दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी कोणाला नको आहेत?

By admin | Published: September 6, 2015 04:33 AM2015-09-06T04:33:08+5:302015-09-06T04:33:08+5:30

जसजशी वैज्ञानिक प्रगती होईल, तसतसा समाज हजारो वर्षे जनमानसात खोल रुजलेल्या धार्मिक अंधश्रद्धांच्या जाळ्यातून बाहेर पडून विवेकी बनेल, असा समज होता.

Who do not want Dabholkar, Pansare, Kalaburgi? | दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी कोणाला नको आहेत?

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी कोणाला नको आहेत?

Next

- मेघा पानसरे

जसजशी वैज्ञानिक प्रगती होईल, तसतसा समाज हजारो वर्षे जनमानसात खोल रुजलेल्या धार्मिक अंधश्रद्धांच्या जाळ्यातून बाहेर पडून विवेकी बनेल, असा समज होता. परंतु, प्रत्यक्षात असे घडत नाही. येथे हितसंबंधांचा प्रश्न आडवा येतो; आणि या मार्गात जो आडवा येईल त्याची हत्या होते. महाराष्ट्र आणि आता कर्नाटकात ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे.

डॉ. कलबुर्गी यांच्या वैचारिक कार्याचे स्वरूप लक्षात घेता, त्यांचे डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्याशी असलेले वैचारिक नाते स्पष्ट दिसून येते. ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ व ‘धर्मचिकित्सा’ हा या तिन्ही विचारवंतांच्या कृतिशीलतेचा महत्त्वाचा आधार होता.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक करून जनसामान्यांना डोळस बनविणे, त्यांना बुद्धिप्रामाण्यवाद शिकविणे, त्यासाठी महाराष्ट्रातील दीर्घ बुद्धिप्रामाण्यवादी परंपरा व संतांच्या शिकवणुकीचे भान आणून देणे, हे डॉ. दाभोलकरांच्या कार्याचे उद्दिष्ट होते. अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावावर चालणारा व्यापार टिकून राहण्यात कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे समाजासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. डॉ. दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतून शोषक जाती व्यवस्थेवर प्रहार करीत होते. धार्मिक अंधश्रद्धेतून होणाऱ्या सामाजिक शोषण व्यवस्थेला आव्हान देत होते. त्यासाठीच त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा आग्रह धरला होता.
कॉ. पानसरे हे आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करीत होते. इतिहासाचे विश्लेषण करून राजा शिवाजीचा लढा हा धार्मिक संघर्षाचा नसून, राजकीय संघर्ष होता, अशी वस्तुनिष्ठ मांडणी त्यांनी केली. शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण हे त्यांच्या विचार आणि कर्तृत्वावर अन्याय करणारे आहे, असे सांगून त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना थेट आव्हान त्यांनी दिले. धर्मसत्ता, पुरुषसत्ताक व्यवस्था, शासन व्यवस्था आणि भांडवली अर्थ व्यवस्थेचे धागे शोषण प्रक्रियेत एकमेकांत कसे गुंतलेले आहेत, ते कॉ. पानसरे अतिशय साध्या, सरळ भाषेत लोकांना सांगत. कोल्हापुरात झालेली आंदोलने पाहिली, तर त्यांच्या प्रबोधनाचा प्रभाव जनसामान्यांवर किती मोठा होता, ते दिसून येते. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या शंकराचार्यांच्या विरोधी आंदोलन, विश्वशांती यज्ञाच्या विरोधातील जनआंदोलनांत जोतिबा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा मानणाऱ्यांना संघटित करून रस्त्यावर उतरविणे, हे मोठे यश होते. राजर्षी शाहूंचे विचार व कार्य यांची आजच्या काळातील प्रस्तुतता नव्या पिढीसमोर आणण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपाऱ्यांत व्याख्याने त्यांनी दिली. अलीकडे महात्मा गांधींचा निर्घृण खून करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याच्या प्रवृत्तीवर ते थेट टीका करीत होते. हिंदुत्ववाद्यांच्या हिंसक कारवायांना विरोध करीत होते.
वैज्ञानिक, चिकित्सक दृष्टिकोन, विवेकवाद, समतावाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही भारताच्या संविधानाने दिलेली तत्त्वे नव्या पिढीत रुजवू पाहणाऱ्यांना हिंसेच्या मार्गाने संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. एकामागोमाग एक ज्येष्ठ विचारवंत आपला जीव गमावताहेत. धर्मचिकित्सा करणाऱ्यांना ठार मारण्याची हिंसेची ही परंपरा प्राचीन काळापासून आपल्या तथाकथित सहिष्णू संस्कृतीत आहेच. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर ‘सनातन प्रभात’ या दैनिकाने आनंद व्यक्त केला होता. डॉ. कलबुर्गींच्या हत्येनंतर बजरंग दलाचे सहनिमंत्रक भूवित शेट्टी याने कलबुर्गी यांना आम्ही मारले असून, विवेकवादी विचारवंत व टीकाकार के.एस. भगवान हे आमचे लक्ष्य असतील, असे ट्विट केले व त्यानंतर ते नष्ट केले.
या काळात पुरोगामी तत्त्वांशी वैचारिक बांधिलकी मजबूत करून कार्यरत राहणे हाच एक पर्याय आहे. तिन्ही विचारवंतांचे मारेकरी आणि त्यांच्यामागील सूत्रधार समाजासमोर आलेच पाहिजेत; त्यासाठी हिंसेविरुद्ध तीव्र जनआंदोलन हाच एक मार्ग आहे.


(लेखिका कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्नुषा आहेत.)

Web Title: Who do not want Dabholkar, Pansare, Kalaburgi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.