झाड लावताय? - कुठे, कोणतं आणि कधी लावाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 08:58 AM2023-05-15T08:58:32+5:302023-05-15T08:59:01+5:30
पावसाळा जवळ आला की, वृक्षारोपणाचा उत्साह सुरू होतो. झाड लावणे हे जबाबदारीने स्वीकारण्याचे व्रत आहे, असे सांगणारा हा लेख आजच्या वृक्षदिनानिमित्त..
- शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक -
पावसाळा जवळ आला की, बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. कोणतेही झाड लावताना ते कुठे लावणार, कोणते लावणार आणि त्याची काळजी कशी घेणार, याच नीट विचार करायला हवा. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे :
१. रेन-ट्री, गुलमोहर, पेल्ट्राफॉर्म, अकेशिया, स्पॅतोडिया, गिरीपुष्प, निलगिरी, सुबाभुळे यांसारखी पटकन वाढणारी विदेशी प्रजातींची झाडे लावण्यावर प्रारंभी भर होता. त्यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते हे लक्षात आल्यावर हल्ली जो तो नर्सरीमध्ये जाऊन वड, पिंपळ, उंबर, कडूनिंब या प्रजातींची मागणी करताना दिसतो. हे सरसकटीकरण टाळा.
२. जागेच्या उपलब्धतेनुसार प्रदेशनिष्ठ झाडांची निवड अपेक्षित आहे. रस्त्यालगत, इमारतीच्या आवारात, उद्यानासाठी सोडलेल्या जागेत, डोंगरावर, गावाजवळच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करताना योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजातीची निवड करा.
३. पूर्वी आपल्या अवतीभवती जी पर्यावरणपूरक देशी झाडे होती, त्यातील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वृक्षांची रोपे मिळवून किंवा तयार करून आपल्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करणे हेच वृक्षारोपणाचे अभ्यासपूर्ण, शाश्वत कार्य होय.
४. वृक्षरोपण म्हणजे डोळ्याला हिरवळ दिसण्यासाठी करायची कृती नव्हे, तर ती एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. झाड केवळ लावणेच नव्हे, तर त्याच्या वाढीसाठी काम करण्याचे, संयमाने स्वीकारण्याचे हे व्रत आहे.
५. वृक्षारोपण करताना आपण ज्या भागात वृक्षारोपण करत आहोत, तेथील नैसर्गिक परिसंस्था आणि पर्यावरण यांचे भान असणे महत्त्वाचे. महाराष्ट्रात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. नाशिक, पुणे इत्यादि ठिकाणी समतोल प्रमाणात पाऊस पडतो. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अल्प असते. अशा वेळेस त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करताना तिथल्या वातावरणाच्या अनुसरून आपण वृक्षांची लागवड केली, तर ती नक्कीच फलदायी ठरेल.
६. काही देशी प्रजातींची झाडे सगळ्या वातावरणात वाढतात, तर काही ठरावीक प्रदेशांत वाढतात. प्रदेशनिष्ठ वृक्षांची रोपे नको त्या ठिकाणी लावण्याचा अट्टाहास करून आपण वेळ व श्रम वाया घालवतो. त्याला यश न मिळाल्यास काही प्रमाणात आपल्याला नैराश्य येतं.
७. उदाहरणार्थ : बरेच लोक कडुनिंबाची रोपे कोकण पट्ट्यामध्ये म्हणजेच जास्त पावसाच्या ठिकाणी लावतात, ती थोडे दिवस तग धरतात आणि नंतर सुकून जातात. कडुनिंब उष्ण, कोरड्या हवामानात नैसर्गिकरीत्या जोमाने वाढतो. डोंगराळ व उष्ण प्रदेशात कदंबाचे झाड तग धरत नाही. कदंबाला चांगली ओलावा टिकवून ठेवणारी माती लागते, जिथे ते चांगल्या प्रकारे वाढतात.
८. जागेच्या उपलब्धतेनुसार झाडांची निवड करावी. आटोपशीर वाढणारे वृक्ष इमारतीच्या व बंगल्याच्या आवारात लागवडीस योग्य ठरतात. पारिजातक, मधू कामिनी, बहावा, बकुळ, सोनचाफा, फालसा, आपटा, बेल, कढीपत्ता, सीताअशोक, आंबाअशोक, काळा कुडा, पांढरा कुडा इत्यादी झाडे बंगले व इमारतींच्या पुढे-मागे असलेल्या मोकळ्या जागेत लावल्यास ते उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय अशोक, सुपारी, भेरलीमाड, शिंदी ही सरळ वाढणारी झाडेही येथे लावता येऊ शकतात.
९. काॅलनी रोडला लागून असलेल्या जागेत ताम्हण, बकुळ, बहावा, मुचकुंद, पुत्रंजीवा, दांडोस, कांचन,, सेमलाकांचन, कुसुम, तिवस, शिसम, पाडळ, असाणा.. इत्यादी झाडे योग्य ठरू शकतात.
१०. पारंपरिक झाडे लावताना त्यात शोभिवंत, सुंदर फुलोरा देणारे, पक्ष्यांना उपयोगी.. असा उपलब्ध जागेचा विचार करून लागवड केल्यास आपल्या परिसराची शोभा तर वाढेलच, पण त्यातून उपयुक्तताही साधली जाईल.
थोडक्यात काय, तर वृक्षारोपण करताना त्या त्या प्रदेशातली जैवविविधता आपण राखू शकलो तरच त्या वृक्षारोपणाला खरा अर्थ आहे.