपत्ती निर्माण करते आणि सांभाळते, तिचा वापर करते. येथेच एक वळण येते, जेथून गरिबी सुरू होते.