कुठं नेऊन ठेवलाय रिपोर्ट माझा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:29 AM2017-11-20T03:29:35+5:302017-11-20T03:39:44+5:30
इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर मनकवडे ... एमके... अर्थात आपला यमके आज खूपच डिस्टर्ब होता.
- राजा माने
इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर मनकवडे ... एमके... अर्थात आपला यमके आज खूपच डिस्टर्ब होता. यावेळी इंद्रदेवांना काय आणि कसा रिपोर्ट द्यावा, या मुद्याने त्याच्या मेंदूचा खुळखुळा झाला होता. अखेर त्याने आपले गुरू नारदमुनींना व्हॉटस्अॅपवर मेसेज देऊन सल्ला घ्यायचे ठरवले. मोबाईलवर व्हॉटस्अॅप मेसेज लिहायला सुरूवात केली...
गुरुवर्य नारदसर यांसी,
साष्टांग दंडवत,
मराठीभूमीचा आँखो देखा हाल इंद्रदेवांना काय रिपोर्ट सादर करावा याविषयी आपल्या मार्गदर्शनाची मला गरज आहे गुरुवर्य ! रिपोर्टमध्ये काय लिहावे हेच मला कळेनासे झाले आहे. अहो, तटकरेंच्या सत्काराला देवेंद्रभाऊ गेले नाहीत, त्या दिवसापासून जे घडतंय त्याचं विश्लेषण कोण करणार? काल परवा त्या ‘पद्मावती’ बरोबर आमच्या मराठमोळ्या भांडांच्या बाबाचा ‘दशक्रिया’ आणि जाधवांचा ‘न्यूड’ सिनेमा भरडला गेला. साहेब देवेंद्रभाऊंना ‘बालीश’ म्हणून थांबले नाहीत तर ते चक्क कपाशीवरील बोंड अळीचा मागोवा घ्यायला विदर्भात पोहोचले. इकडे आमच्या अजितदादांनी पण देवेंद्रभाऊंना आपल्या स्टेजवर न बोलवायची प्रतिज्ञा केली. साहेब व उद्धव यांची भेट उभ्या महाराष्ट्राला ‘भेटी लागी जीवा ठरली’. काय काय म्हणून सांगू नारदसर तुम्हाला? खड्ड्यांचं अवघड ‘कोडं’ सोडवता सोडवता आमचे बच्चू पाटील बेजार झाले आहेत. तिकडे राजसाहेब वेताचा फोक घेऊन फेरीवाल्यांच्या पाठी दौडता दौडता वेगळा विदर्भ होऊ देणार नाही असे म्हणतात. राज्यातील गुरुजन विनोदभाऊंच्या ‘कपटी सासू’ भूमिकेमुळे मेटाकुटीस आले आहेत. एका विद्यार्थ्यावर होणाºया ९६ हजार रुपये खर्चाचे व्हाऊचर आता थेट संस्था चालकांनाच देण्याची भाषा ते करू लागलेत. हे कमी होते म्हणून की काय अहो, राहुलबाबा ‘पप्पूृ’ नसून आता दमदार नेते बनत असल्याचा साक्षात्कार आपल्या साहेबांना झाला आहे. कोकणनरेश दादा गुडघ्याला बाशिंग बांधून तिष्ठत आहेत. आता सरसकट कर्जमाफी साहेबांनीच होऊ दिली नाही, अशी दवंडी सुभाषबापू पिटू लागले आहेत. आता सांगा या सगळ्यांचा इंद्रदेवाला काय रिपोर्ट देऊ.
(गुरुवर्य नारदांनी शिष्य यमकेला लगेचच उत्तर दिले....)
नारद : शिष्या फक्त एका ओळीचा रिपोर्ट दे २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे...