‘मोअर’ कुठे कोण मागते आहे? गरजेपुरते तरी मिळू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:07 AM2021-09-23T11:07:42+5:302021-09-23T11:10:27+5:30
ज्यांना गरजेपेक्षा अधिक मिळाले; त्यांनी ‘आहे त्यात समाधान मानावे’ हे ठीक; पण ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्या जखमेवर कशाला मीठ चोळता, गडकरीजी?
डॉ. रविनंद होवाळ, प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडेच केलेल्या ‘ये दिल मांगे मोअर’ या विधानाची मोठी चर्चा सध्या सगळीकडे होत आहे, असे दिसते! मोठ्या माणसांच्या गोष्टींना नेहमीच मोठी प्रसिद्धी मिळत असते! त्यात ते केंद्रीय मंत्री असल्यावर त्यांचे म्हणणे महत्त्वाचे असणारच! ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनीही “लोकमत”मध्ये ‘ये दिल कशाला मांगे मोअर?’ हा लेख लिहून आहे त्यात समाधानी राहण्याचा सल्ला सर्वांना देतानाच ‘बोले तैसा चाले’चे प्रशस्तीपत्र गडकरींना दिलेले आहे. गडकरींना निदान त्यांच्या कामाबाबत तरी कोणी चॅलेंज करायला नकोच; असे मानायला आमची काही हरकत नाही. पण त्यांच्या काही विधानांशी असहमती व्यक्त करायला मात्र आम्हाला नक्कीच आवडेल!
गडकरींनी राजकीय नेत्यांच्या असमाधानी वृत्तीवर टीकास्त्र सोडले, हे योग्यच केले! असमाधानीपणा हा आपला आणि इतरांचाही अनेकदा घातच करतो. इतरांच्या तुलनेत ज्यांना बऱ्यापैकी काही मिळालेले आहे, अशांचा असमाधानीपणा तर जास्तच घातक. आजच्या समाजात अशा असमाधानी लोकांची संख्या फार मोठी आहे. परंतु या असमाधानात व त्यामुळे निर्माण झालेल्या असमाधानी लोकांत एक महत्त्वाचा फरक आहे. तो लक्षात न घेता आहे त्यात समाधानी राहण्याचा सल्ला सरसकट सर्वांना दिला, तर अनेक ठिकाणी तो अस्थानी ठरण्याचा संभव आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत आज काही भारतीय लोकही आहेत. त्या यादीच्या जवळपास जाणारेही अनेक जण आहेत. भारतातील बहुसंख्य गोरगरिबांपेक्षा खूपच अधिक श्रीमंत असलेलेही अनेक जण आहेत. पण भारतातील गरिबांतील गरीब लोकांप्रमाणेच हे श्रीमंत लोकही असमाधानी आहेत. या सर्वांच्या असमाधानात फरक केला पाहिजे! भारतातील नावारूपाला आलेले बहुतांश राजकारणी हे श्रीमंत वर्गातूनच आलेले आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीसाठी सध्याची खर्चाची मर्यादा चौपन्न लाख ते सत्तर लाख रुपये इतकी आहे, तर विधानसभेसाठी ती अठ्ठावीस लाख रुपये इतकी आहे. इतके रुपये तर भारतातील कोट्यवधी लोकांनी एका ठिकाणी कधी पाहिलेलेही नाहीत! अनेकांची तर जन्मभराची कमाईही इथपर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीत भारतातील किती लोकप्रतिनिधी असे आहेत, की जे स्वत: करोडपती असल्यामुळे खासदारकीसाठीचे मानधन घेत नाहीत किंवा घेतलेल्या मानधनाचा गोरगरिबांसाठी वापर करतात? उत्तर सर्वांनाच माहिती आहे.
आता सर्वसामान्यांकडे वळू! समजा, माझे वार्षिक उत्पन्न दहा - पंधरा - वीस किंवा चाळीस लाख रुपये, म्हणजे भारतातल्या बहुसंख्य गरिबांपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यातले निदान काही हजार रुपये तरी इथल्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी मी नियमितपणे खर्च करतो, असे म्हणणारे किती अराजकीय लोक आज आपल्याकडे आहेत? दुर्दैवाने या प्रश्नाचेही उत्तर निराशाजनकच आहे. पण पहिल्या प्रश्नाच्या निराशाजनक उत्तरामुळे आपल्याकडील अनेक चिकित्सक इतके बेहाल झालेले आहेत, की दुसरा प्रश्न विचारण्याचे भान किंवा तेवढी नैतिक अथवा बौद्धिक ताकदच त्यांच्यामध्ये आलेली नाही!
मतितार्थ काय, तर ‘ये दिल मांगे मोअर’च्या मायाजालात आपण सर्वजणच आकंठ बुडालेलो आहोत! आपापल्या क्षमतेला, गुणवत्तेला किंवा लौकिकाला साजेसा त्याग प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार का होईना, पण अधूनमधून करत राहायला काय हरकत आहे? कोणी अशा प्रकारे थोडाफार त्याग समाजासाठी करत असेल, तर त्याला किंवा त्याच्या विधानांनाही गडकरींच्या विधानापेक्षा थोडी कमी का असेना, पण प्रसिद्धी मिळायला काय हरकत आहे?
आदर्श जीवन जगणारे काही लोक समाजाला त्याच्या नजरेसमोर दिसायला हवे असतात! ते दिसत राहिले, की इतर लोकही त्यांचा थोडाफार आदर्श घेतात व समाजात परिवर्तन होते! प्राचीन काळी बुद्धांसारख्या लोकांनी त्यासाठीच भारतात भिक्खू संघ निर्माण केले होते. भिक्खूंना त्यागपूर्ण जीवन जगायला शिकवले होते. आजच्या भारतात मात्र बुद्धांचा अनुनय करणे हा गुन्हा ठरतो की काय, अशी अवस्था आहे.
‘आहे त्यात समाधानी रहा’ हा विचार सर्वसामान्य स्थितीत अत्यंत उपयुक्त ठरतो, यात शंका नाही! पण ज्यांना गरजेपुरते मिळालेले आहे किंवा गरजेपेक्षा अधिक मिळालेले आहे, त्यांच्यासाठी तो अधिक उपयुक्त आहे. ज्यांना त्यांच्या लायकीनुसार, गुणवत्तेनुसार किंवा गरजेनुसार पुरेसे मिळालेले नाही, अशा लोकांच्या जखमेवर मात्र ते मीठच! असे लोक आपल्या विचारविश्वात निदान उपस्थित तरी आहेत की नाही, हाही आज प्रत्येकानेच विचारात घ्यावा, असा महत्त्वाचा प्रश्न! ज्याच्याकडे घर, गाडी, संपत्ती, परिवार, नोकरी, उद्योगधंदा असे थोडेफार तरी काही आहे, असा माणूस आज आहे त्यात समाधानी राहू शकेल; पण जो बेघर, बेरोजगार, उपेक्षित आहे असा माणूस आहे त्यात समाधानी कसा काय राहू शकेल? गडकरींनाही याची पूर्ण जाणीव असेलच; परंतु समाजातील सर्व कारभाऱ्यांना ती आहे, असे मात्र त्यांच्या सध्याच्या वर्तनाकडे पाहता अजिबात दिसून येत नाही. त्यामुळे या कानपिचक्या फक्त त्यांच्यासाठी!