कोण कोणता धडा घेणार?
By admin | Published: March 2, 2017 11:59 PM2017-03-02T23:59:37+5:302017-03-02T23:59:37+5:30
राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक निकालापासून कोणी कोणता धडा घ्यावा
राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक निकालापासून कोणी कोणता धडा घ्यावा? खासदार संजय काकडेंची भविष्यवाणी आणि राजकारण याचा नेमका अर्थ कसा लावला जात आहे...
राज्यातील १० महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळीने गावोगावी उडालेल्या धुराळ्याने आता जमिनीवर विसावयाला सुरुवात केली आहे. मतांच्या साठमारीत अनेकांच्या पदरात अपयशाचे माप पडले. ज्यांना यश मिळाले त्यांनी त्या मापाचा अर्थ साहजिकच सकारात्मक लावला. अपयश मापाच्या धन्यांपैकी अनेकजण आजही चक्रावलेले दिसतात. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकारणाचा बाज बदलला. त्या बदलाला राजकीय मंडळी कशा पद्धतीने सामोरी गेली व आता जात आहेत हा राजकीय निरीक्षकांच्या अभ्यासाचा विषय ठरावा. पण एकूणच राज्यात झालेल्या महापालिका - जिल्हा परिषद निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेने या विषयाकडे शास्त्रीयदृष्ट्या राजकीय - सामाजिक मानसशास्त्राच्या तराजूत जोखण्याची वेळ आली आहे. मतदार कोणाच्या पारड्यात मते का, कशी आणि कोणत्या निकषावर टाकतो, या विषयाचे विश्लेषण तर्कशास्त्राच्या आधारावर नेहमीच केले जाते. आता ते सामाजिक व राजकीय मनोभूमिकेच्या आधारावरही करावेच लागेल, असा संदेश देणारा हा काळ आहे.
या निवडणुकीत कोणाला किती यश मिळाले तसेच मुंबई महापालिकेत आणि राज्यातील महापालिकांसह जिल्हा परिषदांवर कोणाचा झेंडा फडकणार याची चर्चा करण्यासाठी हे लेखन नाही. तर जगातील बलाढ्य लोकशाहीच्या देशातील निवडणूक प्रक्रिया, त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकाची भूमिका आणि त्यांना साद-प्रतिसाद घालणाऱ्या सामाजिक घटकांचा विचार झाला पाहिजे. त्याच भूमिकेतून जे प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आज उभे राहिलेले आहेत त्या प्रश्नांची आजची चर्चा मनोरंजनाच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येते. भविष्यवाणी हा कोणत्याही निवडणुकीतील मनोरंजनाबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या औत्सुक्याचा विषय असतो. ख्यातनाम भविष्यवेत्ते तशी भविष्यवाणी करू लागले तर भविष्यप्रेमी त्याकडे उत्सुकतेने पाहतो. राजकीय नेत्यांच्या भविष्यवाणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या निवडणुकीत मात्र पुण्यातील निकालाचे भविष्य राजकारणातील प्रशिक्षणार्थीने सांगितले आणि ते खरेही ठरले! एका जमान्यात पवार काका-पुतण्यांच्या अष्टरत्नांत गणले जाणारे अजितदादांचे उजवे-डावे समजले जाणारे खासदार संजय काकडे यांनी महापालिकेत निवडून येणाऱ्या सदस्यांचा आकडा मतदानापूर्वीच जाहीर केला आणि तसे न घडल्यास राजकारणातून संन्यास घेण्याची प्रतिज्ञाही केली. ते बोलले तस्सेच घडले ! मग हा योगायोग की पुणेकरांच्या मनात घुसून त्यांचे मत धुंडाळण्याची मनोतंत्र कौशल्याची ‘सिद्धी’ काकडेंना लाभली आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांचे समर्थक, विरोधक आणि राज्यातील तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य लोकांना आजही सापडलेले नाही. त्या शोधातच आता मतदान यंत्रावरच संशय घेतला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर या विषयावर एरंडाचे गुऱ्हाळही मोठ्या प्रमाणावर चालले. त्यातून मतदान यंत्र घोटाळा होऊ शकत नाही, असा निष्कर्षही अनेकांनी तांत्रिक आधारावर काढला. १९५२ साली स्वतंत्र भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळच्या सर्वच राजकीय पक्षांना आपला प्रचार, मतदान कसे करावे हे सांगण्यासाठी प्रात्यक्षिकासह प्रचार करावा लागला होता. पुढे मतदान अंगवळणी पडले आणि देशात ‘बोगस मतदान’ ही समस्या समोर आली. त्यावरही देशाने बऱ्याचअंशी मात केली. आता मतदान यंत्रांचा जमाना असल्याने काही यंत्रे बिघडू शकतात, संपूर्ण यंत्रणाच बिघडू शकत नाही, असा सप्रमाण विश्वास लोकांना वाटतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक निकालाने कोणाला कोणता धडा दिला हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. नोटबंदी आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीने उद्योगपतीपासून ते मोलमजुरी करणाऱ्यां- पर्यंतच्या घटकांना झालेला त्रास, शिस्त आणि संयमाचा नवा आदर्श जागतिक पातळीवर पोहोचविलेल्या मराठा मूक मोर्चानंतरही मराठा समाजाच्या पदरी आलेली निराशा, आरक्षण या मुद्द्यांवरून सर्वच जातिधर्मांची झालेली निराशा आणि अशाच अनेक प्रश्नांच्या यादीचा भडिमार असतानाही त्याचा विचार मतदारांनी केला नाही, असाच निष्कर्ष अनेकजण काढतात. पण स्थानिक संदर्भ आणि काहीतरी नवे घडण्याची आशा हेच सूत्र मतदार मांडतो हा धडा आपण का घेत नाही?
- राजा माने