कोण आहेत नासाच्या भव्या लाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 05:52 AM2021-02-04T05:52:26+5:302021-02-04T05:53:21+5:30

Bhavya Lal : भव्या लाल हे नाव कालपासून चर्चेत आहे. नासाने त्यांची ‘ॲक्टिंग चीफ ऑफ स्टाफ’ अर्थात दैनंदिन कामकाजप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची बातमी आहे.

Who are NASA's Bhavya Lal? | कोण आहेत नासाच्या भव्या लाल?

कोण आहेत नासाच्या भव्या लाल?

Next

भव्या लाल हे नाव कालपासून चर्चेत आहे. नासाने त्यांची ‘ॲक्टिंग चीफ ऑफ स्टाफ’ अर्थात दैनंदिन कामकाजप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची बातमी आहे. कुठल्याही परदेशस्थ भारतीय वंशांच्या व्यक्तीची उच्चपदी नियुक्ती वा निवड झाली की त्या व्यक्तीचे ‘भारतीय’ असणे, त्याच्या उत्तुंग भरारीची मुळे भारतातच असणे, याचा शोध घेत तेच विषयाच्या केंद्रस्थानी आणणे हा अलीकडचा एक माध्यमी पायंडा झालेला दिसतो. भव्या लाल या ‘इंडियन-अमेरिकन’ आहेत, महिला आहेत, त्यात त्यांची नासा कार्यप्रमुखपदी निवड झालेली आहे म्हटल्यावर त्यांच्या भारतीय मुळांचा शोध घेणे सुरू होणारच आहे. मात्र, ती चर्चा होण्यापूर्वी भव्या लाल यांचे अंतराळ विज्ञान क्षेत्रातील काम, स्पेस टुरिझमसंदर्भातला अभ्यास हे सारे जाणून घ्यायला हवे.
भव्या लाल यांच्यासंदर्भात नासाने जे पत्रक प्रसिद्धीला दिले त्यात त्यांनीच भव्या लाल यांची ओळख करून दिलेली आहे. 
त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, भव्या यांनी ‘रिसर्च स्टाफ’ म्हणून इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स ॲनालिसिस, सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट येथे २००५ ते २०२० यादरम्यान काम केले आहे. अंतराळ तंत्रज्ञान, धोरण आणि नीती यांचे व्हाइट हाऊस ऑफिससाठी विश्लेषण करणाऱ्या विभागाचे त्यांनी नेतृत्व केले होेते. याशिवाय नॅशनल स्पेस काऊन्सिल, अंतराळ कामकाजसंदर्भातील विविध संस्था, अमेरिकन संरक्षण विभाग यासाठीचे त्यांचे योगदानही मोठे आहे.
भव्या यांचे शिक्षण झाले अमेरिकेतील मॅसुच्युसेटस्‌ विद्यापीठात, तिथेच त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंग या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘तंत्रज्ञान आणि धोरण’ या विषयात त्यांनी मास्टर ऑफ सायन्सचीही पदवी घेतली. याशिवाय ‘सार्वजनिक धोरण आणि प्रशासन’ या विषयात त्यांनी जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठात पीएच.डी. केली आहे. त्यांचे नावाजलेले आणि बहुचर्चित काम म्हणजे, त्यांनी स्पेस एक्स, व्हर्जिन गॅलॅटिक आणि ब्लू ओरिजीन यासारख्या खासगी कंपन्यांनी अंतराळ पर्यटन या विषयात नक्की काय आणि कशी प्रगती केली आहे, त्यासंदर्भात केलेले लेखन. त्यातील त्यांचा अभ्यासही मोठा आहे. २०१६ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जर्नलमध्ये त्यांनी यासंदर्भात केलेल्या लेखनाची चर्चा झाली. त्यात त्या म्हणतात की, ‘येत्या १०-१५ वर्षांत असेही घडू शकेल की, फक्त अमेरिकन सरकारच अंतराळ समुदायाचे एकमेव मोठे केंद्र उरणार नाही. या क्षेत्रात होणारे प्रयोग आणि भौगोलिक वैविध्य पाहता अत्यंत कल्पक नव्या तंत्रज्ञानाची, रचनांची आणि दृष्टिकोनांचीही मालकी केवळ सरकारकडेच उरणार नाही.’
