वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

By विजय दर्डा | Published: November 28, 2022 10:03 AM2022-11-28T10:03:51+5:302022-11-28T10:05:15+5:30

पुलवामा हल्ल्याचे रक्त हातावर असलेल्या सय्यद असीम मुनीर यांनीच इम्रान खान यांच्या भारत-पाक मैत्रीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला होता !

'Who' made Munir the chief of Pakistan army?, who is responbile for pulwama attack | वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

googlenewsNext

विजय दर्डा

पाकिस्तानात लष्करप्रमुख कोणीही होवो, त्याच्याकडून काही भले घडेल अशी अपेक्षा भारत करू शकत नाही! पण पुलवामासारख्या भयंकर हल्ल्याचा सूत्रधार असलेले सय्यद असीम मुनीर हे गृहस्थ पाकिस्तानी लष्करप्रमुख होत असतील तर भारतासाठी ही अधिक चिंतेची गोष्ट होय. पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांच्या रक्तातच दहशतवाद कसा आहे, हेच मुनीर यांची निवड दाखवून देते.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामात तो भयानक हल्ला झाला. शंभर किलोपेक्षा जास्त स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बसवर धडक दिली होती. सीआरपीएफचे ४० जवान त्या हल्ल्यात शहीद झाले. जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. केवळ जैश ए मोहम्मद नव्हे, तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसुद्धा या हल्ल्यात सहभागी होती, हे पुढे चौकशीत उघड झाले. त्या वेळचे आयएसआय प्रमुख होते सय्यद असीम मुनीर शाह. त्यांच्याच सांगण्यावरून झालेल्या या हल्ल्याचा साधा सुगावाही तत्कालीन पंतप्रधान  इम्रान खान यांना लागला नव्हता. अशा अती-संवेदनशील नियोजनाची माहिती देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासारख्या महत्त्वाच्या  लोकांना नक्कीच असते; परंतु पाकिस्तानमध्ये सगळेच उलटे असते. पाकिस्तानी सेना आणि आयएसआय स्वतःच सगळे काही करून टाकतात आणि राजकीय सत्ताधीशांना मात्र घटना घडून गेल्यावर खबर लागते.. नवाज शरीफ असोत, बेनझीर भुत्तो किंवा इम्रान; देशात नक्की  काय चालले आहे याची त्यांना खबरबात नसते. पाकिस्तानमध्ये निवडून आलेल्या सरकारला लष्कराने कधी कामच करू दिलेले नाही. या देशात लष्कर आणि आयएसआय आपले समांतर सरकार चालवते. जेवढ्या म्हणून दहशतवादी संघटना आहेत त्यांचे प्रमुख आयएसआय आणि पाकिस्तानच्या मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारीच आहेत; तेच दहशतवाद्यांना सामग्री पुरवतात, हत्यारे, पैसा देतात. हे दहशतवादी भारताविरुद्ध मोहिमा चालवतातच शिवाय पाकिस्तानातील राजकीय सत्तेलाही संत्रस्त करणे आणि लोकांना भयभीत करण्याचे  कामही ते करतात. आपल्या हुकुमाविरुद्ध कोणी वागू नये यासाठी हे केले जाते. भारतात  सुखशांतीचे वातावरण  असलेले ज्यांना सहन होत नाही, असे लोक/देश पाकिस्तानी लष्कराला मदत करत राहतात. पूर्वी दूरवरचा एक देश मदत करत असे आता एक शेजारी देश करतो आहे एवढेच!

