तुम्ही कधी बदलणार; देश कधी बदलणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 07:26 AM2021-06-21T07:26:25+5:302021-06-21T07:27:14+5:30
एखादा भारतीय ॲथलिट ऑलिम्पिक सुवर्ण घेऊन येईल, हे स्वप्न मागे ठेवून मिल्खा सिंग आपल्यातून गेले. त्यांची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी आदरांजली...
- विजय दर्डा
‘फ्लाइंग सिख’ हा किताब मिळवणाऱ्या मिल्खा सिंग यांना माझा नमस्कार. त्यांचे स्मरण करताना मनात दोन प्रश्न उभे राहतात. आपण असा धावपटू पुन्हा तयार करू शकू का? हा पहिला आणि मिल्खा सिंग यांचे अधुरे स्वप्न केव्हा पूर्ण होईल? भारतीय ॲथलिट ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवेल हे त्यांचे स्वप्न होते. मला वाटते की त्यांचे स्वप्न अधुरे ठेवून त्यांना श्रद्धांजली कशी अर्पण करता येईल?
राष्ट्रकुल खेळात मिल्खा सिंग धावले आणि ४० वर्ष न तुटलेला विक्रम त्यांनी प्रस्थापित केला तेव्हा त्यांच्याकडे साधने नव्हती. तो काळ मोठा कठीण होता. चांगले बूट नसायचे. पौष्टिक खाणे कसे असते हे माहीत नव्हते. सरावाच्या वेळी तर ते पायात काही न घालता धावायचे. तरीही त्यांनी कमाल केली. त्यांची पत्नी निर्मल कौर राष्ट्रीय व्हॉलिबॉल संघाची कप्तान होती. मुलगा जीव गोल्फ खेळत असे. भारतीय ॲथलिट ऑलिम्पिक सुवर्णपदक का मिळवू शकत नाही ही त्यांची खंत होती. वेळोवेळी हे स्वप्न त्यांनी बोलून दाखवले; पण दुर्दैवाने हयातीत ते पूर्ण झालेले त्यांना पाहता आले नाही.
मिल्खा सिंग यांचे निधन झाल्यावर आज देश त्यांच्या स्वप्नाचीही आठवण करत आहे. खेळात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल बोलले जात आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह सगळ्या देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मी विचार करतोय की, जे स्वप्न त्यांनी पाहिले, ते पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पायात काही न घालता धावल्याने त्यांच्या पायांची साले निघाली. त्यांना स्मरून खेळाडूंची नवी पिढी आपण तयार करू शकू. ध्यानचंद यांचेही स्वप्न होते की भारताने पुन्हा हॉकीचा जगज्जेता व्हावे!
मिल्खा सिंग आणि ध्यानचंद यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक आघाड्यांवर काम करावे लागेल. सर्वात आधी हे समजून घ्यावे लागेल की खेळ केवळ शारीरिक क्षमता वाढवण्याचे माध्यम नाही. खेळाचा थेट संबंध आपली राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, उन्नती आणि देशाच्या स्वाभिमानाशी आहे. तिरंगा फडकतो आणि जन गण मनचे स्वर गुंजतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात हे ध्यानात घ्या. जिंकणाऱ्याच्या डोळ्यांतून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागतात. मैदानात जिंकण्याचा उत्सव व्हावा, तिरंगा फडकावा, जन गण मनची धून वाजावी हेच मिल्खा सिंग यांचे स्वप्न होते.
