अधिकारी जनतेत कधी जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:43 AM2018-08-08T03:43:30+5:302018-08-08T03:43:41+5:30
उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत.
उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत. परंतु शहराची ही समस्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतलेलीच नाही. त्यामुळेच की काय जूनअखेरीस शहरात केवळ २६६ खड्डे असल्याचा अजब दावा मनपातर्फे करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारात मनपाने दिलेली ही माहिती प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुनाच आहे. मुळात अशाप्रकारची उत्तरे तेव्हाच येतात, ज्यावेळी अधिकाºयांना प्रत्यक्ष तळागाळातील समस्यांची जाण नसते. वातानुकूलित दालनांमध्ये बसून धोरणे तयार होतात, निर्णय होतात. मात्र प्रत्यक्षात नागरिकांची नेमकी आवश्यकता काय व त्यांच्या अपेक्षा-अडचणी काय हे जाणून घेण्याचे कष्ट फारसे होताना दिसून येत नाहीत. मुळात अधिकारी हे जनता व प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असतात. त्यामुळे नागरिकांशी त्यांचा संवाद असणे अत्यावश्यक असते. परंतु आपली खुर्ची टिकवून ठेवण्याच्या नादात नागरिकांपेक्षा राजकारण्यांशी ‘सु’संवाद वाढविण्यावर जास्त भर देण्यात येतो. एखाद्या राजकारण्याला अडचणीत आणणाºया मुद्याला बेमालूमपणे दुसरी दिशा देण्यात येते. याची माहिती ना जनतेपर्यंत पोहोचते, ना याच्यावर प्रश्न उपस्थित होतात. नागपूर मनपाची खड्ड्यांच्या माध्यमातून झालेली ही ‘पोलखोल’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कुठल्याही रस्त्यावर गेले तर खड्ड्यांनी अधिकाºयांचेदेखील स्वागत होतेच. असे असतानादेखील कागदोपत्री केवळ सोयीस्कर आकडे दाखविणे ही प्रशासकीय अकार्यक्षमतेकडेच संकेत करणारी बाब आहे. जर कनिष्ठ अधिकाºयांनी असे दिशाभूल करणारे आकडे मांडले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमतदेखील दाखविण्यात येत नाही. फक्त रस्तेच नाही तर अनेक प्रशासकीय बाबींमध्ये ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे धोरण घेऊन अधिकारी बसतात. तंत्रज्ञानाच्या युगात तर संवाद साधण्यासाठी अनेक मंच उपलब्ध आहेत. मात्र ‘सोशल’ होणे आपल्याच अंगावर येऊ शकते याची जाण अधिकाºयांना चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळेच ‘कशाला हवी ती ब्याद’ असे म्हणत एका चौकटीत कार्य करण्यावर त्यांचा भर असतो. केवळ मनपाच नाही तर विविध सरकारी विभागांमध्ये असेच दुर्दैवी चित्र आहे. राजकारण्यांना जनतेचे महत्त्व चांगल्या पद्धतीने ठाऊक असते. निवडणुकांच्या काळात तरी त्यांच्यासाठी जनता ‘जनार्दन’ असते. अधिकाºयांनीदेखील जनतेत जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल घडून आला नाही तर असे ‘खड्डेपुराण’ वारंवार अनुभवायला मिळेल यात शंका नाही.