त्याच लेखात लाल असेही नमूद करतात की, ‘अंतराळ क्षेत्रातली महत्त्वाकांक्षा यापुढे केवळ अंतराळ क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांपुरत्याच मर्यादित असणार नाहीत, अमेरिकेसह भारत आणि इस्रायलचाही त्यात सभावेश आहे. आता दक्षिण कोरिया, इंग्लंड, सिंगापूर या देशांनीही अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करायला सुरुवात केली आहे.’ 
अंतराळात पर्यटन-प्रवास करणाऱ्या स्पेस एक्स या कंपनीविषयी, त्यांच्या डेमो-२ टेस्ट फ्लाइटविषयीही लाल यांनी मे २०२० मध्ये काही गोष्टी नमूद केल्या होत्या. आपल्या लेखात त्या म्हणतात, ‘स्पेस एक्सच्या लाँचने हे सिद्ध केलं आहे की, ज्यातून तोडगा निघू शकेल असं काम असेल, तर ते केवळ सरकारी धोरणांसाठीच लाभदायक ठरतं असं नाही, तर एकूण अंतराळ उद्योगासाठीही ते फायद्याचं ठरू शकतं. खासगी क्षेत्रही यापुढं मोठं काम या विषयात उभं करू शकेल!’ 
नासाने ही नियुक्ती करताना भव्या लाल यांच्याविषयी आवर्जून नमूद केले आहे की, त्यांना इंजिनिअरिंग आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. लाल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रेसिडेंन्शियल ट्रान्जिशन एजन्सी रिव्ह्यू टीममध्येही काम केले आहे. आजवर त्यांनी अंतराळ तंत्रज्ञान, धोरण ठरवणाऱ्या अमेरिकेतील अत्यंत नामांकित संस्थेचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद भूषवलेलेे आहे. त्यांनी एक संस्थाही सुरू केली होती. इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स ॲनालिसिसने मार्च २०२० मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. ‘मेजरिंग द स्पेस इकॉनाॅमी : एस्टिमेटिंग द व्हॅल्यू ऑफ इकॉनामॅिक ॲक्टिव्हिटीज इन ॲण्ड फॉर स्पेस’, या अहवालात आपल्या सहलेखकासोबत लाल असे नोंदवतात की, ‘अंतराळ अर्थव्यवस्थेचे चार घटक आहेत. एक म्हणजे, सरकार अंतराळ विज्ञान-संशोधनावर करत असलेला खर्च, दुसरा स्पेस सेवा म्हणजे खासगी उद्योग वा सेवा आपल्या व्यवसायासाठी उभारत असलेल्या अंतराळ विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी, उदाहरणार्थ सॅटेलाइटद्वारे ब्रॉडबॅण्ड इंटरनेट. तिसरा घटक अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानाला पुरवठा करणारे उद्योग आणि चौथा म्हणजे अंतराळ विज्ञान-तंत्रज्ञान वापरून सेवा देणारे सेवा उद्योग. हे सारे नव्या अंतराळ उद्योगाचा भाग होत आहे.’ भविष्यात हा अंतराळ उद्योग कसा बदलेल, सरकारी आणि खासगी धोरणांना कसे परस्पर पूरक काम करणे गरजेचे आहे, यासंदर्भातील अभ्यासही लाल यांनी मांडला आहे. 
आता नासाच्या सर्व दैनंदिन कामाकाजाचे व्यवस्थापन भव्या लाल यांच्याकडे आले आहे. संशोधक-इंजिनिअर असलेल्या भव्या यांचा हा नवा प्रवास सुरू होतो आहे.  

भव्या यांच्यापुढे नवे आव्हान
दैनंदिन कामकाजप्रमुख म्हणून काम पाहत असताना नासाच्या मुख्यालयातील कामकाज उत्तम तऱ्हेने चालवणे, धोरणात्मक दिग्दर्शन करणे हा भव्या यांच्या कामकाजाचा भाग असणार आहे. त्यांच्यासाठी ही एक नवीन आव्हानात्मक गोष्ट असेल.

Web Title: Who are NASA's Bhavya Lal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.