भगवानगड कुणाचा?

By admin | Published: September 29, 2016 04:08 AM2016-09-29T04:08:57+5:302016-09-29T04:08:57+5:30

भगवानगड आणि मुंडे हे एक समीकरण आहे. गडावरील दसरा मेळाव्याला विरोध म्हणजे थेट पंकजा मुंडे यांना विरोध. वंजारी समाजावर वर्चस्व कोणाचे, या लढाईची ही सुरुवात दिसते.

Where is Bhagwan? | भगवानगड कुणाचा?

भगवानगड कुणाचा?

Next

- सुधीर लंके

भगवानगड आणि मुंडे हे एक समीकरण आहे. गडावरील दसरा मेळाव्याला विरोध म्हणजे थेट पंकजा मुंडे यांना विरोध. वंजारी समाजावर वर्चस्व कोणाचे, या लढाईची ही सुरुवात दिसते. गडाच्या महंतांना कुणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय ते मुंडेंना रोखणार नाहीत.

गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार पंकजा मुंडे यांचा आवाज या वर्षी भगवानगडावर दसरा मेळाव्यात घुमणार की नाही, याबाबत वंजारी समाजासह राजकीय क्षेत्रालाही उत्सुकता लागली आहे. गडाच्या महंतांनी यापुढे गडावर राजकीय सभा घेण्यास विरोध दर्शविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगर जिल्ह्यातील भगवानगड हे विविध जाती-धर्मांचे श्रद्धास्थान असले तरी वंजारी समाज गडाला आपले दैवत मानतो. समाजासाठी ते अस्मितेचे केंद्र आहे. नगर व बीड यांच्या सीमारेषेवर हा अध्यात्मिक गड आहे. संत भगवानबाबा यांनी त्याची निर्मिती केली. गडावर त्यांनी उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन व शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण १९५८ साली मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते, त्यावरुन गडाची समाजमान्यता व राजमान्यताही लक्षात यावी.
भगवानबाबांनीच या गडावर दसऱ्याचा उत्सव सुरु केला. खेड्यापाड्यातील लोक एकत्र यावेत, त्यांनी एकमेकांची सुख-दु:खे विचारावीत हा त्यांचा हेतू होता. या दिवशी येणाऱ्या भाविकांना तिथे ‘गुरुमंत्र’ दिला जातो. आजही ती परंपरा टिकून आहे. वंजारी समाजात ऊसतोड कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. हे कामगार न चुकता दसऱ्याला गडावर असतात. दिवंगत गोपीनाथ मुंडे हेही गडाचे भाविक होते. मृत्युपूर्वी सलग ३५ वर्ष त्यांनी गडावरील दसरा महोत्सव चुकविला नाही. भगवानगडाला वंजारी समाजात मोठे स्थान असल्याचे ओळखूनच मुंडे यांनी त्याचा अस्मिता म्हणून वापर केला. नव्वदच्या दशकात त्यांनी येथे मेळावा घेऊन राजकीय-सामाजिक संदेश देण्यास सुरुवात केली.
शिवसेनेची मुंबईत जशी दसरा मेळाव्याची परंपरा आहे, तशीच परंपरा येथे मुंडे यांनी निर्माण केली. कालांतराने भगवानगड म्हटले की गोपीनाथ मुंडे असेच समीकरण बनले. उप-मुख्यमंत्री असताना त्यांनी या गडाचा मोठ्या प्रमाणावर विकासही केला. भगवानबाबांच्या नावाने टपाल तिकीट काढले. ओबीसी नेत्यांनाही त्यांनी गडावरुन संघटित केले. एका मेळाव्याला मुंडेंसह महादेव जानकर, छगन भुजबळ, सदाभाऊ खोत यासह ओबीसी नेते एकत्र आले होते. ‘गडावरुन मला मुंबई, दिल्ली दिसते’ असे, मुंडे थेटपणे सांगायचे. त्यांच्या या दसऱ्याच्या ‘मंत्राला’ वंजारी समाजही प्रतिसाद द्यायचा.
२००३ पासून नामदेवशास्त्री हे या गडाचे महंत आहेत. मुंडे हयात असताना शास्त्रींनी दसरा मेळाव्याला विरोध केला नाही. तेही मेळाव्याच्या व्यासपीठावर असायचे. मुंडे यांचे निधन झाल्यानंतर ‘पंकजा ही आता भगवानगडाची कन्या आहे’, अशी घोषणा त्यांनी केली होती. पंकजा यांनी गत दोन वर्षे गडावर दसरा मेळावाही घेतला. गत वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मेळाव्यासाठी आले होते. या वर्षी मात्र, गडावर राजकीय सभा घेता येणार नाही, अशी भूमिका महंतांनी व ट्रस्टींनी घेतली आहे. त्यामुळेच शंकेची पाल चुकचुकली आहे.
महंतांच्या भूमिकेस मुंडे समर्थकांचा विरोध आहे. मेळावा होणारच, महंतांना पटत नसेल तर त्यांनी गादी सोडावी, असे मुंडे समर्थक म्हणतात. ‘महंत विरुद्ध मुंडे’, ‘अध्यात्म विरुद्ध राजकारण’ अशी ही लढाई दिसते. पण, त्यापेक्षाही पंकजा मुंडे यांना आता गडावरुन राजकीय मदत करायची की नाही, हे राजकारण यामागे शिजत असावे असाही एक तर्क आहे. हा प्रश्न थेट गडाच्या मालकीशी, पर्यायाने वंजारी समाजावरील वर्चस्वाशी निगडीत आहे. महंतांना व ट्रस्टींना बाहेरुन कुणाची तरी साथ असल्याशिवाय ते मुंडे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा रोखण्याचे धाडस करतील असे वाटत नाही.

Web Title: Where is Bhagwan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.