आपल्या आई-वडिलांच्या काळात ‘ग्लोबल वॉर्मिंग’कुठे होते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 07:19 AM2022-05-23T07:19:57+5:302022-05-23T07:20:18+5:30
चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची गरज वाटली नाही.
- लोकेश बापट
कालच - रविवारी जैवविविधता दिवस साजरा झाला. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची गरज वाटली नाही, कारण तेव्हा शहरांची महानगरे झाली नव्हती. लोकसंख्या मर्यादित होती. डोंगर व टेकड्या यांना त्यांचे स्वतःचे अस्तित्व होते. नद्या, विहिरी, ओढे निर्मळ होते.
जीवनमान बदललेले नसल्याने हवेचे प्रदूषण वगैरे चर्चेत नव्हते. ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर लोकसंख्या वेगाने वाढू लागली. लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत गेले. गरजा बेसुमार वाढू लागल्या. औद्योगिकरण विकासाचा वेगही प्रचंड वाढला. मानव व पर्यावरणाचा संघर्ष सुरू झाला. लोभ, स्वार्थ, पैसा, फायदा, हव्यास व लालसेपोटी या विकासाने वृक्ष, वेली, झाडे, डोंगर, टेकड्या, पाणी, पशु-पक्षी, हवा, माती हे सारे गिळून टाकायला सुरूवात केली. निसर्गातील प्रत्येक परिसंस्थांवरचा ताण वाढत गेला. यामध्ये अनेक परिसंस्था नष्ट झाल्या. मानवी कृत्यामधून निर्माण झालेला अतिरिक्त ताण सहनशक्तीच्या पलीकडे गेला तर परिसंस्था कोलमडून पडण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात मानव जातीच्या अस्तित्वाला हा मोठा धोका ठरू शकतो.
- दोन वर्षांपूर्वी एका छोट्या विषाणूने हेच जगाला दाखवून दिले. त्याने जगभरातील सर्व लोकांना काही महिने घरात कैद करून ठेवले आणि निसर्गाने त्या छोट्याशा कालावधीत माणसांच्या मदतीशिवाय आपले काम चोख बजावले. हवा स्वच्छ झाली, नद्या, ओढे, विहिरी यातील पाणी स्वच्छ झाले, अनेक वर्ष लोप पावलेली झाडेझुडपे, पक्षी, प्राणी आशा काही प्रजातींचे पुन्हा दर्शन झाले. हे का घडले? तर मानवाची निसर्गातील लुडबूड काही काळापुरती बंद झाली, म्हणून! खरंतर निसर्गाला माणसाची कधीच गरज नव्हती. आपण मात्र ‘बिनबुलाये मेहमान’सारखे त्याच्या घरात विनाकारण घुसलो आणि आता ते घर बळकावण्याचा सोस आपल्याला लागला आहे. आज निसर्ग रक्षण जर खरंच करायचं असेल, तर मानवाने भविष्यात निसर्गात कोणताही, कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप न करता त्याला त्याचे काम करू द्यावे. - lokeshbapat@gmail.com