हे कसले बायो-बबल? गर्भश्रीमंत बीसीसीआयपुढे कोरोनाचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:37 AM2022-02-04T09:37:59+5:302022-02-04T09:39:03+5:30

अटीतटीचे स्पर्धात्मक सामने खेळताना बायो-बबलमध्ये राहणे ही खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा पाहणारे आहे. विविध देशांच्या खेळाडूंनीही अनेकदा बायो-बबलमध्ये राहणे मानसिकरीत्या आव्हानात्मक असल्याचे जाहीररीत्या स्पष्ट केलेले आहे

Who is the bio-bubble? Questions on the functioning of the fetus-rich BCCI | हे कसले बायो-बबल? गर्भश्रीमंत बीसीसीआयपुढे कोरोनाचं आव्हान

हे कसले बायो-बबल? गर्भश्रीमंत बीसीसीआयपुढे कोरोनाचं आव्हान

Next

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त बुधवारी रात्री समोर आले आणि एकच खळबळ माजली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या ४ दिवस आधीच भारतीय खेळाडूंना कोरोनाने ‘बाद’ केल्याने पुन्हा एकदा बीसीसीआयने तयार केलेल्या “जैविक कवचा”वर (बायो-बबल) प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाने गाठण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयपीएल, इंग्लंड दौऱ्यात कोरोनाचा प्रश्न उद्भवल्याने बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा आणि इंग्लंड दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. हा अनुभव पाठीशी असताना आणि सध्या कोरोनाचे सावट पूर्णपणे नाहीसे झालेले नसतानाही बीसीसीआय विविध मालिका, दौरे आणि स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न का करत आहे, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडणे स्वाभाविक आहे. यामागे अर्थातच आर्थिक गणित आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयसाठी ‘सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे मे महिन्यात अर्ध्यावर स्थगित करण्यात आली होती. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामने खेळविणे अशक्य झाले होते. यावेळी सर्वच विदेशी खेळाडूंनी भारतातील गंभीर स्थिती पाहून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि हा दौराही अखेरचा कसोटी सामना स्थगित करून तात्पुरता संपविण्यात आला. हे दोन मोठे अनुभव पाठीशी असतानाही बीसीसीआयने खेळाडूंच्या जिवाशी खेळणे मात्र सोडले नाही. त्यामागचे कारण  उघड आहे. कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती काही का असेना, क्रीडांगणावर क्रिकेटचे सामने आणि त्यासाठी  दौरे झाले नाहीत, तर बीसीसीआयला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. 

अटीतटीचे स्पर्धात्मक सामने खेळताना बायो-बबलमध्ये राहणे ही खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा पाहणारे आहे. विविध देशांच्या खेळाडूंनीही अनेकदा बायो-बबलमध्ये राहणे मानसिकरीत्या आव्हानात्मक असल्याचे जाहीररीत्या स्पष्ट केलेले आहे. मात्र, त्याकडेही बीसीसीआयने सतत दुर्लक्ष केले. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेली खेळाडूंमधील स्पर्धाच बीसीसीआयच्या पथ्यावर पडत आहे. जर एखाद्या खेळाडूने कोरोना किंवा बायो-बबलचे कारण देऊन माघार घेतली, तर त्याची जागा घेण्यास दुसरा खेळाडू सज्जच असतो. त्यामुळे खेळाडूही सहजासहजी माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाहीत. बीसीसीआयने कायम, क्रिकेटचे सामने सुरक्षित वातावरणात व्हावेत यासाठी आम्ही कठोर बायो-बबल तयार करत असून, यामध्ये कोरोनाचा शिरकाव होणे खूप कठीण असल्याची भूमिका घेतली होती; पण बीसीसीआयचा हा फुगा आता फुटला आहे. पुढच्याच आठवड्यात आयपीएलचा लिलाव सोहळाही पार पडणार आहे. त्यासाठीही बीसीसीआयने कठोर बायो-बबल तयार करून फ्रेंचाईजींसाठी काही नियमावली तयार केली. मात्र, आता अहमदाबाद येथे विंडीजविरुद्धच्या मालिकेच्या काही दिवसआधीच खेळाडूंना कोरोना झाल्याने, बीसीसीआयच्या क्षमतेवरच प्रश्न निर्माण होत आहेत. अर्थात कोरोना संसर्गाचा प्रश्न फक्त क्रिकेटपुरताच मर्यादित नाही. मुंबईत एएफसी महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. पुण्यात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा सुरू आहे, तर गोव्यात आयएसएल सामने सुरू आहेत. यातील महिला फुटबॉलमध्ये भारतीय संघाला कोरोनाची लागण झाल्याने माघार घ्यावी लागली. हा एक अपवाद वगळता खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे इतर कोणतेही वृत्त समोर आले नाही. याचा अर्थ या सर्व संघांच्या व्यवस्थापनांनी कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी “बायो-बबल”ची उत्तम व्यवस्था केलेली आहे.  

अत्यंत श्रीमंत संस्था असलेल्या बीसीसीआयला सक्षम बायो-बबल तयार करण्यात नेमके कुठे अपयश येत आहे, हाच प्रश्न पडतो. वेस्ट इंडिजचा संघ नुकताच अहमदाबादला पोहोचला आहे. त्यांच्या संघातही कोरोनाचे लक्षण आढळण्याची शक्यता अधिक आहे. खेळाडूंना सामने मिळावेत, प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळावा, अनेकांचे रोजगार यावर अवलंबून असतात या सर्व गोष्टी मान्य; पण वर्षभर सतत खेळत असलेल्या भारतीय संघाला सध्याच्या दिवसांमध्ये कमी खेळवले तरी कोणाचे काहीच बिघडणार नाही. केवळ एकच गोष्ट बिघडेल ती म्हणजे बीसीसीआयचे आर्थिक गणित. त्यांची तिजोरी सतत भरलेली राहावी यासाठीच सुरू आहे हा खटाटोप.

Web Title: Who is the bio-bubble? Questions on the functioning of the fetus-rich BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.