- ही द्वेषाची वावटळ लोकशाही नष्ट करेल
By विजय दर्डा | Published: September 11, 2017 01:01 AM2017-09-11T01:01:04+5:302017-09-11T01:01:34+5:30
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश..! या चौघांमध्ये एक समानता होती. या चारही व्यक्ती मुक्त विचारांच्या होत्या व चारहीजण आपले विचार कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोकपणे व्यक्त करत असत. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर द्वेषाची वावटळ ज्या तीव्रतेने घोंघावताना पाहायला मिळाली तेवढी तीव्रता यापूर्वीच्या हत्यांच्या वेळी नव्हती.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश..! या चौघांमध्ये एक समानता होती. या चारही व्यक्ती मुक्त विचारांच्या होत्या व चारहीजण आपले विचार कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोकपणे व्यक्त करत असत. या रोखठोक विचारांनी भयभीत झालेल्या लोकांनी भ्याडपणे या चौघांचीही हत्या केली, हे आणखी एक त्यांच्यातील समान सूत्र. फरक एवढाच आहे की, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर द्वेषाची वावटळ ज्या तीव्रतेने घोंघावताना पाहायला मिळाली तेवढी तीव्रता यापूर्वीच्या हत्यांच्या वेळी नव्हती.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर लोकांनी संताप व्यक्त करणे स्वाभाविक होते. दमदाटी व हिंसाचाराच्या मार्गाने विचार दडपून टाकण्याच्या या वृत्तीचा विचारवंत, साहित्यिक, पत्रकार व प्रबुद्ध नागरिकांनी शालीन शब्दांत धिक्कार केला. आश्चर्य असे की, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांविरुद्ध व्यक्त झालेले विचारही अनेकांना आवडले नाहीत.
नवराष्ट्रवादाच्या स्वयंभू ठेकेदारांनी या हत्येचा निषेध करणाºयांविरुद्ध असे काही काहूर माजविले व त्यासाठी अशी काही भाषा वापरली की ज्याचा उल्लेखही मी या स्तंभात करू शकत नाही. अश्लील शिवराळ भाषेचा त्यांनी सर्रास वापर केला. विचारवंत अशा लोकांना तशाच शिवराळ भाषेत उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे गौरी लंकेश यांच्या हत्येची निंदा करणाºयांनी गप्प बसणे पसंत केले. दादागिरी करून विरोधाचा आवाज दाबून टाकण्याच्या प्रयत्नांच्या नव्या कालखंडाची ही सुरुवात आहे, असे मला वाटते. एका ठराविक विचारसरणीच्या विरोधात बोलण्याची कोणी हिंमत केली तर त्याची अशी काही बदनामी करायची की त्या बिचाºयाने गप्प बसणे पसंत करावे, असा हा सुनियोजित प्रकार आहे. भारतातील लोकशाही अशा पद्धतीने चालू शकेल का?
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१) अन्वये प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार घोषणापत्राच्या अनुच्छेद १९ मध्येही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येक व्यक्तीस वैचारिक आणि माहितीच्या आदान-प्रदानाचे स्वातंत्र्य आहे. नागरिकांना आपले विचार मुक्तपणे मांडण्याचे स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही जिवंत राहील, हे उघड आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी, यावरही कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपले विचार मांडताना असेच वाटत असते की, इतरांनी त्यांचे विचार सोडून आपले विचार स्वीकारावेत. पण प्रत्येक वेळी व प्रत्येकाच्या बाबतीत असे व्हायलाच हवे, असा दुराग्रह मात्र कोणालाही धरता येणार नाही. त्यामुळे माझ्या मते विचारस्वातंत्र्यावरील हा हल्ला थेट लोकशाहीवरील हल्ला आहे.
