दलितविरोधी मानसिकता कधी बदलणार?

By admin | Published: September 1, 2015 09:58 PM2015-09-01T21:58:45+5:302015-09-02T00:06:56+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाने विविध उपक्रम साजरे करण्यासाठी १२५ कोटी रुपये मंजूर केले असून, १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष सामाजिक

When will the anti-Dalit mentality change? | दलितविरोधी मानसिकता कधी बदलणार?

दलितविरोधी मानसिकता कधी बदलणार?

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाने विविध उपक्रम साजरे करण्यासाठी १२५ कोटी रुपये मंजूर केले असून, १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष सामाजिक समता न्याय वर्ष म्हणून साजरे करणार असल्याचे घोषित झाले आहे.
एकीकडे बाबासाहेबांचा शासकीय पातळीवर असा गुणगौरव होत असतानाच दुसरीकडे बाबासाहेबांनी ज्या दलित समाजाला माणुसकीचे हक्क मिळावेत म्हणून आकाशपाताळ एक केले, त्या दलित समाजाला-मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्याच्या चोरंबा गावी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव करण्यात आल्याची मन विदीर्ण करणारी बातमी प्रसिद्ध झाली आहे. या विरोधाभासाची संगती कशी लावावी?
चोरंबा गावात जे काही घडल्याचे सांगण्यात येते ते परंपरेस धरूनच झाल्यामुळे त्यात विशेष नवल नव्हे. ग्रामीण भागात जातीव्यवस्थेच्या रुढी-परंपरा अजूनही इतक्या घट्ट आहेत की, प्रत्येक गावात प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र पाणवठे, स्वतंत्र विहीर अजूनही कायम आहे. डॉ. बाबा आढावांनी सत्तरच्या दशकात ‘एक गाव एक पाणवठा’ ही सामाजिक विषमता नष्ट करणारी मोहीम राबविली होती. पण ग्रामीण भागातून जाती-प्रथेचा पुरस्कार करणाऱ्या जीर्ण रुढी-परंपरा अजूनही मिटलेल्या नाहीत हेच चोरंबा गावातील पाणी प्रकरणाने अधोरेखित केले असेच म्हणावे लागेल.
दलित समाजावर खैरलांजी खर्ड्यासारखे अमानुष अत्याचार करणे , त्यांचे खून करणे, त्यांच्यावर बहिष्कार टाकणे वगैरे हा आपल्या समाजाला जाती-वर्ण-धर्मव्यवस्थेने दिलेला जणू एक मूलभूत अधिकारच आहे. दलितांवर अत्याचार करताना त्याचे म्हणूनच कोणाला काही वाटत नाही. अत्याचार करताना कुणीही आपल्या मनास असा प्रश्न विचारीत नाही की आपण दलितांवर का म्हणून जुलुम करीत आहोत? त्यांचा गुन्हा काय? माणुसकीचा हक्क मागणे, स्वाभिमानाने जगणे हा का गुन्हा ठरतो? नाही. मुळीच नाही. तरीही त्यांच्यावर अमानुष अत्याचार का व्हावेत? त्यांच्यावर बहिष्कार का पडावेत? त्यांचे रक्त का सांडावे? त्यांना मानवी हक्क का नाकारावेत? तर रुढी-परंपरा-धर्मानेच जातीव्यवस्थेस मान्यता देऊन दलितांना अस्पृश्य आणि नीच ठरविले म्हणून! तात्पर्य, दलितांना छळणे, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करणे म्हणजेच धर्माचरण होय. ही सनातनी बुरसटलेली मानसिकता जोवर कायम आहे, तोवर दलितांवर अन्याय अत्याचार होतच राहणार हे उघड आहे.
जालियनवाला बागेत जनरल डायरने जो राक्षसी गोळीबार करून भारतीयांचे प्राण घेतले त्याबाबत माजी ब्रिटीश पंतप्रधान कॅमेरुन व ब्रिटीश राजपुत्राने भारतीयांची जाहीर माफी मागितली. इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर शीख समाजावर जे अत्त्याचार झाले त्याबाबत व हिंदुत्त्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केल्यानंतर कॉँग्रेस, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधींनी शीख व मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागितली. पण शेकडो वर्षे नाहकच दलित समाजावर जे अनन्वीत व अगणित अत्त्याचार आपल्या वर्ण-जातीवादी समाजव्यवस्थेने केले त्याबाबत माफी तर सोडाच पण साधा खेदही कुणी व्यक्त करीत नाही यास कोणता सामाजिक न्याय म्हणावे?
दलित समाज त्याच्यावर होणारे अत्त्याचार सहन करीत असतानाच सनदशीर मार्गाने अत्याचाराचा निषेध करतो. पण निषेध करीत असताना त्याचेकडून क्वचितप्रसंगी तोल गेला की लागलीच त्याला नक्षलवादी ठरविले जाते. दलित संघटनांच्या आक्रोश मोर्चाविरुद्ध प्रति मोर्चा काढून दलित संघटनांवरच कारवाई व्हावी अशी मागणी जात वर्चस्ववादी संघटनांकडून करण्यात येते. दलित हे अत्त्याचार करण्यासाठीच असतात व अत्त्याचार करणे हा आपला मूलभूत हक्कच आहे अशी ही दलितविरोधी सनातनी-सवर्ण मानसिकता जोवर बदलणार नाही तोवर दलित समाजावरील अत्याचार थांबणार नाहीत हे उघड आहे.
म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या सामाजिक समतेच्या चळवळीमुळे समाजात एक सुधारणावादी परिवर्तन जरूर आले. पण आता पुरोगामी चळवळी संपून जातवर्चस्ववादी संघटनांचे पेव गावोगावी फुटल्यामुळे दलित अत्त्याचारात वाढ होत आहे. दुसरीकडे दलित पुढारी व काही दलित लेखक-विचारवंत कॉँग्रेसची शागिर्दी करून झाल्यावर भाजपा-सेनेच्या वळचणीला जाऊन परिवर्तनवादी चळवळीलाच नख लावण्याचे घोर पातक करीत आहेत. कॉँग्रेसकडून आजवर भरपूर पदांचे फायदे करून घेतलेले एक अर्थशास्त्रज्ञ आता कॉँग्रेसची सत्ता जाताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भलामण करू लागले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे करीत असताना दलितांवरील अत्त्याचार थांबून, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कशी वाढेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल व अत्त्याचार रोखण्याच्याबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल या अनुषंगाने विचारमंथन व्हावे ही अपेक्षा. दुसरे काय?
- बी. व्ही. जोंधळे

Web Title: When will the anti-Dalit mentality change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.