जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 02:53 PM2019-09-28T14:53:21+5:302019-09-28T15:33:07+5:30

संतांना सुख कसे प्राप्त होते व संसारी जीवाला का प्राप्त होत नाही..?

Wherever there is conflict, there is suffering | जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते

जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते

Next

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वसामान्य माणसाच्या मनात असे नेहमी येते की आपण प्रपंचात सर्वकाळ सुखी असावे. आपल्याला कधीही दुःख भोगावे लागू नये त्याच दृष्टीने तो सतत प्रयत्न करीत असतो. व्यास महाराज म्हणतात,

संसारे सर्वदा सौख्यं न कदा दुःखमस्तु मे,
एषैव वर्तते इच्छा सामान्य जनमानसे

सुखासाठीच मनुष्य प्रत्येक कर्म करीत असतो पण फळ मात्र विपरीत मिळते, असे का..? याचे उत्तर द्यावयाचे झाल्यास प्रत्येक जीव हा नाशिवंत विषयांत सुख शोधतो. या जगात जे जे पदार्थ नाशिवंत आहेत ते शाश्वत सुखाची प्राप्ती करून देतील का..? पहिल्यांदा सुख म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे.. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात,

किंबहुना सोय, जीव आत्मयाची लाहे,
तेथे जे होय, तया नाम सुख..!

जीवाला आत्म्याचा लाभ होणे म्हणजेच सुख. 
इंद्रिय सुख हे नश्वर व परिणामी दुःखकारकच असते.
भागवतकार म्हणतात,

सुखमैद्रिंयकं राजन् स्वर्गे नरक एव च
देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः

आपण म्हणाल, संतांना सुख कसे प्राप्त होते व आम्हाला का प्राप्त होत नाही..? तर याचे उत्तर असे की, संत महात्मे नाशिवंत विषयांत सुख शोधतच नाहीत. त्यांच्या सुखाचा विषयच परमात्मा असतो. त्यांचे चित्त भगवद् स्वरुपाशी रममाण झालेले असते. जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते. या द्वंद्वावाचा परिणाम त्यांच्या जीवनात होतच नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात,

प्राप्ता प्राप्त लाभावस्था, बाधु न शके साधुच्या चित्ता 
चित्त घातले भगवंता, या नाव निरपेक्षता

लौकिक जीवनातील एखादी वस्तू मिळावी म्हणून त्यांचे चित्त कधी विचलित होत नाही.
संत तुकाराम महाराज म्हणतात,

चित्त चैतन्या पडता मिठी
दिसे हरी रूप अवघी सृष्टी

एकदा का चित्त भगवद् स्वरूपाशी एकाग्र झाले की सुख दुःखाच्या कल्पना संपून जातात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

का तिन्ही काळ होता, त्रिधा नव्हे सविता 
तैसा सुख दुःखी चित्ता, भेदु नाही

म्हणून अध्यात्म शास्त्रात समचित्त होण्याच्या साधनेला खूप खूप महत्त्व आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्रमांक - 83298 78467 )

Web Title: Wherever there is conflict, there is suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.