काश्मीर पुन्हा पेटलं तर जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:00 AM2018-04-22T01:00:49+5:302018-04-22T01:00:49+5:30

तिच्या बलात्कार आणि मृत्यूला धार्मिक रंग देऊन जो काय नंगानाच केला गेला त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. हा नंगानाच घालणाऱ्यांचा धर्म कुठला?

Who is responsible if Kashmir rebounds? | काश्मीर पुन्हा पेटलं तर जबाबदार कोण?

काश्मीर पुन्हा पेटलं तर जबाबदार कोण?

Next

डॉ. जितेंद्र आव्हाड

जम्मूमधील कठुआ येथे बालिकेवर बलात्कार झाला आणि त्यानंतर बलात्काराच्या विकृत कृत्याचे समर्थन करायला एक विकृत टोळके बाहेर पडले. बलात्कार करणाऱ्यांनी केलेल्या विकृत कृत्याच्या समर्थनार्थ उतरणाºयांचे रंग, रूप बघितले की घृणा वाटायला लागते. तिच्या बलात्कार आणि मृत्यूला धार्मिक रंग देऊन जो काय नंगानाच केला गेला त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. हा नंगानाच घालणाऱ्यांचा धर्म कुठला? वसुधैव कुटुंबकम् म्हणणारा माझा धर्म, सहिष्णुतेची सांगड घालणारा माझा धर्म, दुसºया धर्माचा सन्मान करणारा माझा धर्म, प्रेम आणि सहजीवन यावर विश्वास ठेवणारा माझा धर्म.
स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणारे, पण मनातून मनुवादी असणारे हिंदूंना बदनाम करत आहेत. आम्हांला अभिमान तर त्या हिंदूंचा आहे ज्यांनी त्या बालिकेला न्याय देण्यासाठी विरोध होत असतानादेखील पावले टाकली. तिच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहिलेले अ‍ॅडीशनल डायरेक्टर जनरल आॅफ पोलीस आलोकपुरी, कोर्टामध्ये पी.आय.एल. दाखल करून या प्रकरणाला हाताच्या बाहेर जाऊ न देणाºया वकील दीपिका सिंग राजावत, तपास सीबीआयकडे द्या अशी मागणी होत असताना आम्हीच याचा तपास करू आणि न्याय देऊ असे सांगणारे डायरेक्टर आॅफ जनरल एस.पी. वैध आणि ९० दिवसांचा अवधी असताना १० दिवसांत चार्जशीट कोर्टात टाकणारे व सत्य जगासमोर आणणारे सिनीयर सुप्रीटेंडंट आॅफ पोलीस एस.एस. झल्ला.
भारतामध्ये जात, धर्म वगळून लोकांना न्याय देण्याची परंपराच आहे. मग कठुआ असो नाहीतर उन्नाव. जिथे-जिथे अत्याचार आहे, तिथे-तिथे भारतीय एक होतात जात-धर्म विसरून हा भारताचा जाज्वल्य इतिहास आहे. इतिहासाचा विद्यार्थी असल्याने काल थोडा खोलात गेलो आणि जी माहिती बाहेर पडली ती सगळ्यांनीच जाणून घेण्याची गरज आहे. काश्मीरमधल्या ज्या बकरवाल समाजामधील ती होती, त्या बकरवाल समाजाला गुज्जर बकरवाल या नावानेही ओळखले जाते. काश्मीरमध्ये हे लोक सुन्नी मुस्लीम असून ते भटक्या जमातीत मोडतात. त्यांच्या भाषेचे नाव गोजरी. उर्दू आणि पश्तून या दोन भाषांच्या संगमातून ती तयार झाली. हाझकी काद्री या बकरवाल या समाजातल्याच एका इतिहासकाराने लिहिलेल्या माहितीनुसार, बकरवाल याचा सरळ अर्थ बकºया (शेळ्या, मेंढ्या) पाळणारे. मध्य पूर्वेतून तुर्कस्तान भागातून हे लोक इसवी सनापूर्वीच भटकत भारतात आले. त्यातले अनेक आजही अफगाणिस्तानच्या नुरीस्तान प्रांतात, पाकिस्तानातही स्थायिक झालेले आहेत.
