दगडी भिंतीआड डांबलेली तरुण पोरं इथे येतात तरी कुठून?; तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 09:03 AM2022-06-04T09:03:00+5:302022-06-04T09:05:02+5:30

तुरुंगातील तरुणांच्या वाढत्या प्रमाणाचं मूळ सामाजिक व्यवस्थेत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्थेमुळे तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे पडत आहेत.

Where do young boys come from? The steps of youth towards crime | दगडी भिंतीआड डांबलेली तरुण पोरं इथे येतात तरी कुठून?; तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे

दगडी भिंतीआड डांबलेली तरुण पोरं इथे येतात तरी कुठून?; तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे

Next

- रवींद्र राऊळ

राज्यभरातील जवळपास साठ तुरुंगांमध्ये डांबलेल्या ३८ हजार कैद्यांपैकी सुमारे ५२ टक्के कैदी तरुण असून कारागृहांच्या दगडी भिंतीआड अशी तरुणाई कोमेजण्यात बिहार आणि उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती कारागृह विभागाने दिलेल्या तपशिलातून उघड झाली आहे.

१८ ते ३० वयोगटातील ही इतकी मुलं करिअर करायचं सोडून गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या मार्गांनी तुरुंगात कशी आणि कुठून पोहोचतात, हा प्रश्न छळणारा आहे. याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुरुंगात डांबलेल्या तरुणांपेक्षा कैकपटीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण तुरुंगाबाहेरही समाजात मोकाट आहेत. त्यांना वेळीच सावरायचं कसं?  तरुणवर्ग दाेरी कापलेल्या पतंगासारखा भरकटत आहे आणि तुरुंगातील तरुणाईचं प्रमाण ही त्याची लिटमस टेस्ट आहे.

चार महिन्यांपूर्वी दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थी मनापासून तयारी करत असतानाच काही हजार हुल्लडबाज विद्यार्थी मात्र ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊने केलेल्या तर्कशून्य आणि बेजबाबदार आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले होते. यातीलच बहुतांशी मुलं पुढील काळात समाजात नेमक्या कुठल्या स्थानी असतील? स्वत:च्या सोयीसाठी सरकारने निर्माण केलेली व्यवस्थाच नाकारणारी मुलं तुरुंगात नसली तरी स्वत:ला कोंडवाड्यात कोंडून घेणारीच म्हटली पाहिजेत. त्याआधी पुण्यात कुख्यात गजा मारणे याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हाही त्यात शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या दोन्ही घटना सध्याच्या तरुणांसमोरील आयडॉल बदलत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करतात आणि तुरुंगांमध्ये तरुणांची गर्दी का, याचं उत्तर सापडू लागतं.

पूर्वी शहरी भागात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक असायचं. संघटित गुन्हेगारी ही शहरी भागात जास्त प्रमाणात होती. आता हा काटा ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात झुकू लागलाय. संघटित गुन्हेगारीचं महत्त्व इथल्या समाजकंटकांनी समजून घेतलंय. ग्रामीण भागातही धटिंगणांचा धुडगूस अधिक प्रमाणात वाढायला लागलाय. अनेक व्हायरल व्हिडिओंमध्ये तो दिसून येतो. हप्तेबाजीसाठी दांडगाई करणारे, बर्थ-डेला मध्यरात्री तलवारीने केक कापून आपली जरब वाढवण्यावर तरुण भर देताहेत. समाजात अशी अशांतता निर्माण करून आपली दहशतवादी प्रतिमा तयार करणारे आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर तुरुंगाआड पोहोचतात.

तुरुंगातील तरुणांच्या या वाढत्या प्रमाणाचं मूळ हे सामाजिक व्यवस्था आणि त्याच्या बांधणीत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्था तरुणवर्गाला त्याची पावलं गुन्हेगारीकडे वळवण्यास भाग पाडत आहे. भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा आणि इझी मनीच्या मोहापायी खरेखुरे आयडॉल तरुणांना आपलेसे वाटेना झालेत. त्यांच्या कर्तृत्वाची महती आणि मोल या तरुणांच्या मनात बिंबवण्यात समाज अपयशी ठरलाय का, असा सवाल उभा ठाकला आहे.

बहुतांशी युवा कैदी हे तुरुंगात येण्याआधी तेच त्यांच्या घरचे मिळवते असतात. त्यामुळे त्यांच्या तुरुंगातील मुक्कामाच्या काळात उदरनिर्वाह करणं कुटुंबीयांना अवघड जात असतं. त्यांची परवड हाही एक मोठा प्रश्न आहे. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना सरकारने तयार केली आहे. कैदी तुरुंगात काम करून ही कर्जफेड करू शकतात. अशा योजना स्तुत्यच आहेत, पण मुळात हे तरुण तुरुंगांच्या दिशेने वळणारच नाहीत यासाठी निदान काही करता येईल का, याचा विचार कधी होईल? 

Web Title: Where do young boys come from? The steps of youth towards crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक