‘ते’ कुठे कमी पडले
By admin | Published: June 20, 2017 12:37 AM2017-06-20T00:37:30+5:302017-06-20T00:37:30+5:30
टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यासह तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावण्याचे भारताचे स्वप्नही धुळीस मिळाले
रविवारी क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात संभाव्य विजेत्या टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यासह तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावण्याचे भारताचे स्वप्नही धुळीस मिळाले. यानंतर क्रिकेटचाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरलीच, त्याचबरोबर कधी नव्हे ते या पराभवामुळे कोहली सेनेवर ‘विराट’ टीकाही झाली. मुळात हे अपयश पाकिस्तानविरुद्ध आल्यानेच हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला. परंतु, दुसरीकडे झालेल्या सकारात्मक गोष्टींकडे मोजक्याच लोकांचे लक्ष गेले. परंतु, त्या आनंदावर क्रिकेटमधील अपयशामुळे पाणी फेरले.
एकीकडे, लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध लोटांगण घालत असताना, दुसरीकडे याच शहरात झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ असे लोळवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना सुरू झाल्यानंतर काहीवेळातच, बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतने जपानच्या काझुमासा सकाईला नमवून इंडोनेशिया सुपर सिरिज स्पर्धा जिंकल्याची बातमी आली. आधी बॅडमिंटन आणि नंतर हॉकीमध्ये मिळालेल्या गोड बातमीनंतर भारतीय क्रीडाविश्वाचे लक्ष क्रिकेटकडे लागले होते. मात्र, या दोन्ही खेळाचे दुर्दैव की, मोजके भारतीय सोडले तर करोडो भारतीयांना आस लागली होती ती, क्रिकेटच्या मैदानावरील यशाची.
क्रिकेटमधील पराभवावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उशिरा का होईना, पण हॉकी आणि बॅडमिंटनमधील यशाचे कौतुक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून झाले. परंतु, जर का टीम इंडियाने क्रिकेटचे मैदान जिंकले असते, तर सगळीकडे विराट सेनेचे गोडवे गायले असते आणि कदाचित त्या लाटेमध्ये हॉकी टीम आणि श्रीकांतचे यश वाहून गेले असते. हॉकी संघ आणि श्रीकांतचे कौतुक करण्यात झालेली कमतरता पाहता एक प्रश्न खूप सतावतो, ‘ते नक्की कुठे कमी पडले?’