कोण हे उल्लू..?
By admin | Published: March 5, 2017 11:37 PM2017-03-05T23:37:14+5:302017-03-05T23:37:14+5:30
विदर्भातल्या राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्याने परवा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या उक्तीचा प्रत्यय दिला
विदर्भातल्या राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्याने परवा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या उक्तीचा प्रत्यय दिला. तोदेखील सक्रिय राजकारणात ५० वर्षे हयात घालविलेल्या शरद पवार यांच्यासारख्या धुरंधर नेत्यासमोर. ह्यतुम्ही सांगाल ते नगरसेवक आम्ही इव्हीएममध्ये फेरफार करून निवडून आणू, अशी आॅफर आपल्याला एकाने दिली होती. त्याचे बिंग फोडण्यासाठी त्याने जेवढे पैसे सांगितले ते मान्य करुन आपण त्याला काही रक्कम अॅडव्हान्सही दिली, पण दोन दिवसांनी तो माणूस परत आला व आम्ही भाजपाचे काम घेतले आहे, तुमचे करता येणार नाही. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे काम करायचे नाही, अशा सूचना आहेत असे सांगून त्याने घेतलेला अॅडव्हान्स परत केला, असा स्वानुभव त्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या बैठकीत कथन केला. हे सांगणे म्हणजे संधीअभावी चारित्र्यवान राहण्यासारखे आहे. स्वत:ची मंत्रिपदाची खुर्ची टिकविण्यात ज्यांची कारकीर्द गेली, असे हे नेते यापेक्षा वेगळे काही करू शकत नाहीत. जर त्यांना इव्हीएम मशीनमधील गडबडीचा पर्दाफाश करायचाच होता, तर त्याने आॅफरचे चुपचाप शूटिंग करून घेतले असते, बोलणे टेप केले असते आणि हा सगळा प्रकार भाजपाने केल्याचे सांगून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती तर भाजपावर खापर फुटले असते. राजकारणात टगेगिरी आवश्यक असते, असे अजित पवार यांनी यापूर्वी बोलून दाखविले आहे. पण ती न करता, नंतर रडारड करणारे शेंदाड शिपाई राष्ट्रवादीमध्ये पाहून आश्चर्यच वाटते. या माजी मंत्र्याने निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी रचलेली कहाणी यापलीकडे या कथनाला काय म्हणावे? अशा कहाण्या बनवायच्या आणि त्या स्वप्नरंजनात स्वत:सोबत पक्षालाही गुंतवून टाकायचे असे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. अर्थात अशा मोठ्या प्रमाणात अशा गडबडी करता येणे अशक्य आहे, असे स्वत: शरद पवार यांनीच त्या माजी मंत्र्याला सुनावले, हे बरेच झाले. आता त्याने आपली ही लल्लूगिरी बंद करावी आणि खरेच असे काही झाले असेल तर त्याच्या मुळाशी जावे, याच्या कायदेशीर बाबी तपासाव्यात. गरज पडली तर न्यायालयात जावे. पण हे असले स्वप्नरंजन थांबवावे.