सकारात्मक वाटचाल करताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 03:39 AM2016-06-26T03:39:11+5:302016-06-26T03:39:11+5:30
आपण लहानपणी पहिल्यांदा जेव्हा बोलायला शिकतो, तेव्हा सुरुवातीला अडखळत व बोबडेच बोलतो. पहिल्यांदा उभे रहायचा प्रयत्न करतो, तेव्हा चांगलेच धडपडतो. तेव्हा आई, आजी असे म्हणतात
- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर
आपण लहानपणी पहिल्यांदा जेव्हा बोलायला शिकतो, तेव्हा सुरुवातीला अडखळत व बोबडेच बोलतो. पहिल्यांदा उभे रहायचा प्रयत्न करतो, तेव्हा चांगलेच धडपडतो. तेव्हा आई, आजी असे म्हणतात का, ‘नको रे बाळा, तुला बोलता येत नाही, तेव्हा बोलायचा प्रयत्न करू नकोस. उभे राहता येत नाही, तेव्हा उभे राहायचा प्रयत्न करू नकोस. त्यांनी आपल्याला असा धडा दिला असता, तर आपण उभे तरी राहिलो असता का? बोलायला तरी शिकलो असतो का? उलट त्या आपल्याला प्रेरित करतात. बोलत राहा, उभा राहायचा प्रयत्न कर. सगळे जमेल, सगळे शिकशील. सीरियसली त्या घडीला मात्र आपण अडखळत आहोत, उभे राहताना धडपडत आहोत, याची जाणीव आपल्याला नसते. म्हणूनच आपण आपल्याला जे जमतेय, जेवढे जमतेय, ते करत राहतो. तसेच आयुष्याचे आहे. ते आपल्याला घडवते.
आयुष्य हे हृदयाच्या कार्डिओग्रामसारखे आहे. नागमोडी वळणांसारखे. ती वळणे ठरावीक उंचीची किंवा आकाराची असतात, तेव्हा तो ईसीजी नॉर्मल असतो. त्या वळणांची उंची कमी-जास्त झाली की, आपले हृदय आजारी पडते, तसेच जीवनाचे आहे. आयुष्यातील बदलते क्षण, आजूबाजूची बदलती परिस्थिती, आपला अनुभवांमधला बदल, वेगवेगळी माणसे किंवा तीच माणसे, पण त्यांच्या बदलत्या प्रतिक्रियेमुळे एखाद्या व्यक्तीच्या आजच्या आयुष्याचे बरेवाईट मोजमाप कालच्यापेक्षा वेगळे असते. भविष्यातही ते बदलू शकते. लोकांनी आपल्याबद्दल एखाद्या प्रसंगी आपले मत मांडले, तरी ते त्यांचे मत असते. त्या प्रसंगाबद्दल आपले मत वेगळे असू शकते. कधी-कधी त्या कथित प्रसंगाबद्दल व दुसऱ्याबद्दलची लांबी-रुंदी खोली मोजतच असतो आणि आपल्या अपेक्षेपेक्षा ती मापे थोडी-फार वेगळी दिसू लागली की, आपले अभिप्राय सुरू होतात. मुळात या यशापशाच्या किंवा मिळविण्याच्या व गमावण्याच्या गोष्टी एका महत्त्वाच्या मानसिक संकल्पनेवर आधारित आहेत. ती म्हणजे, आपण योजिले तसे, ठरविले तसे सगळेच व्हायला पाहिजे. आयुष्य कसे परिपूर्ण असावे.
आपल्याकडे आपला परफॉर्मन्स मोजायची परिपूर्ण फुटपट्टी नसते. आपण जसजसे मोठे होतो, तसतसे आपला अभिमानही मोठा होतो. तेव्हा मात्र आपण या परिपूर्णतेच्या फूटपट्टीचा खेळ खेळायला लागतो. अमुक गोष्टी या अशाच असायला पाहिजेत व तमुक गोष्टी या तशाच असायला पाहिजेत, हा हट्टही आपल्यात वाढत जातो. दुसऱ्यांनी आपल्याला चांगले म्हटले पाहिजे, आपली स्तुती केली पाहिजे, आपले कोडकौतुक झाले पाहिजे, हा आग्रहही आपला असतो. दुसऱ्यांनी आपल्यावर टीका केली, तर आपल्याला अपमानास्पद वाटते. त्याहीपेक्षा भयंकार गोष्ट म्हणजे, या परफेक्शनच्या डावात सगळ्यात जास्त दु:ख आपण स्वत:च स्वत:ला देतो. आपण आपली आत्मनिंदा करू लागतो आणि घायाळ होतो. एखादे रोप लावताना त्याचा विशाल वृक्ष होणार नाही, असा विचार आपण सामान्यपणे कधी करत नाही. खरे मानवी शहाणपण त्यातच आहे. कारण जमीन अमाप असेलही आणि सुपीकही असेल, पण रोपच नाही, तर वृक्ष कुठून येणार? कदाचित, ते रोप सुकून जाईल. त्याचा आपल्याला अपेक्षित असा वृक्षही होणार नाही. कदाचित, ते रोप त्या जमिनीत लागणारही नाही, पण म्हणून रोप लावायचेही नाही? ही आहे आत्मविनाशाची व आत्मनिंदेची भाषा. कुठून शिकलो आपण ही विघातक भाषा.
