‘शंभर पायऱ्यांच्या शिडी’वर तुम्ही कुठे उभे आहात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:52 IST2025-01-18T08:51:26+5:302025-01-18T08:52:59+5:30
आपण मध्यमवर्गीयांना गरीब आणि अगदी वरच्या पातळीवर असलेल्यांना मध्यमवर्गीय म्हणत आहोत. या गैरसमजातून आपले सरकार कधी मुक्त होईल?

‘शंभर पायऱ्यांच्या शिडी’वर तुम्ही कुठे उभे आहात?
- योगेंद्र यादव
(राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया)
शिक्षक असताना माझ्या विद्यार्थ्यांसमवेत मी बऱ्याचदा एक प्रश्नरूप खेळ खेळायचो. मी त्यांना शंभर पायऱ्या असलेल्या एका उंच शिडीची कल्पना करायला सांगायचो. ‘देशातील सर्वांत गरीब व्यक्ती पहिल्या आणि सर्वांत श्रीमंत व्यक्ती शंभराव्या पायरीवर असेल तर तुमचे कुटुंब कोणत्या बरे पायरीवर असेल?’- असा प्रश्न मी त्यांना विचारायचो. त्यांची उत्तरे आली की, मी त्यांना देशभरातील प्रत्यक्ष आकडे दाखवत असे. ते पाहून बहुधा माझे विद्यार्थी चक्रावून जात. यातूनच त्या विद्यार्थ्यांचा ‘भारताचा शोध’ चालू व्हायचा.
२०२३-२४ सालातील ग्रामीण आणि शहरी भारतातील कौटुंबिक उत्पन्नाचे आकडे भारत सरकारने नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. याला ‘हाउसहोल्ड कंजप्शन एक्सपेंडिचर सर्व्हे’ असे म्हणतात. म्हणजे घरगुती उपभोग्य वस्तूंवरील खर्चाची पाहणी. देशातील सर्वाधिक विश्वसनीय स्रोतांत या सर्वेक्षणाचा समावेश होतो आणि सरकारची बहुतांश धोरणे त्यावरच आधारलेली असतात.
चला तर मग, याच आकड्यांच्या साहाय्याने ‘भारताचा शोध’ हा खेळ खेळूया. कृष्णन साहेबांच्या घरापासूनच सुरुवात करू. सरकारी बँकेत बढती मिळून नुकतेच ते शाखाधिकारी झालेत. त्यांचे मासिक उत्पन्न सव्वा लाख आहे. त्यांच्या पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना दरमहा ३५ हजार पगार मिळतो. दोन मुले आहेत. या कुटुंबाने पाचेक वर्षांपूर्वी स्वत:चा फ्लॅट घेतला. एक छोटी कार आहे. मुलाकडे मोटारसायकल आहे. बेडरूममध्ये एसी आहे. त्यांच्याकडे घरकामासाठी येणारी कांता दरमहा ८ हजार कमावते.
कांताचा नवरा सुरेश ड्रायव्हर आहे. त्याला महिना १५ हजार पगार आहे. हे दोघे आपल्या तीन मुलांसह एका भाड्याच्या घरात राहून एव्हढ्या पैशात सगळे भागवत असतात. यंदा स्कूटर घेणार आहेत. हे एक कष्टकरी कुटुंब आहे. कृष्णन साहेबांच्या बँकेत खन्ना साहेबांचे खाते आहे. खन्नांची एक छोटीशी फॅक्टरी आहे. दरमहा अडीच-तीन लाख रुपये कमावतात. घरी पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई असते. मोठे घर, दोन गाड्या आहेत. खाऊन-पिऊन सुखी परिवार आहे; पण ते खानदानी श्रीमंत मात्र नाहीत.
प्रचलित भाषेत कृष्णन यांना मध्यमवर्गीय, खन्ना यांना उच्च मध्यमवर्गीय आणि कांताला गरीब म्हटले जाईल. शंभर पायऱ्यांच्या शिडीवर त्यांची जागा कुठे असेल? बहुधा आपण कांताला २० व्या पायरीवर ठेवू, कृष्णन यांना ५० ते ६० च्या दरम्यान कुठेतरी आणि खन्ना साहेबांना ८०-९० व्या पायरी दरम्यान. परंतु मित्रहो, सत्य परिस्थितीत हा अंदाज सपशेल चुकत आहे.
ताज्या आकड्यानुसार, शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचा (मध्यमवर्ग म्हणजे ४० ते ६० या दरम्यानच्या पायरीवरचा वर्ग) व्यक्तीगणिक सरासरी मासिक खर्च ४००० रुपयांहून कमी आहे. याचा अर्थ वीस-पंचवीस हजारांत चार-पाच लोकांचे कुटुंब चालवणारे कांता-सुरेश हेच शहरातील खरे मध्यमवर्गीय आहेत. प्रत्येक व्यक्तीमागे जे दरमहा ३००० रुपयेही खर्च करू शकत नाहीत, ते शहरी भागात २० व्या पायरीवर आहेत.
गेल्या वर्षीच्या आकड्यांनुसार प्रत्येक व्यक्तीमागे २०,००० रुपयांहून अधिक खर्च करू शकणारे लोक शहरी लोकसंख्येच्या सर्वांत वरच्या ५ टक्क्यात मोडतात. व्यक्तिगणिक ३० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करणाऱ्या कुटुंबांचा समावेश सर्वांत संपन्न एक टक्क्यात होतो. म्हणजे प्रत्यक्ष आकड्यानुसार, कृष्णन साहेब ९५ व्या पायरीवर आणि खन्ना तर चक्क सर्वांत वरच्या म्हणजे शंभराव्या पायरीवर उभे आहेत!
ग्रामीण भागात तर परिस्थिती याहून बिकट असणार. प्रत्येक व्यक्तीमागे ७ हजार रुपये खर्च करण्याची ऐपत असलेल्या (पाच जणांच्या कुटुंबाचे ३५,००० हून अधिक उत्पन्न असलेल्या) पूर्णतः ग्रामीण कुटुंबाचा समावेश देशातील सर्वोच्च १०% संपन्न कुटुंबात होतो. ग्रामीण भागात पाच लोकांचे एखादे कुटुंब फक्त वीसेक हजारांत गुजराण करीत असले तरी ते मध्यमवर्गीय म्हणवले जाईल. भारतातील सर्वांत गरीब कुटुंबे सहा माणसांची गुजराण आजही दरमहा केवळ १० हजारांत करतात. शिवाय ही सगळ्या देशाची एकत्रितपणे काढलेली सरासरी आहे.
राज्यांचा स्वतंत्रपणे विचार केला तर छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, आसाम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील परिस्थिती अधिकच शोचनीय आहे. या भागात तर अर्धीसुद्धा कुटुंबे दरमहा १५ हजारांहून अधिक खर्च करू शकत नसतील.
‘भारताचा शोध’ नावाचा हा खेळ मी असंख्य वेळा खेळलोय. तुलनात्मकदृष्ट्या संपन्न अशा बुडबुड्यात राहणाऱ्या शहरी भारतीयाला एक साधारण भारतीय माणूस कोणत्या परिस्थितीत आपले जीवन ढकलत आहे याची मुळीच कल्पना नाही. खरोखरचा गरीब माणूस दिसेनासाच झालाय. आपण मध्यमवर्गीयांना गरीब समजत आहोत आणि अगदी वरच्या पातळीवर असलेल्यांना मध्यमवर्गीय म्हणत आहोत. या गोड गैरसमजातून आपला शासक वर्ग कधी बरे मुक्त होईल?
yyopinion@gmail.com