हे दंगेखोर ट्रम्प समर्थक आहेत तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:40 AM2021-01-09T06:40:24+5:302021-01-09T06:42:35+5:30
अमेरिका नावाचा ‘मेल्टिंग पॉट’ मुळातच तडकलेला आहे! ट्रम्प यांच्या पतनानंतरही अमेरिकी समाजातला हा दुभंग संपणारा नाही.
- सुकृत करंदीकर, सहसंपादक, लोकमत, पुणे
सन १४९२च्या ऑक्टोबर महिन्यात स्पेनचा दर्यावर्दी कोलंबसाचं पाऊल अमेरिकी बेटांवर पडलं. स्थानिक ‘रेड इंडियन्स’नी पाहिलेला हा पहिला गोरा आणि परदेशी माणूस. अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रचंड भूभाग युरोपीय मंडळींना आकर्षित करून घेणारा ठरला, यात नवल नव्हतं. कोलंबस जहाजातून उतरला, तोच मुळी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात स्पेनचा झेंडा घेऊन. अनेक युरोपीय देशांसाठी पुढची काही शतकं अमेरिका हे लुटीचं ठिकाण बनलं. कोलंबसाने वाट दाखवून दिल्यानंतर कित्येक स्पॅनिश, पोर्तुगिज, फ्रेंच, डच अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकत राहिले. पंधराव्या शतकात इंग्रजही येथे पोहोचले. त्यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी एकदम कापली नाही. त्यांनी गावं वसवली. शेती सुरू केली. सोनं, तांबं, लोखंडाच्या खाणी काढल्या. अमेरिकेत आलेल्या इतर युरोपीय लोकांवर आस्ते-आस्ते वर्चस्व मिळवत, अमेरिकेची पद्धतशीर लूट इंग्रजांनी चालू केली, पण त्याचा एवढा अतिरेक झाला की, अमेरिकेत स्थिरावलेल्या इंग्रजांनीच मायभूमी विरोधात स्वातंत्र्यलढा उभारला आणि ४ जुलै, १७७६ मध्ये इंग्लंडशी असणारे संबंध तोडून टाकले. राजा नसलेल्या या प्रजेनं लोकशाहीकडे वाटचाल सुरू केली. अमेरिकेचं रूपांतर ‘लँड ऑफ अपॉर्च्युनिटी’मध्ये होऊ लागलं.
अमेरिका म्हणजे ‘मेल्टिंग पॉट’, कोणीही इथं यावं आणि अंगभूत शक्ती, बुद्धी, कर्तुत्व, रंग, रूपाच्या बळावर भविष्य घडवावं, ही संधी अगदी अठराव्या शतकापर्यंत सर्वसमावेशक नव्हती. वर्णभेद होता. धार्मिक अंतर्विरोध होता. युरोपीय देशांमधल्या आपसातील वर्चस्वाची आणि स्पर्धेची दाट छायाही अमेरिकेतल्या वसाहतींवर होतीच. अठराव्या, एकोणीसाव्या शतकातल्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीनं अमेरिका समृद्ध, श्रीमंत बलवान होत गेली.
अमेरिकी समाजात निर्माण झालेल्या भेगा या रंगरगोटीमुळं पुरत्या बुजल्या मात्र नाहीत. व्यक्तिगत अभिव्यक्तीचं रूप देऊन हे तडे नियोजनबद्धपणे झाकले जात राहिले. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले खरे, पण त्यांच्या आधी ४३ ‘व्हाइट’ अध्यक्ष होऊन गेल्यानंतर! ओबामांचा विजय हे अमेरिकेतल्या सामाजिक एकजिनसीपणाचं, उदारमतवादाचं लक्षण नव्हतं, हे त्यांच्याच कारकिर्दीत पुढं अनेकदा सिद्ध झालं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये उफाळलेल्या असंतोशाची ही पार्श्वभूमी! ट्रम्प यांची चरफड ही केवळ राष्ट्राध्यक्षपदाच्या पराभवातून आलेली नाही. चौदाव्या शतकांपासूनच्या युरोपीय वर्चस्ववादाची, ‘व्हाइट डॉमिनेशन’ची दीर्घ परंपरा त्यामागे आहे. नोकऱ्या, राजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था या ठिकाणी गौरेतर माणसं वाढू लागल्यावर गोऱ्यांचं पित्त खवळलं. या ‘व्हाइट सुप्रीमसी’च्या अहंकाराला फुंकर घालत ट्रम्प निवडून आले. अनेक प्रतिगामी निर्णयांना ‘राष्ट्रवादा’ची फोडणी देत त्यांनी ‘व्हाइट सुप्रीमसी’ गोंजारली. वर्णवर्चस्वानं पछाडलेले ‘व्हाइट नॅशनॅलिस्ट्स’ बव्हंशी अमेरिकी गोरे; त्यांना ट्रम्प यांच्या राजकारणाशी देणं-घेणं नाही.
या तरुण झुंडींच्या रागामागे ‘कालपर्यंत गुलाम असलेले लोक आज आमची बरोबरी करतात,’ ही चरफड आहेच, शिवाय साधनसंपत्ती आणि सत्तेवर हक्क सांगतात याचंही दुखणं आहे. या वर्चस्ववादाचा चेहरा आज ट्रम्प आहेत, उद्या आणखी कोणी असेल. आजच्या काळातही अनेक क्षेत्रांतली गोऱ्यांची मक्तेदारी प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवली जाते. अधिकारी पदांवर गोऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणी सहसा खपवून घेतला जात नाही. वर्ण, भाषा, कुळ, देश असा कोणताही भेद न घेता येईल, त्यांना सामावून घेणारी अमेरिका ही खरोखरच कधी ‘मेल्टिंग पॉट’ होती का, हा खरा प्रश्न आहे. हा ‘मेल्टिंग पॉट’ मुळातच तडकलेला आहे, हे वॉशिंग्टनमधल्या गोंधळाने पुन्हा सिद्ध केलं. ट्रम्प यांच्या पतनानंतरही अमेरिकी समाजातला हा दुभंग संपणारा नाही.