आम्ही कोण म्हणुनि काय पुसता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:08 AM2017-11-21T00:08:01+5:302017-11-21T00:08:40+5:30
- नंदकिशोर पाटील
(कविवर्य केशवसुतांची क्षमा मागून)
आम्ही कोण म्हणुनि काय पुसतां?
आम्ही असू लाडके-
कानामागे काढुनि जाळ, फोडितो कपाळ
जरी असू आम्ही धाकटे।
आमुच्या नादी लागू न कोणी
फुटपाथावरती पसरून पथारी
इथून खसका, दाविन हिसका
कुठे बंगाल अन् कोण बिहारी।
नको खाकरा, नको ढोकळा
वडापाव तो पोटभरी
कशास हवी बुलेट ट्रेन ती?
आमुचि लोकल नि बेस्ट बरी।
कानडीचा तो सिद्धरामय्या
ममतांनाही बंगाली प्यारी
गुजरातीचा जगी डंका
मराठी तुम्हा टोचती का रे? ।
आम्ही कोण म्हणुनि काय पुसतां?
टीव्हीवरी परवा न तुम्ही का पाहिले?
ठाण्यात गर्जलो असे की-
न कुणास लागू देऊ सुगावा परी
डोळ्यांदेखत घालू दरोडा आता बँकांवरी ।
काय बोलतो, म्हणुनि पुसता का आम्हां?
हिरे चमकती, मोती टपकती
तिकडे समृद्धीच्या खुणा
देवेंद्राची रिती तिजोरी
का व्हावे कर्जबाजारी पुन्हा? ।
कमळाच्या फुलती बागा
आम्ही मग्न तळ्याकाठी
इशारे कसले देता?
वाघांचे झाले ससे।
भाऊबंद न कोणाचे आम्ही
न चाड कोणाची आम्हाला
खळ्ळखट्याक् काय ते?
कळेल थांबा तुम्हाला।
असे न कोणी मागेपुढती
पेटविन पुन्हा सारे रान
आभाळातील तोडुनि तारे
कानाखाली काढीन जाळ।
आम्हाला वगळा-रेल्वेला येईल भरती फुटपाथावरती दिसेल बिहारी
आम्हाला वगळा-घसरेल टीआरपी, उठतील सवाल, गतप्रभ क्षणी होतील माध्यमे सारी ।।