सहाव्या शतकात ते पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा अनेक भागांमध्ये पसरले. पण त्यांची बहुसंख्य वस्ती ही जम्मू आणि काश्मीरमध्येच आहे. उन्हाळ्याच्या मोसमात काश्मीर खोºयात शेळ्या-मेंढ्या, घोडे यांची पैदास करून थंडीच्या दिवसात हे लोक जम्मूच्या पठारावरती येतात आणि तिथे आपली जनावरे विकतात. यांच्या गुज्जर बकरवाल यातल्या गुज्जर शब्दाला एक छान अर्थ आहे. गुज्ज याचा अर्थ शत्रू आणि उज्जर याचा अर्थ नाश करणारा. शत्रूंचा नाश करणारा तो गुज्जर. भटकी जमात असल्यामुळे कित्येक शतके त्यांना आपले आणि आपल्या पशुधनाचे संरक्षण स्वत:च करावे लागले. डाकू, लुटारू, दरोडेखोर यांच्याशी लढण्याचा दांडगा अनुभव याच बकरवाल समाजाकडे आहे. म्हणूनच स्वत: ते कधी आक्र मक नसले तरी आपल्याला त्रास देणाºयाला ते योग्य पद्धतीने रोखू शकतात. ते भारतात जिथे जिथे गेले तिथे तिथे तिथली संस्कृती, राहणीमान, भाषा आणि धर्म त्यांनी स्वीकारले; म्हणूनच काश्मिरात, तिथे मुस्लीम बहुसंख्य असल्यामुळे ते जरी मुस्लीम झाले तरी तेच गुज्जर बकरवाल पंजाबपासून खाली हिंदू झाले. अगदी आपल्या महाराष्ट्रातही गुर्जर, गुजर किंवा गुज्जर या आडनावाची माणसे जी सापडतात त्यांची नाळ कुठे ना कुठे तरी त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. कित्येकांनी शौर्य गाजवल्यामुळे राजस्थानात ते रजपूत म्हणून स्वीकारले गेले तर महाराष्ट्रात मराठा सरदार बनले, असा इतिहास मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे आणि इतिहासकार दादासाहेब भडकमकर यांनी लिहून ठेवला आहे. थोडक्यात, धर्म जरी वेगळे असले तरी गुज्जर बकरवाल हे मुळात भटक्या जमातीचे आणि समान संस्कृतीचे लोक आहेत. त्यांचे सामाजिक प्रश्न गंभीर आहेत. २००६ साली राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे आरक्षणासाठी हिंसक आंदोलन पेटले. त्याच वेळेला जम्मू-काश्मीरमधल्या बकरवाल समाजानेसुद्धा आरक्षणाची मागणी केली हे नोंद घेण्यासारखे आहे. कारण हिंदू किंवा मुस्लीम असे धर्म जरी वेगळे असले तरी समाज आणि त्याच्या समस्या सारख्याच आहेत. पण काश्मीरमधल्या त्यांच्या मागणीला हिंसक स्वरूप मात्र कधीही आले नाही हेही लक्षात घ्या. २००९ साली जम्मू काश्मीर सरकारने त्यांना भटक्या आणि विमुक्त जमातीचा दर्जा दिला आणि आरक्षण लागू केले. परंतु काश्मीर खोरे आणि जम्मू हा ३०० किमीचा प्रवास दरवर्षी आपल्या शेळ्या, मेंढ्यांसह करावा लागत असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अजूनही वाईट अवस्था आहे. अगदी अलीकडे मेहबूबा मुफ्ती यांनी एक चांगले पाऊल उचलून बकरवाल्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ‘फिरत्या शाळा’ सुरू केल्या आणि त्यांना या समाजाकडून सुंदर प्रतिसाद मिळाला.
