कधी घेणार आम्ही धडे ?

By रवी ताले | Published: February 27, 2018 12:37 AM2018-02-27T00:37:13+5:302018-02-27T00:37:13+5:30

एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या.

When will we learn? | कधी घेणार आम्ही धडे ?

कधी घेणार आम्ही धडे ?

Next

अकोला शहरातील मातानगर झोपडपट्टीत गत गुरुवारी भीषण अग्नितांडव घडले. एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पण मोठ्या संख्येने कुटुंबे उघड्यावर आली, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच!
गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबांमध्ये पाणी भरण्यासाठीचा ‘हायड्रंट’च बंद पडलेला होता. त्यामुळे बंब रिकामे झाल्यावर पुन्हा पाणी भरून आणण्यासाठी खूप धावपळ उडाली आणि अमूल्य वेळ वाया गेला. ही अत्यंत अक्षम्य स्वरूपाची हलगर्जी म्हणावी लागेल; पण हा मजकूर लिहित असताना तरी त्यासाठीची जबाबदारी निश्चित झालेली नव्हती!
अलीकडे लहान-मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होत असते. पुढचे काही दिवस त्यावर चर्चा होते, उपाययोजनांसंदर्भात गप्पा झडतात आणि काही दिवसांतच त्या घटनेचा विसर पडतो!
गत काही वर्षांपासून जगभर लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये केंद्रीकरण होऊ लागले आहे. रोजगारासाठी लोक शहरांमध्ये येतात आणि नाईलाजास्तव झोपडपट्ट्यांचा आसरा घेतात. तेथील झोपड्या अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या असतात. साहजिकच आग लागल्यास ती फार झपाट्याने पसरते आणि रस्त्यांच्या अभावामुळे अग्निशमन विभागाचे काम कठीण होऊन बसते.
अपघात पूर्णत: टाळणे कधीच शक्य नसते; पण किमान त्यांची वारंवारिता कमी करणे आणि अपघात झालाच, तर हानीचे प्रमाण किमान पातळीवर राखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य असते. त्यासाठी उदाहरणांवरून धडे घेण्याची आणि त्या अनुषंगाने भविष्यासाठी तयारी करण्याची गरज असते. नेमके इथेच आपण कमी पडतो.
अकोल्याच्या आगीचेच उदाहरण घ्या! शहरातील एकमेव ‘हायड्रंट’ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ‘हायड्रंट’ असल्यास अग्निशामक बंब जास्त खेपा करू शकतात. शिवाय एक ‘हायड्रंट’ बंद असला, तरी दुसºया ‘हायड्रंट’चा वापर केला जाऊ शकतो. झोपडपट्ट्यांमध्ये आग लागण्याचे प्रमाण मोठे आहे, हे लक्षात घेऊन झोपडपट्ट्यांनजीक ‘हायड्रंट’ची निर्मिती झाल्यास, आग लवकर आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते.
याशिवाय झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांमध्ये आगीची संभाव्य कारणे, त्यापासून बचाव, स्वयंपाकाच्या सुरक्षित पद्धती इत्यादी मुद्यांच्या अनुषंगाने जनजागृतीपर मोहीम राबविण्याचाही लाभ होऊ शकतो. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्याची गरज आहे. झोपडपट्ट्यांमधील आगीच्या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची आत्यंतिक निकड आहे. राज्य सरकारकडून तशा पुढाकाराची अपेक्षा करावी का?
- रवी टाले(ravi.tale@lokmat.com)

Web Title: When will we learn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग