कोणता झेंडा घेऊ हाती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:16 AM2018-02-24T04:16:22+5:302018-02-24T04:16:22+5:30
भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी कानगोष्टी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मैत्रीची टाळी देत असूनही दिल्लीश्वर त्यांच्याकडे लक्ष देत
भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी कानगोष्टी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मैत्रीची टाळी देत असूनही दिल्लीश्वर त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने ते द्विधा मन:स्थितीत आहेत. लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षाहून अधिक कालावधी असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. नाना पटोले यांची घरवापसी आणि आशिष देशमुख यांनी खांद्यावर घेतलेला विदर्भाचा झेंडा या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या हालचालींकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहणे स्वाभाविक आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपाच्या वाढीत खडसे यांचे मोठे योगदान आहे, हे निश्चित. परंतु खडसे यांची कार्यपद्धती रा.स्व.संघ आणि भाजपामधील जनसंघी मंडळींना रुचत नाही. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात खडसेंचा मंत्रिमंडळातील सहा महिने विलंबाने झालेला प्रवेश हा ‘मनभेदा’चा परिपाक होता. भाजपाच्या दुसºया कार्यकाळात खडसे यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडली, तरीही पक्षश्रेष्ठींनी महसूल, कृषी यांसह तब्बल १२ खात्यांचा कार्यभार खडसे यांच्याकडे सोपविला होता. आषाढी एकादशीला पंढरपुरात खडसे यांनी अन्यायाची भाषा पहिल्यांदा केली आणि पुढे कटुता वाढत गेली. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकाळात खडसे हे विरोधी पक्षनेते होते. सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध त्यांनी विधानसभा आणि सभागृहाबाहेर जोरदार रणशिंग फुंकले होते. त्याच खडसेंविरुद्ध लागोपाठ आरोपांची मालिका सुरू झाल्याचे सव्वा वर्षात दिसून आले. त्याची परिणती मंत्रिपदाच्या राजीनाम्यात झाली. सत्ता जाताच लाभार्थीदेखील दूर जाऊ लागतात, याचा अनुभव खडसेंना २० महिन्यांच्या कार्यकाळात आला. विधान परिषद, जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीत खडसेंची नाराजी कायम असूनही जळगाव जिल्ह्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी खडसेंकडे दुर्लक्ष सुरू केले. परिणामी बंडाचा झेंडा हाती घेऊन खडसे रोज सरकार आणि पक्षाला झोडपत आहेत. रेशीमबागेतील वर्गाला दांडी, राष्टÑवादीच्या संघर्ष यात्रेचे निवासस्थानी स्वागत, राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या तसेच काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती, त्या व्यासपीठावरून पक्ष बाहेर ढकलत असल्याची भाषा, लेवा समाजाच्या अधिवेशनात अपात्र लोक देशात सत्ता राबवित असल्याची केलेली टीका हे सगळे खडसे जाणीवपूर्वक करीत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. अलीकडे काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यासोबत कॉफीपान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट झाली. स्वाभाविकपणे तर्कवितर्काला उधाण आले. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खडसे यांची भेट घडवून आणण्याच्या बातम्या आल्या. परंतु खडसेंविरोधात मुखपत्रातील अग्रलेख आणि खडसे भाजपा सोडणार नाहीत, असे संजय राऊत यांनी ठाम केलेले विधान पाहता सेनेशी सूत जमणे कठीण दिसते. सूनबाईची खासदारकी, पत्नीचे महानंद व जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद, कन्येचे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद ही कुटुंबातील सत्तापदे पाहता खडसे भाजपा सोडणार नाही, असा त्यांच्या निकटवर्तीयांचा सूर आहे. याचा अर्थ स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी खडसे यांची ही आदळआपट आहे, असेच म्हणावे लागेल.
- मिलिंद कुलकर्णी