पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा?

By अतुल कुलकर्णी | Published: October 19, 2022 10:09 AM2022-10-19T10:09:25+5:302022-10-19T10:09:54+5:30

‘माघार’ नाट्याची पटकथा नेमकी कुणी लिहिली? राजकीय बेरीज-वजाबाकीत कुशल भाजपचे स्वतःचे गणित इतके कसे चुकले?

Who benefits in politics behind the screen devendra fadnavis uddhav thackeray shiv sena andheri bypoll rutuja latke | पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा?

पडद्याआडच्या ‘राज’कारणात फायदा कोणाचा?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, 
संपादक, लोकमत, मुंबई

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळू नये इथून सुरू झालेली लढाई, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेण्यावर संपली. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. भाजपला पराभवाची भीती होती म्हणून हे असे केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांना अडचणीत आणले इथपर्यंत चर्चा झाल्या. मुरजी पटेल यांना भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता. पटेल यांच्याविषयी बाहेर काहीही समज असले तरी त्यांनी स्वतःचा असा मोठा मतदार बांधून ठेवलेला आहे. ही निवडणूक जिंकली तर मुंबई महापालिकेसाठी फायदा होईल असे एका गटाचे मत, तर पराभवाचे नकारात्मक परिणाम जास्त होतील असे म्हणणारा दुसरा गट. या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने माघार घेतली गेली त्याचा फटका भाजपला बसेल. नेमकी राजकीय गणिते मांडण्यात कुशल असणाऱ्या भाजपचे स्वतःचे गणित कसे चुकले? 

प्रचार सुरू होण्याआधी चार पाच हजार मतांनी ही निवडणूक भाजपला अडचणीची होती. प्रचारात लावला जाणारा ‘जोर’ ठाकरे गटापेक्षा आपल्याकडे जास्त आहे, त्यातून हा फरक कमी करता येईल, असा सूर होता. मात्र भाजपचे काही वरिष्ठ नेते संभ्रमात होते. याच काळात मुंबई भाजपचे अध्यक्ष  आशिष शेलार मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. मनसेने पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला, तेव्हा राज ठाकरे यांनी “ही निवडणूक तुम्ही कशासाठी लढत आहात?” असा थेट सवाल केला. निवडणूक उद्धव ठाकरे यांनी जिंकली तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत ते सगळ्या ठिकाणी सभा घेत फिरतील. त्यांना फुकटची ताकद कशाला देता? त्यापेक्षा ही निवडणूक न लढवता खूप गोष्टी साध्य करता येतील, असे गणित राज यांनी मांडले. त्यांच्या घरूनच फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झाली.

या भेटीने भाजप नेत्यांच्या अस्वस्थतेला  खतपाणी घातले आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या नाट्याची पटकथा लिहिण्याचा निर्णय झाला. अर्ज मागे घेतल्यास दोन दिवस चर्चा होईल, मात्र निवडणूक हरलो तर त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होईल, यावर  एकमत झाले. मग उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समोरच्या उमेदवाराने किमान विनंती तरी केली पाहिजे, असा मुद्दा पुढे आला. उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणीही फोन करायला तयार नव्हते. त्यावेळी या पटकथेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एन्ट्री झाली. सध्या एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेलार, पवार यांच्यात सतत भेटी होत आहेत. त्या ठिकाणी या विषयाची चर्चा झाली. शरद पवार यांनी प्रथा परंपरांची आठवण करून द्यायचे ठरले. त्यानुसार पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. लगोलग ठाकरे यांनी पवारांचे कौतुक करणारी भूमिका घेतली.

दरम्यान, ठाकरे गटात वेगळीच चलबिचल सुरू होती. अंधेरी पोटनिवडणुकीची जबाबदारी ठाकरे गटातून अनिल परब यांच्यावर देण्यात आली होती. परब काही दिवस ईडी कार्यालयाला भेटी देऊन आले आहेत. अशात भाजपची नाराजी त्यांना कशी परवडावी, हा प्रश्न होता. शिवाय या निवडणुकीचा खर्च कोणी करायचा हा आणखी एक प्रश्न ! त्यामुळे परब यांनी शेलार यांच्याशी पडद्याआड संपर्क साधल्याच्या बातम्या होत्या. 

भाजपची उमेदवारी ठेवायची की मागे घ्यायची हा विषय नंतर थेट दिल्ली दरबारी गेला. एका पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पणाला लावणे बरोबर नाही, आपले लक्ष्य मुंबई महापालिका आहे, इथे एनर्जी वाया घालवायची की नाही हा निर्णय घ्या, असा निरोप दिल्लीहून आला आणि या नाट्याच्या पटकथेचा शेवट लिहिणे सुरू झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. प्रथा परंपरांचा हवाला दिला. याआधी तुम्ही तीनवेळा प्रथा परंपरांना बगल देत निवडणुका लढविल्या होत्या, त्याचे काय..? - असा सवाल त्यांना कोणीही केला नाही. त्यांनीही त्याचे उत्तर दिले नाही.  “मुंबई भाजपची निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा होती. मात्र कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात”, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर घेतली.

या सगळ्या नाट्यात शिवसेनेचा विजय झाला, असे वाटत असले तरी शिवसेनेची अवस्था “गड आला, पण सिंह गेला”, अशी झाली आहे. ही निवडणूक भाजपसोबत लढून शिवसेनेने जिंकली असती तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना याचे मोठे भांडवल करता आले असते. ती संधी ठाकरे गटाने गमावली. आता लुटुपुटुची लढाई होईल. त्यात ठाकरे गटाचा उमेदवार विजयी होईल. मात्र आम्ही उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिवसेनेला हे यश मिळाले असे भाजप म्हणत राहील आणि तुम्ही जिंकू शकत नव्हता, म्हणून माघार घेतली असे ठाकरे गट म्हणत राहील. ताकद दाखविण्याची चालून आलेली संधी दोघांनीही गमावली आहे. 

निवडणूक जिंकूच शकत नव्हतो किंवा आपल्याला ही निवडणूक लढायची नव्हती तर भाजपने एवढे शक्तिप्रदर्शन का केले? - हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेवटी उरतोच. ज्याचे उत्तर कोणीही समोर येऊन देताना दिसत नाही.
atul.kulkarni@lokmat.com

Web Title: Who benefits in politics behind the screen devendra fadnavis uddhav thackeray shiv sena andheri bypoll rutuja latke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.