कितीही विनाश झाला तर सृष्टी जगत असते. दुष्काळ पडला, पूर आला, तरी निसर्गाचा जिवंतपणा आपण सतत अनुभवला आहे. निसर्गाने तर आपल्याला विकसित व्हायला शिकवले. मग कशाची भीती आहे आपल्याला. आपण चुकलो तर? अपयशी झालो तर? लोकांनी आपली छी-थू केली तर? म्हणून आपण एखादी नवीन सुरुवात करणारच नाही का? आपल्याला पुढे काही मिळवायचं, यासाठी प्रयत्न करणारच नाही का? परिपूर्णतेच्या या भोवऱ्यात आपल्या स्वप्नांचे तुकडे तुकडे आपण करतो. कारण दुसऱ्यांपेक्षा आपण आपल्या स्वत:च्या निंदेला घाबरतो. आपल्या पराभवाची दुसऱ्यांना किती जाणीव आहे किंवा त्याचे त्यांना किती महत्त्व आहे कुणास ठाऊक? कदाचित, त्यांना थोडा-फार आनंदही झाला असेल. मानवी स्वभाव आहे. शेवटी हेवेदावे असणारच, पण म्हणून आपण थांबायचे. बिनचूक आयुष्य जगण्याचा हव्यास हा केवळ मॅडनेस आहे. गवसणी घालण्यासाठी परिपूर्णतेचे अवकाश अस्तित्वातच नाही. ‘परफेक्शन’ ही एक केवळ कल्पना आहे. ती वस्तुस्थिती नाही. कारण जेव्हा आपण केलेल्या चुका आपल्या लक्षात येतात, तेव्हा आपण काहीतरी कृती करीत असतो. कुठेतरी मार्गक्रमण करत असतो. तेव्हाच तर आपल्याला आपल्या चुका कळतात. आपण काहीतरी नवीन करायचे ठरविले तरच काय बरोबर काय चूक? काय चांगले काय वाईट? हे शिकायचा अनुभव आपल्याला येतो. एखादी गोष्ट पुन्हा करायची की नाही, ही जजमेंट आपल्याला आपल्या चुकांतून कळते. म्हणून आपल्याकडून चूक होताच कामा नये, हा अभिमान खरे तर व्यर्थ आहे. चुकांशिवाय यशस्वी झालेली माणसे या जगात असतात का? एखाद दुसरी चूक झाली, म्हणून आपण काहीच करू शकणार नाही किंवा आपण म्हणजे कुचकामी आहोत, असे ठरविणे ही आत्मनिंदाच आहे. शेवटी आपण पराभूत आहोत, या भावनेचा बळी आपण स्वत:च ठरतो.
भीतिपोटी आपण काही करायचे टाळतो. आजचे काम उद्यावर ढकलतो. आणखी थोडा वेळ मागतो. अजून व्यवस्थित तयारी झाली नाही, म्हणून परीक्षा टाळणारे, नोकरीचा इंटरव्हू टाळणारे आयुष्यभर काहीच करत नाही. या विचारात एक विकृत सुरक्षा आहे. विकृत अशासाठी की माणसाला काहीच करत नाही, म्हणून चूक होणार नाही याची खात्री असते, पण त्याच वेळी तो एक रिकामटेकडा, कर्तव्यशून्य आयुष्य जगतो. तो यशाच्या पथावर मार्गक्रमण करू शकत तर नाहीच, पण सामान्य विधायकताही जगू शकत नाही. दुसऱ्याने चूक केली तर आपण दयाभाव दाखवतो ना. ‘माणसाकडून नाही, तर कोणाकडून चुका होणार’ या रास्त विवेकनिष्ठ प्रश्नातच आपले वस्तुनिष्ठ उत्तर आहे. म्हणून स्वत:च्या छोट्या-मोठ्या चुकांमुळे स्वत:ची निर्भत्सना न करता ‘आधी केलेची पाहिजे’ या फिलॉसॉफीचा मार्ग माणसाने पत्करला पाहिजे. ॉआपली स्वत:ची नजर स्वत:कडे पाहताना सुपरमॅनची नसावी. ती नजर माणसाचीच हवी, तरच आपण आत्मनिंदेतून बाहेर पडून आपल्या अनेक स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करू शकू. प्रत्येक स्वप्न साकार होईल असे नाही. तशी गरजही नाही, पण काही स्वप्नांना मूर्त रूप द्यायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. ते करताना आपलाच आत्मविश्वास वाढेल आणि अनुभवातून खूप काही शिकता येईल.