ही मग्रुरी येते कोठून?

By admin | Published: May 11, 2016 02:50 AM2016-05-11T02:50:45+5:302016-05-11T02:50:45+5:30

निवडणूक काळात मतदारांना चरणस्पर्श करून मतांची भीक मागणारे उमेदवार विजयाची माळ गळ्यात पडल्यानंतर आपले खरे रूप दाखवायला सुरुवात करतात हे सर्वज्ञात आहे.

Where does this madness come from? | ही मग्रुरी येते कोठून?

ही मग्रुरी येते कोठून?

Next

निवडणूक काळात मतदारांना चरणस्पर्श करून मतांची भीक मागणारे उमेदवार विजयाची माळ गळ्यात पडल्यानंतर आपले खरे रूप दाखवायला सुरुवात करतात हे सर्वज्ञात आहे. त्यातील काहीजण खरोखर आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेने वागतात व तेच खरे जनतेच्या गळ्यातील ताईत ठरत असतात; परंतु केवळ स्वार्थासाठी मूळ चेहरा झाकून बनावट मुखवट्याने जनतेसमोर जातात, ते नंतर जनतेकडे पाठ फिरविल्यावाचून राहत नाहीत. काही जणांच्या वागण्या-बोलण्यातही कमालीचा जो बदल होत असतो, त्यास सत्तेची केवळ नशा असेच म्हणता येईल. लोकप्रतिनिधीने त्याचे रूप बदलणे हे समजू शकते; पण त्याचे कुटुंबीय जेव्हा सर्वसामान्यांशी हुकूमशाही वृत्तीने वागू लागते तेव्हा त्यास सत्तेची मग्रुरीच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या मग्रुरीचे दर्शन बिहारमधील जदयूच्या आमदार मनोरमादेवी यांचा पुत्र रॉकी यादवने घडविले आहे. आपल्या वाहनास ओव्हरटेक केले म्हणून रॉकीने आदित्य सचदेव नामक वीस वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्त्या केली. या घटनेनंतर आमदारांचे पती आणि अंगरक्षकास अटक झाली मात्र मूळ आरोपी अद्याप फरारच आहे. दहशत, गुन्हे, घात याबाबत बिहारचा हात कोणी धरू शकणार नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे अशा घटना बिहारसाठी नव्या राहिलेल्या नाहीत. मुळात बिहार अथवा अन्य प्रांत हा मुद्दा याठिकाणी महत्त्वाचा नाही. दोष प्रवृत्तीचा आहे. अशा घटना प्रत्येक राज्यात घडतात, त्यास महाराष्ट्रदेखील अपवाद राहिलेले नाही. सत्तेतून आलेली मग्रुरी ठेचूनच काढायची असेल तर जनतेशी उद्धट आणि उर्मटपणे वागणारी अशी बेदरकारी मग ती कोणाचीही असो, ती मोडून काढायला हवी. असे पाऊल उचलले गेले तर कायदा सर्वांसाठी समान आहे, असा संदेश जनतेत आपसूकच पोहचल्यावाचून राहणार नाही.

Web Title: Where does this madness come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.