आता परिस्थिती खरोखरच बदलतेय. किरण रिजिजू खूप चांगले मंत्री आहेत. देशात खेळाला प्रोत्साहन मिळावे, असे त्यांना वाटते. खेळाबद्दल सरकार जागरूक होत आहे असे म्हणता येईल. खेळावर खर्च केला पाहिजे असे सरकारला वाटतेय. परंतु स्थिती इतकीही बदलली नाहीये की आपण एखादा मिल्खा सिंग उभा करू शकू. आपल्याला प्रत्यक्षात खेळाडूंची पिढी तयार करायची असेल तर चीन, रशिया, क्रोएशिया यांच्याकडून बरेच शिकावे लागेल. त्या देशांनी मुले कशी हेरली, तयार केली हे पहावे लागेल. आज खेळाच्या मैदानावर या देशांचे खेळाडू गाजत असतात. तिथले सरकार त्यांच्या पाठीशी सदैव उभे असते हे जाणवते. मला आठवते, विश्वचषक सामना पाहत होतो, क्रोएशियाचा संघ जिंकला तेव्हा तिथल्या राष्ट्रपती कोलिंडा ग्रेबर ड्रेसिंग रूममध्ये अभिनंदनासाठी पोहोचल्या. घामेजल्या खेळाडूंना त्यांनी मिठीच मारली. चुंबनाचा वर्षाव केला. आपल्याकडे हे दृश्य केव्हा दिसेल?
आपल्या देशात खेळाची स्थिती काय आहे हे आपण सर्व जाणतो. शालेय स्तरावरच आपण कोणता मुलगा कोणता खेळ चांगला खेळू शकेल हे हेरले पाहिजे. त्यांचीच निवड करून त्यांना त्याच स्तरावर प्रशिक्षणही मिळाले पाहिजे. परंतु मुले आज खेळाच्या मैदानापासून दूर गेलेली दिसतात. मोबाइलच्या पडद्यात ती कैद झाली आहेत. त्यांच्या मातापित्यांना काळजी नाही आणि सरकारला तर त्याहून नाही. खेळाची मैदानेही आक्रसत चालली आहेत. तिथे सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. आज आपल्यात सायना नेहवाल तयार होत असेलही; पण त्यात सरकारचा काही वाटा नाही.
सायना पाच वर्षांची असल्यापासून तिला तालीम देणाऱ्या आईच्या इच्छाशक्तीची ती निर्मिती असते. मुलीला जगज्जेता बनवण्याचा संकल्प तिने केलेला असतो. सायना नेहवालची आई उषाराणी सात महिन्यांच्या गर्भवती असताना एक स्थानिक मॅच खेळतात, ही त्यांची खेळाप्रति असलेली उत्कट आवड आहे. सायना नेहवाल असो, सानिया मिर्झा असो, वा मेरी कोम असे खेळाडू स्वत:च्या बळावर संघर्ष करून मैदान गाजवताना दिसतात. अनेकांत क्षमता असतात, मात्र अनेक कारणांनी ते खेळाडू पुढे जाऊ शकत नाहीत. खेळापासून राजकारण दूर ठेवले तरच यश दिसेल. मी एकदा ऐकले होते की जगात नाव कमावणारी महाराष्ट्राची नेमबाज अंजली भागवतला खूप त्रास दिला गेला होता. अशा अनेक घटना समोर येत असतात. असे असेल तर कोण खेळाप्रति आपले जीवन समर्पित करील?
क्षमता असलेली मुले शोधून त्यांना तयार करणे अशक्य नाही. केवळ तशी दृष्टी हवी. तुम्ही मुले शोधा आणि उद्योग समूहांना सांगा, यांना तयार करा. सरकारचा हस्तक्षेप नको आणि उद्योग समूहांना पूर्ण मुभा हवी हे यात लक्षात ठेवावे लागेल. क्रिकेटच्या उन्मादात दुसरे खेळ नष्ट होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. क्रिकेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ नाही. तो राष्ट्रकुल वा ऑलिम्पिक स्पर्धांत नाही हे समजून घ्यावे लागेल. हा क्लबातला खेळ असला तरी भारतात तो जणू धर्म झाला आहे. क्रिकेटमध्ये खूप पैसा आहे. त्यातल्या घोटाळ्यांच्या कथा वेगळ्या आहेत. मी त्यावर बोलू इच्छित नाही. मिल्खा सिंगचे स्वप्न पूर्ण करणे आणि जागतिक पटलावरच्या खेळात तिरंगा फडकावण्यासाठी आपल्याला मुलांत उत्साह, ईर्षा, प्रेम उत्पन्न करण्याची आज गरज आहे, इतकेच मला यावेळी म्हणायचे आहे.
शेवटी व्यवस्थेला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी बदलणार, देश कधी बदलणार आणि त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार?
(लेखक लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)