देशाचे पुढचे राष्ट्रपती कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:31 AM2021-08-19T07:31:00+5:302021-08-19T07:31:26+5:30

‘तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?’ - अनिशा विखे-पाटील या मराठी मुलीने पंतप्रधान मोदी यांना केलेल्या या प्रश्नाने चर्चेत जान आली आहे!

Who is the next President of India? | देशाचे पुढचे राष्ट्रपती कोण?

देशाचे पुढचे राष्ट्रपती कोण?

googlenewsNext

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

विक्रमी संख्येने विधेयके संमत झाली असली तरी कोणत्याही विषयावर अर्थपूर्ण चर्चा न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया गेले, असेच म्हणावे लागेल. मात्र सत्तापीठाच्या आसपासचा कानोसा घेताना राजधानी दिल्लीत बरेच काही घडताना दिसते आहे. भाजप नेतृत्वाने जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतैक्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्का दिला होता. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर राष्ट्रपती भवनात एखादा संघ स्वयंसेवक विराजमान व्हावा यासाठी ‘तिकडून’ एखादे नाव येईल अशी अटकळ होती. पण, मोदी यांनी बिहारच्या तत्कालीन राज्यपालांचे नाव समोर ठेवले. खरेतर, एम. व्यंकय्या नायडू यांना सक्रिय राजकारणात राहण्याचीच इच्छा होती. पण, मोदींना राज्यसभा चालवण्यासाठी आणि उपराष्ट्रपती म्हणून कट्टर पक्षीय माणूस हवा होता. या वेळी मात्र राष्ट्रपतीपदासाठी नायडूंचे नाव सर्वांत वर आहे. 

अर्थात प्रत्यक्षात तसे घडण्यात अनेक जर तरच्या गोष्टींचे अडसर आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे नाव अचानक पुढे आले आहे. ते राज्यसभेतले पक्ष नेते असून, निवृत्तीसाठी पंचाहत्तरी गाठायला त्यांना अजून २ वर्षे बाकी आहेत. कर्नाटकचे राज्यपालपद अचानक स्वीकारताना त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. ते दलित असून मृदुभाषी, पक्षाचे जुने जाणते नेते मानले जातात. सामाजिक अभियांत्रिकी डोक्यात ठेवून भाजपचा कारभार चालत असल्याने गेहलोत यांचे नाव चर्चेत आहे. शिवाय गुजरातमधून आलेल्या व्यक्तींची नावे तर अशा चर्चेत असणारच. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही नाव घेतले जात आहे. त्या महिला आणि मोदीनिष्ठ असणे हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण. काही माहीतगारांचे म्हणणे कोविंद यांचेच नाव पुन्हा वर येऊ शकते. अर्थात, मोदींच्या डोक्यात दुसरा काही बेत शिजत नसेल, तरच!  

भाजपची प्रादेशिक पक्षांशी बोलणी
संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर ज्येष्ठ नेत्यांमध्ये प्रारंभिक बोलणी झाली. मोदी मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले. या जुळ्या पदासाठी तुमच्या पक्षाचा कोणी उमेदवार आहे काय?- असे त्यांनी विचारून घेतले म्हणतात. देशातील सर्वोच्च पदासाठी भाजप एकमताने उमेदवार देऊ इच्छितो. त्यासाठीच बिगर भाजप, बिगर काँग्रेस पक्षाशी बोलणी होत आहेत. वायएसआर काँग्रेस,  टीआरएस, बिजू जनता दल आणि इतर पक्षांचा त्यात समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य मंडळी या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये सहभागी आहेत. दोन प्रमुख गट वगळता वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल आणि टीआरएस या पक्षांचे सर्वाधिक संख्याबल  संसदेत आहे, हे त्यामागचे कारण!

चर्चा कशामुळे सुरू झाली? 
‘तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?’- महाराष्ट्रातून मोदींच्या भेटीला गेलेल्या अनिशा विखे-पाटील या दहा वर्षांच्या मुलीने पंतप्रधान मोदी यांना केलेल्या या प्रश्नाने त्यांचा त्रिफळाच उडाला. कारभाराचा विचार करता राजकीय दृष्टीने पंतप्रधान हे पद महत्त्वाचे असले तरी राष्ट्रपती सर्वोच्च मानले जातात. अर्थात, या साध्या प्रश्नातली राजकीय गोम त्या निरागस मुलीला कळली नसेल. नगर जिल्ह्यातले नामांकित राजकीय नाव म्हणजे राधाकृष्ण विखे.  अलीकडेच भाजपत गेलेले त्यांचे पुत्र सुजय यांची अनिशा ही मुलगी. तिच्या मनात नेमके काय आहे हे न कळल्याने कुटुंबीय गोंधळले आणि त्यांनी मुलीला पुढे बोलूच दिले नाही. मात्र या प्रसंगामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात काय हालचाली सुरू आहेत हे समोर आले.

‘डार्क हॉर्स’ राजनाथ
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा खांदेपालट सध्या भाजपत होत आहे, असे पक्षाचे  निरीक्षक  हल्ली म्हणतात. २०१४ साली मोदी सत्तेवर आल्यावर पंचाहत्तरीच्या पुढच्या नेत्यांना बाजूला केले गेले. २०२१ साली दुसऱ्या हप्त्यातले बदल झाले. अटल - अडवानी काळातले राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी हे दोनच नेते असे की ज्यांना हात लावला गेला नाही. राजनाथ यांनी जबर सहनशक्ती दाखवली. गडकरी यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. गडकरी यांच्या सहकारी संस्थांविषयी त्यांच्याच पक्षाच्या प्रांत अध्यक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर उंटाच्या पाठीवर शेवटची काडी पडणे अजून बाकी असल्याचे म्हणतात. रा. स्व. संघाच्या बाहेरची माणसे मोदी स्वत: निवडतात, असे त्यांनी केलेल्या अलीकडच्या खांदेपालटात दिसून आले आहे. यामुळेच  कदाचित राजनाथ यांना उपराष्ट्रपती केले जाईल, असे मानले जाते आहे. राजनाथ यांचीही याला ना नसेल. प्रासादतुल्य रायसीना हिल्समध्ये मुक्कामाला जाणे कोणाला आवडणार नाही?

Web Title: Who is the next President of India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.