भारत केव्हा घडवेल असाधारण प्रतिभेचे शास्त्रज्ञ?

By रवी टाले | Published: January 5, 2019 01:41 PM2019-01-05T13:41:28+5:302019-01-05T13:47:29+5:30

भारतात शास्त्रज्ञांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये सगळेच केवळ आचार्य पदवीच्या आधारे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे नाहीत, तर अनेक चांगले शास्त्रज्ञही आहेत; मात्र दुर्दैवाने ज्यांना असाधारण प्रतिभेचे म्हणता येईल, अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच भरते.

When will India Produced an exceptional talent scientist? | भारत केव्हा घडवेल असाधारण प्रतिभेचे शास्त्रज्ञ?

भारत केव्हा घडवेल असाधारण प्रतिभेचे शास्त्रज्ञ?

googlenewsNext
ठळक मुद्देक्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या विश्लेषणाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनीने नुकतीच जारी केलेली जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी!क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीतील शास्त्रज्ञांमध्ये केवळ दहा भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश आहे. दहा आघाडीच्या देशांमध्ये अपेक्षेप्रमाणे अमेरिका सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. अमेरिकेच्या तब्बल २,६३९ शास्त्रज्ञांना यादीत स्थान मिळाले आहे.

विज्ञान कोणत्याही देशाला ओळखत नाही; कारण ज्ञान ही मानव जातीची अमानत आणि जगाला प्रकाशमान करणारी मशाल आहे! जगाला लसीकरण, सूक्ष्मजीव किण्वन आणि पाश्चरायझेशन या तीन अनमोल देणग्या दिलेले विख्यात शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे हे वचन कुणीही खोडून काढू शकत नाही; मात्र तरीदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेतलेले देशच विकसित देश म्हणून ओळखल्या जातात, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! लुई पाश्चर यांच्या या वचनाचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे, माहितीच्या क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या विश्लेषणाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनीने नुकतीच जारी केलेली जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी!
क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीतील शास्त्रज्ञांमध्ये केवळ दहा भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश आहे. समाधानाची बाब एवढीच, की ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. यादीत सर्वाधिक संख्येने शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या दहा आघाडीच्या देशांमध्ये अपेक्षेप्रमाणे अमेरिका सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. अमेरिकेच्या तब्बल २,६३९ शास्त्रज्ञांना यादीत स्थान मिळाले आहे. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास, यादीत एकट्या अमेरिकेचेच सुमारे ६० टक्के शास्त्रज्ञ आहेत. अमेरिका जगातील एकमेव महाशक्ती का आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी यापेक्षा अधिक माहितीची गरज आहे, असे वाटत नाही. अमेरिकेखालोखाल ५४६ शास्त्रज्ञांसह ब्रिटन दुसऱ्या, तर ४८२ शास्त्रज्ञांसह चीन तिसºया क्रमांकावर आहे. त्याशिवाय जर्मनी, आॅस्टेÑलिया, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि स्पेन या देशांचा ‘टॉप टेन’ देशांमध्ये समावेश आहे. यापैकी प्रत्येक देशाच्या शंभरपेक्षा जास्त शास्त्रज्ञांचा यादीत समावेश आहे. या यादीवर नुसती एक नजर टाकली तर असे लक्षात येते, की हे सर्वच देश विकसित देश म्हणून ओळखल्या जातात. याचाच दुसरा अर्थ असा की ज्या देशांमध्ये प्रभावशाली शास्त्रज्ञांचा दुष्काळ आहे, ते देश अविकसित किंवा विकसनशील देशांच्या श्रेणीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान आणि विकास यांचा कसा संबंध आहे, हे यावरून स्पष्ट होते.
ज्या देशासोबत आपण स्पर्धा करू बघत आहोत, त्या चीनच्या तुलनेत आपण कुठेही टिकत नाही, हे क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीवरून स्पष्ट होते. इथे प्रश्न केवळ संख्येचा नाही. आचार्य (पीएचडी) ही पदवी प्राप्त करून स्वत:स शास्त्रज्ञ म्हणवून घेणाºयांचा विचार केल्यास, कदाचित भारताचा हात एकही देश धरू शकणार नाही; पण क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. त्या यादीत अत्यंत कडक निकष लावून शास्त्रज्ञांचा समावेश केला जातो. स्वत: पंतप्रधान अध्यक्ष पद भुषवित असलेल्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेत पाच हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ एका शास्त्रज्ञाचा क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीत समावेश झाला आहे. भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे, हे यावरून स्पष्ट व्हावे!
खुल्या आर्थिक नीतीचा अंगिकार केल्यानंतर भारताने जी आर्थिक प्रगती केली आहे, त्यामुळे आमच्या राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य माणसालाही भारत महासत्ता म्हणून ओळखला जावा, असे वाटू लागले आहे. भारत सध्याच्या घडीला जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ब्रिटनला मागे टाकून जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल; पण केवळ अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या आधारे कोणताही देश महासत्ता हे बिरुद मिरवू शकत नाही. वैज्ञानिक संशोधनामधील भक्कमपणा आणि नवकल्पनांचे सृजन हाच महासत्ता आणि इतर देशांमधील मुख्य फरक असतो. चीनने ते ओळखले आहे आणि त्या दिशेनेच त्या देशाचे मार्गक्रमण सुरू आहे. त्यामुळेच यावर्षी क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीत जर्मनीला मागे टाकत चीनने तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. कालपरवाच चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून कधीही न दिसणाºया भागात आपले यान यशवीरीत्या उतरवून, जे आजवर अमेरिका आणि रशियालाही जमले नाही ते करवून दाखविले. यामध्ये केवळ आपल्या क्षमतेचे प्रदर्शन घडविणे एवढाच विषय नसतो, तर अशा प्रकल्पांसाठी विकसित केले जाणारे तंत्रज्ञान त्या देशाला पुढे घेऊन जाण्यात मोठी भूमिका अदा करीत असते. अमेरिका हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतात शास्त्रज्ञांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये सगळेच केवळ आचार्य पदवीच्या आधारे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे नाहीत, तर अनेक चांगले शास्त्रज्ञही आहेत; मात्र दुर्दैवाने ज्यांना असाधारण प्रतिभेचे म्हणता येईल, अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच भरते. क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्सच्या यादीत त्याचेच प्रतिबिंब उमटले आहे. ज्याला भारताची जगाला देण म्हणता येईल, असे किती शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावले आहेत? ज्या शोधांमुळे मानवाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीस कलाटणी मिळाली अशा शोधांपैकी किती शोध भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर आहेत? दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे निराशाजनक आहेत. या परिस्थितीसाठी केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. सरकार संस्था उभारू शकते, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ शकते; पण भावी पिढ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षण केवळ चार पैसे कमविण्यासाठी नव्हे, तर संशोधनासाठी घेतले पाहिजे, हे बिंबविण्याचे काम, सर्वसामान्य नागरिकांनाच करावे लागेल. देशाला महासत्ता म्हणून ओळख केवळ आर्थिक बळावर मिळणार नाही, तर जोडीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातदेखील घोडदौड करावी लागेल, हे ज्या दिवशी आम्हा भारतीयांच्या डोक्यात शिरेल, तो देशासाठी सुदिन असेल!

 

Web Title: When will India Produced an exceptional talent scientist?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.