कित्येक शतके हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला. पण मुळातच जिथे जाऊ तीच आपली भूमी हे मानून त्या मातीशी समरस होण्याचा त्यांचा स्वभावधर्म असल्यामुळे मग ते हिंदू गुज्जर असोत की, काश्मीरमधले बकरवाल. या देशाशी अत्यंत इमानी राहिलेले आहेत. श्रीनगरच्या सुशिक्षित घरांमधली मुले दहशतवादी बनत असताना बकरवाल समाजातून मात्र एकही दहशदवादी आजपर्यंत तयार झालेला नाही ही गोष्ट मठ्ठ भाजपावाल्यांनी लक्षात घ्यावी. भारतीय लष्कराला वेळोवेळी सर्व तºहेची मदत करणे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करणे हे त्यांच्या रक्तातच आहे असे काश्मीरमध्ये काम करून आलेले अनेक लष्करी अधिकारी प्रामाणिकपणे सांगतात. १९९९च्या कारगील युद्धावेळी, स्थानिक जनतेच्या पोशाखात पाकिस्तानी सैनिक कारगीलमध्ये घुसखोरी करीत आहेत ही अत्यंत संवेदनशील माहिती बकरवाल समाजाने भारतीय लष्कराला दिली होती. त्यानंतर कारगील युद्ध झाले आणि भारताने त्यात विजय मिळवला. आजही आपल्या सैनिकांना अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये रसद पोहोचविण्याचे काम बकरवालच करीत असतात.
पण जी माहिती बकरवालांसारख्या मेंढपाळांनी दिली, ती माहिती भारतीय लष्कराच्या गुप्तहेर यंत्रणांना मिळाली नाही, यामुळे वाजपेयी सरकारची किती नाचक्की झाली होती हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच. बकरवालांची चाणाक्ष नजर आणि त्यांनी भारतीय मातीशी राखलेले इमान हे दोन्हीही पचविणे भाजपाला अजूनही अवघड जात आहे.
अशा बकरवाल समाजातल्या एका निष्पाप मुलीची विटंबना केली गेली. ती केवळ तिची विटंबना नव्हती तर ती देवळाचीही विटंबना होती. अत्यंत शांतपणे आपले परंपरागत आयुष्य भारताशी निष्ठा राखून जगणारा बकरवाल समाज जर आता यामुळे बिथरला तर ती जबाबदारी भाजपा सरकार घेणार आहे का?
कठुआ प्रकरणातील बलात्काºयांना आणि खुन्यांना समर्थन देणारे जम्मू-काश्मीरमधले दोन मंत्री काल मंत्रिमंडळातून राजीनामा देते झाले आहेत. जनतेमध्ये उसळलेला प्रक्षोभ आणि त्याचे चटके असह्य झाल्यामुळे प्रधान सेवकांना या मंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश द्यावा लागला. पोलिसांना अडविणाºया वकिलांच्या संघटनांना सुप्रीम कोर्टाने नोटिसा धाडल्या आहेत. एखादा समाज किंवा धर्म यांना आवडत नाही म्हणून हे मनमानी करणार आणि राष्ट्र जोडायच्या ऐवजी ते तोडायचे उद्योग हे मनुवादी विचारसरणीचेच लोक करू शकतात. गुन्हेगारांना पाठीशी घालायचे उद्योग प्रधान सेवकांच्या चेल्यांनी केले. त्याचा फायदा काश्मीरमधल्या दहशदवादी संघटना नक्कीच घेणार. काश्मीर जर पुन्हा एकदा पेटले आणि आता बकरवाल समाजही हिंसाचारात सामील झाला तर त्याची १०० टक्के जबाबदारी कोणावर?


टिप - बलात्काऱ्यांना जात नसते, धर्म नसतो, त्यांच्या अंगात असते फक्त विकृती; आणि विकृतीचे समर्थन करणे हे फक्त विकृतालाच जमू शकते. बाब कठुआची असो वा उन्नावची पोरगी ही आपल्याच पोटची आहे हे विसरता कामा नये.

Web Title: Who is responsible if Kashmir rebounds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.