पुलवामा हल्ल्यानंतर इम्रान खान यांच्यावर चहुबाजूने टीका झाली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या चौकशीत असे आढळले की ऑक्टोबर २०१८ मध्ये आयएसआय प्रमुख होताच मुनीर काहीतरी धडाका करू इच्छित होते. त्याचाच परिणाम म्हणजे पुलवामा येथील हल्ला.  २६ फेब्रुवारी २०१९ ला भारताने बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या एका मोठ्या छावणीवर हवाई हल्ला केला आणि बरेच दहशतवादी मारले गेले, तेव्हा इम्रान खान यांचा  मुनीर यांच्यावरच वहीम होता. जून २०१९ मध्ये मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुख पदावरून हटवले गेले.  २०१७च्या सुरुवातीला जेव्हा मुनीर यांना मिलिटरी इंटेलिजन्सची जबाबदारी देण्यात आली, तेव्हापासून आयएसआय प्रमुखपदाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी सातत्याने भारतविरोधी रणनीती आखली. इम्रान भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा हे मुनीर दोन्ही देशातील संबंध विनाशाकडेच कसे जातील, याच्या तजविजीत होते. आयएसआय प्रमुख पदावरून हटविले गेल्यानंतर मुनीर उघडपणे इम्रान खान यांच्या विरोधात गेले. इम्रान यांच्या पत्नी बुशरा बेगम यांच्या भ्रष्टाचारावर टिप्पणी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपत आहे. मुनीर या आधीच निवृत्त होणार होते. परंतु त्यांना सेनाप्रमुख पदावर आणले जाण्याचे एक मोठे कारण ते इम्रानच्या विरोधी आहेत! आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मते मुनीर यांना लष्करप्रमुखपद देण्यासाठी चीनने मोठा दबाव आणला होता. पाकिस्तान सध्या चीनच्या कर्जाखाली दबलेला आहे. आणि चीनकडून येणारा आदेश टाळण्याची हिंमत त्याच्यात नाही. नाहीतरी  पाकिस्तानात सरकारचे लष्कर नसते तर लष्कराचे सरकार असते. बाजवा यांच्या काळात पाकिस्तानी लष्कराने आपण सत्तेपासून दूर आहोत, असे दाखवण्याचे निदान नाटक तरी केले!- पण ते शेवटी नाटकच! पाकिस्तानात  सत्ता तर लष्कराचीच असते. इम्रान खान यांनी प्रयत्न केले खरे, पण भारताशी  मैत्रीचे नाते कायम व्हावे, असे पाकिस्तानी लष्कराला अजिबात वाटत नाही.  दोन देशांमध्ये मैत्रीचे नाते असले, तर मग पाकिस्तानी लष्कराचे महत्त्व ते काय  उरले?

पाकिस्तानी लष्कर एखाद्या व्यावसायिक संस्थेसारखा विचार करते. त्यांच्याकडे उद्योग आहेत. ते व्यापार करतात. लष्कराने स्वतःला इतके समृद्ध केले आहे की पाकिस्तान सरकारची त्यांच्याविरुद्ध जाण्याची मुळात हिंमतच होऊ नये! आज सत्तेत असलेले लोक लष्करापुढे नतमस्तक़ आहेत. त्यांच्यात इम्रान यांच्यासारखी ताकद नाही. पुलवामा हल्ल्याच्या रक्ताने हात माखलेले मुनीर हे पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचे अत्यंत भरवशाचे गृहस्थ असणार, यात शंका नाही. मुनीर लष्करप्रमुख झाले म्हणजे भारतविरोधी धोरणांना प्रोत्साहन देण्याचेच उद्योग सुरू होणार. मुनीर यांना काश्मीरच्या कानाकोपऱ्याबद्दल  माहिती असते, असे म्हटले जाते. दहशतवाद्यांशीही त्यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत. असा गृहस्थ पाकिस्तानचा प्रत्यक्षातला शासक झाल्याने भारताला जास्त सावध राहण्यावाचून गत्यंतर नाही! मुनीर यांचा कोणताही मनसुबा यशस्वी होणार नाही याकडे आपल्या गुप्तचर यंत्रणांना लक्ष द्यावे लागेल. काही कुरापत काढलीच तर आपण तत्काळ सडेतोड उत्तर दिले पाहिजे.

(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

Web Title: 'Who' made Munir the chief of Pakistan army?, who is responbile for pulwama attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.