नव्या सरकारमध्ये खान्देश कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:24 PM2019-11-26T21:24:29+5:302019-11-26T21:32:11+5:30
खान्देशने २० पैकी ११ जागा या आघाडीच्या पारड्यात घातल्या असल्याने नव्या सरकारमध्ये झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली तर ती चुकीची ठरणार नाही.
मिलिंद कुलकर्णी
शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तारुढ होणार हे अखेर निश्चित झाले. उध्दव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री असतील. खान्देशने २० पैकी ११ जागा या आघाडीच्या पारड्यात घातल्या असल्याने नव्या सरकारमध्ये झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली तर ती चुकीची ठरणार नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला ४, काँग्रेसला ४, राष्टÑवादी काँग्रेसला १ जागा मिळाली. दोन अपक्ष निवडून आले असून त्यांनी आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सत्तारुढ होणाऱ्या आघाडीचे संख्याबळ ११, विरोधी बाकावर बसणाºया भाजपचे ८ आणि एमआयएमचा एकमेव आमदार तटस्थ राहण्याची शक्यता आहे.
नवे सरकार आरुढ झाल्यानंतर स्वाभाविकपणे मंत्रिपदांची उत्सुकता असते. तीन पक्षांचे हे सरकार असल्याने मंत्रिपदांची विभागणी होईल आणि प्रत्येकाचा कोटा निश्चित केला जाईल. त्यात कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपदे यांचा समावेश राहील.
गेल्या पंचवार्षिक कार्यकाळातील महायुतीच्या सरकारमध्ये खान्देशला अडीच मंत्रिपदे मिळाली होती. दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद. सुरुवातीला एकनाथराव खडसे हे वजनदार खात्यांचे मंत्री दीड वर्षे सत्तेत होते. गिरीश महाजन, जयकुमार रावल हे भाजपचे तर गुलाबराव पाटील हे सेनेचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे खातीही चांगली होती. महाजनांकडे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण तर रावलांकडे पर्यटन, रोजगार हमी योजना, पाटील यांच्याकडे सहकार अशी खाती होती. खडसे यांच्याकडे तर महसूल, कृषी अशी महत्त्वाची खाती होती. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये महाजन आणि रावल यांचा समावेश होता. त्यामुळे खान्देशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टेक्सटाईल पार्क सारखे मोठे उपक्रम आणि सिंचन योजनांना मोठा निधी, जळगाव व धुळे महापालिकेचा विकास कामांसाठी निधी, कर्जमुक्ती असे लाभ मिळाले.
पालकमंत्रिपदाबाबत मात्र तिन्ही जिल्ह्यांमध्ये धरसोडीची भूमिका राहिल्याने विकास कामांमध्ये सातत्य, प्रशासनावर पकड, प्रकल्पांचा पाठपुरावा या पातळीवर मात्र प्रभाव दिसून आला नाही. जळगावला या काळात तीन पालकमंत्री मिळाले. एकनाथराव खडसे, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन. या तिघांपैकी कोणाचीही चमकदार कामगिरी दिसून आली नाही. तीच अवस्था नंदुरबार जिल्ह्याची आहे. सुरुवातीला गिरीश महाजन आणि त्यानंतर जयकुमार रावल यांच्याकडे धुरा आली. परंतु, स्थानिक प्रश्नांची तड लावण्यात फारसे यश मिळाले नाही. धुळ्याला सलग पाच वर्षे दादा भुसे हे पालकमंत्री होते. परंतु, त्यांचाही लाभ ना जिल्ह्याला झाला, ना पक्षाला झाला.
आता नव्या सरकारमध्ये तरी वेगळे काही घडेल, अशी अपेक्षा आहे. जळगावात गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. गेल्यावेळी त्यांचा उशिरा मंत्रिमंडळात समावेश झाला. यंदा कॅबिनेट मंत्रिपदाची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खान्देशात संपूर्ण १०० टक्के यश शिवसेनेला मिळाले. शिवाय चंद्रकांत पाटील यांच्यारुपाने बोनस आमदारदेखील मिळाला. चिमणराव पाटील, किशोर पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर लता सोनवणे या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. काँग्रेसकडून शिरीष चौधरी आणि राष्टÑवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे काय जबाबदारी सोपवली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
धुळ्यातील पाच जागांपैकी आघाडीकडे काँग्रेसची एकमेव आणि साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी सेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे दोन संख्याबळ आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र कुणाल पाटील हे दुसºयांदा निवडून आले आहेत. त्यांच्याकडे किमान राज्यमंत्रीपद सोपविले जावे, अशी अपेक्षा राहणार आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेसला मिळालेल्या दोन जागांपैकी अॅड.के.सी.पाडवी यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. पाडवी यांनी निवडणूक काळात प्रदेश पातळीवर मोठी भूमिका बजावल्याचे दिसून आले. सातव्यांदा ते विजयी झाले आहेत. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष नाईक हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. नंदुरबार आणि धुळ्यात भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत.
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी आहे, पूर्वी १५ वर्षे त्यांनी राज्यात सरकार चालविले आहे. परंतु, आता शिवसेनेचा सत्तेतील सहभाग नवीन असल्याने या सरकारचा कारभार कसा चालतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहील. त्यात खान्देशला सहभाग कसा राहतो, हेदेखील महत्त्वाचे राहणार आहे.