मृत्यूचे हे तांडव कुठवर चालत राहील? भूस्खलन, युद्ध... कोणालाच त्याची फिकीर नाही
By विजय दर्डा | Published: August 5, 2024 09:40 AM2024-08-05T09:40:43+5:302024-08-05T09:43:10+5:30
वायनाडपासून हिमालयापर्यंत निसर्गाचे थैमान सुरू आहे. तिकडे इस्रायल- हमासच्या युद्धात इराण, तुर्कस्तान, लेबनान व अमेरिकेनेही उडी घेतली तर?
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
मृत्यूच्या तांडवामुळे मन अत्यंत व्यथित आहे. वायनाडमध्ये भूस्खलनामुळे २३० हून अधिक लोकांचा बळी गेला. हिमाचलापासून उत्तराखंडपर्यंत सर्वत्र दरडी कोसळताहेत. हे सारेच हृदय विदीर्ण करणारे आहे. या सर्व घटनांच्या मुळाशी सरकारची गंभीर बेपर्वाई आहे. बेजबाबदार या शब्दाचा उपयोग अशासाठी करतो आहे की सरकारला सारे काही ठाऊक असताना धोकादायक अशा या प्रदेशात लोकांनी वस्ती केली आहे. कारण ते गरीव आहेत. या प्रदेशात झाडे कापून शेतीसाठी मैदान तयार केले जाते, 'पंतप्रधान आवास योजने'च्या अंतर्गत घरे बांधून या लोकांची दुसऱ्या ठिकाणी वस्ती करून देणे गरजेचे नाही काय? परंतु, दुर्दैव असे की, कोणालाच त्याची फिकीर नाही.
मध्यपूर्वेत हमास आणि इस्रायलच्या संघर्षात बळी जाणाऱ्या सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांविषयीही कुणाला फिकीर नाही. इस्रायलने हमासवर हल्ला केला तेव्हा मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या सदरात मी लिहिले होते, युद्धाची सर्वाधिक झळ सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना बसणार आहे; आणि तेच झाले. गाझा पट्टीत सुमारे ४० हजार पॅलेस्टिनी मारले गेले असून, ८५ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. महिला आणि मुले यांची अवस्था वाईट आहे. हे युद्ध थांवण्याची कोणतीही चिन्हें नाहीत.
हमास या संघटनेचा प्रमुख इस्माईल हनिया याच्या हत्येमुळे आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हनियाच्या हत्येचे प्रकरण इराणसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेस्कीयांग यांच्या शपथ ग्रहण समारंभासाठी हनिया आले होते. या समारंभात भारताच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. शपथविधीनंतर हनिया राष्ट्रपतींना भेटले. सरकारी पाहुणे असल्यामुळे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी कानाकोपऱ्यात इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डसचा पहारा होता. असे असूनही त्यांची हत्या झाली. इस्रायलने उघडपणे हत्येची जबाबदारी घेतली नसली तरी बोट त्याच देशाकडे दाखवले जात आहे. हनिया यांच्यावर यापूर्वी चारदा हल्ला झाला असून, 'त्यांच्या परिवारातील दहाजणांना आम्हीच मारले' अशी कबुली खुद्द इस्रायलनेच दिलेली आहे.
हनिया यांच्या हत्येनंतर तत्काळ इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी हनिया यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, ते इराणचे कर्तव्य आहे, असे जाहीर केले. एका इस्रायली वर्तमानपत्राने सूत्रांचा हवाला देत खोमेनी यांनी इस्रायलवर हल्ल्याचा आदेश दिला असल्याचे वृत्त दिले आहे. इराणने काहीच केले नाही तर ती त्याची कमजोरी मानली जाईल. आणि आपण कमजोर आहोत असे इराण दाखवू इच्छित नाही.
आग जास्त भडकू नये यासाठी अमेरिका एका बाजूला इराणवर दडपण आणत आहे. परंतु, 'जर इराणने हल्ला केला तर अमेरिका इस्रायलचे रक्षण करील' असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन यांनी उघडपणे म्हटले आहे. याचा सरळ अर्थ अमेरिका युद्धात उडी घेईल. अशा स्थितीत चीनची भूमिका काय असेल, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. गाझापट्टीतील संहाराकडे डोळेझाक करता येणार नाही असे चीनने अलीकडेच म्हटले आहे. चीन तोंडाचा पट्टा चालवण्यात पुढे असेल, पण मध्यपूर्वेतील या आगीत तो आपले हात पोळून घेणार नाही असे मला वाटते, आर्थिक स्वरूपात चीन हमासला मदत करील काय? असे घडू शकते.
या सगळ्यात सौदी अरेवियाची भूमिका काय असेल? आपण मुस्लीम देशांचे नेतृत्व करावे आणि त्याच वेळी अमेरिका आणि इस्रायलशी संबंध चांगले राहावेत अशी इच्छा सौदी अरेबिया वाळगून आहे. सौदी आणि इस्रायल यांच्यात शांतता करार होणार होता. इस्रायल आणि सौदी अरेवियामध्ये महत्त्वाचा शांतता करार जवळपास होत आला आहे असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले होते. या करारातून अरब-इसायल संघर्ष संपणे आणि इतर अरबी देशांचे इस्राइलशी संबंध सुधारणे याला मदत होईल. अशा करारातून पॅलेस्टाईनशी शांतता प्रस्थापित होण्याच्या शक्यताही वाढतील, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, इस्त्रायलवर हमासने हल्ला केल्यामुळे या शक्यतांवर पाणी पडले आहे. मात्र, सौदी अरेवियाने हमासपासून स्वतःला दूर ठेवलेले दिसते. इकडे तुर्कस्तान गरज पडल्यास इस्रायलमध्ये घुसू शकतो असे तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी म्हटले आहे. असे झाल्यास सद्दामचे जे झाले ती गत तुर्कस्तानची होईल असे प्रत्युत्तर इस्त्रायलने दिले आहे. याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत इस्रायल मागे हटायला तयार नाही.
या प्रदेशाला कुणाची दृष्ट लागली आहे?
इतिहासाचे कोणतेही पान उघडून पहा, हा सगळा प्रदेश रक्तरंजित दिसतो. इराकचे युद्ध आपल्याला आठवत असेल, ज्यात सुमारे लाखभर निरपराध लोक मारले गेले होते. मोसुल हे इराकी शहर दफनभूमी झाल्याचे दृश्य कुणीही विसरणे केवळ अशक्य आहे. इस्रायल आणि हमासच्या युद्धात इराण, तुर्कस्तान, लेवनान आणि अमेरिकेनेही उडी घेतली तर काय होईल? अर्थातच मृत्यूचे भीषण तांडव ! साहिर लुधियानवी यांच्या एका गझलेतला एक तुकडा मला आतून टोचत राहतो. ते लिहितात..
जंग तो खुद ही एक मसअला है,
जंग क्या मसजलों का हल देगी
आग और खून आज बख्शेगी
भूख और एहतीयाज कल देगी।
त्यांची ही गझल वाचताना माझ्या मनाशी शब्द येतात - संभल जाओ मौतके सौदागरो मौत इन्सानियत खाती है आज किसी और की बारी है कल तुम्हे भी निगल लेगी।