विविध समुदाय, जाती, विचार, श्रद्धा व रितीरिवाजांचे लोक जेथे एकत्र राहतात असा भारत हा जगातील निवडक देशांतील एक आहे. भारत एवढा विशाल आहे की देशाच्या एका भागातील संस्कृती दुसºया भागातील संस्कृतीशी बिलकूल मेळ खात नाही. ईशान्येकडील राज्यांमधील लोकांची जीवनशैली व विचार दक्षिण किंवा पश्चिम भारतातील राज्यांहून पार भिन्न आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील लोकांनी ईशान्येकडील लोकांसारखे व्हावे व ईशान्येकडील राज्यांतील लोकांनी पश्चिमेकडील राज्यांची विचारसरणी स्वीकारावी, असे कसे म्हणता येईल? विविधता हेच भारताचे वेगळेपण आणि खरी ओळख आहे.
या वैविध्याचा सन्मान करण्यामुळे तर आपण सर्व नागरिक एकतेच्या सूत्राने बांधले गेलो आहोत. या वैविध्यपूर्ण संस्कृतीवर घाला घालून सर्वांना एकाच रंगात रंगविण्याचा प्रयत्न झाला तर त्याला जो विरोध होईल तो देशासाठी घातक ठरेल.
माझे असे ठाम मत आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ अनिर्बंध स्वातंत्र्य नाही. वैचारिक लढाई फक्त विचारांनीच लढली जाऊ शकते, बंदुकीने नाही. गांधीजींचे विचार पटले नाहीत म्हणून त्यांना गोळ््या घातल्या, इंदिराजींच्या विचारांशी असहमत झाले म्हणून त्यांची हत्या केली व राजीव गांधींना तर बॉम्बने उडविले गेले!
वैचारिक दुराग्रहाने अगणित हत्या होत आहेत. कोणताही सुजाण समाज हे सहन करू शकत नाही. शिवीगाळ, दंडुका व बंदुकीच्या जोरावर आपले म्हणणे दुसºयाला मान्य करायला लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माणूस जेव्हा टोळ््यांमध्ये राहात होता त्या कालखंडात परत जाण्यासारखे आहे. त्यावेळी एका टोळीचे लोक दुसºया टोळीवाल्यांची मुंडकी छाटायचे व त्याने आपल्या घरांची सजावट करायचे! पुन्हा आपल्याला त्या टोळीवाल्यांच्या मानसिकतेत जायचे आहे का?
गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल कोणावरही घाईगर्दीने आरोप करणे योग्य नाही. पण गौरी लंकेश यांना त्यांचे विचार पटले नाहीत म्हणून त्यांना शिवीगाळ करणेही तेवढेच अयोग्य आहे. बरं हे शिव्या देणारे लोक कोण आहेत? ज्यांना समाजात काही प्रतिष्ठा नाही. हे बाजारबुंडगे फुकटचा सोशल मीडिया हाती मिळाला म्हणून वाट्टेल ते लिहीत आहेत.
द्वेषाची ही वावटळ पसरविणारे असेच अराजक माजवत राहणार की त्यांच्याविरुद्ध काही कारवाई होणार, हा खरा प्रश्न आहे. नाही म्हणायला पोलिसांत सायबर गुन्हे शाखा आहे व ती कायदेशीर कारवाई करू शकते. पण संपूर्ण विहिरीतच भांग घोळविल्यासारखी अवस्था असताना आपण कोणाकोणाला या नशेतून बाहेर काढणार? द्वेषाच्या या आगीने लोकशाही भस्मसात होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने वेळीच कठोर पावले उचलायला हवीत. जाती-धर्माच्या नावे असे द्वेषाचे विष समाजात पसरविले गेले तर ‘मेरा भारत महान’ कसा होणार?
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
सूरत येथील एका दाम्पत्याने आपल्या १४ महिन्यांच्या सोमनाथ शहा या ‘ब्रेन डेड’ मुलाचे हृदय दान करून नवीन मुंबईतील आराध्या मुळे या साडेतीन वर्षांच्या मुलीस जीवनदान दिले. जगात याहून मोठे दान अन्य कोणतेही असू शकत नाही. हे अत्यंत प्रेरणादायी आहे. अवयवदानाविषयी लोकांमधील जागृती नक्कीच वाढत आहे. पण आपल्या देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. प्रत्यारोपण करायला अवयव न मिळाल्याने दरवर्षी हजारो रुग्णांचा मृत्यू होत असतो. अवयवदानाने अशा लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात.