एकट्या बाईने लग्न(च) केले पाहिजे, असे कुणी म्हटले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:44 AM2022-01-08T06:44:42+5:302022-01-08T06:44:52+5:30
कोरोना महामारीत जोडीदार गमावलेल्या विधवा स्त्रियांना रोजगार मिळावा, हेच आमचे मुख्य काम आहे, सहजीवनाचा मुद्दा अनुषंगिक; पण महत्त्वाचा आहे!
- हेरंब कुलकर्णी, निमंत्रक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र
‘एकट्या बाईला लग्न(च) सुरक्षितता देते का?’ हा नीरजा पटवर्धन यांचा लेख (लोकमत, ४ जानेवारी) वाचला. ‘कोरोना विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळावा म्हणून’ (लोकमत, ३१ डिसेंबर) या मी लिहिलेल्या लेखावरची ही प्रतिक्रिया असल्याने त्याबाबत काही स्पष्टीकरणे देणे मला गरजेचे वाटते.
१. कोणत्याही विषयावर चर्चा ही स्वागतार्हच असते; पण नीरजा पटवर्धन यांनी ‘विवाह हे उदरनिर्वाहाचे साधन आहे का, सुरक्षितता आहे का, पुरुषाचे उपकार आहेत का?’ असे मूळ मांडणीत नसलेले मुद्दे लादून टीका केली आहे.
२. विवाहापेक्षा स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे असा त्यांनी दिलेला सल्ला आमच्या चळवळीलाही मान्यच आहे. आम्ही फक्त कोरोनाच्या महामारीत जोडीदार गमावल्याने विधवा झालेल्या स्त्रियांच्या रोजगार विषयावरच मुख्यत: काम करतो आहोत. उपमुख्यमंत्री, विविध संबंधित खात्यांचे मंत्री, सचिव, अधिकारी यांच्याशी सातत्याने बैठका घेऊन या महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करतो आहोत.
३. या महिलांचे सहा दिवसांचे रोजगार प्रशिक्षणही आम्ही घेतले. त्यांना मालमत्तेचे हक्क मिळावेत यासाठीही पाठपुरावा करून आदेश काढला व वेगवेगळ्या CSR शी रोजगारनिर्मितीसाठी बोलतो आहोत.
४. मात्र हे सारे करताना आमच्या असे लक्षात आले की, तरुण वयातील अनेक एकल महिलांना पुन्हा सहजीवनाची सुरुवात करावीशी वाटते; परंतु कुटुंब, जाती व्यवस्था व मानसिकतेमध्ये त्यांना विरोध होतो आहे. अशा इच्छुक महिलांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या विवाहाला प्रोत्साहन देऊ इतकी मर्यादित भूमिका आम्ही घेतली आहे.
५. आमच्या संघटनेचे मुख्य मध्यवर्ती काम हे कोरोना-एकल महिलांसाठी रोजगारनिर्मितीचे आहे. फक्त विधवांचे लग्न लावण्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे ही मांडणी आमच्या कामाविषयी गैरसमज निर्माण करणारी आहे.
६. अजूनही ग्रामीण भागात स्त्रीसाठी लग्न ही सुरक्षितता ठरते, हे कटू असले तरी वास्तव आहे व पुरुषप्रधान व्यवस्थेची काळी बाजू आहे इतके स्पष्ट विधान माझ्या लेखात आहे. मजुरीला जाणारी विवाहित स्त्री व विधवा स्त्री या दोघींशी मुकादम, ठेकेदार, काम देणारे मालक कसे वागतात ते अनुभव शहरी सुबुद्ध स्त्रियांनी एकदा समजावून घ्यावेत. विधवा स्त्रीचे परिसरातून सोडाच; कुटुंबातीलही अनेक जण शोषण करतात. त्यातल्या त्यात विवाहाच्या व्यवस्थेत तिला काही प्रमाणात सुरक्षितता मिळू शकते.
७. अशा एकल महिलांशी लग्न करायला पुढे येणारे, अशा स्त्रियांना त्यांच्या मुलांसह स्वीकारणारे पुरुष ‘तारणहार’ आहेत, असे मी कुठेही म्हटलेले नाही. महिलेच्या मुलांसह लग्न केले पाहिजे, पुरुष ते करीत नाहीत असाच मुद्दा मीही मांडलेला आहे.
८. विधवा या शब्दाच्या वापरावरूनही टीका केली आहे. आमच्या समितीचे नावच ‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ असे आहे; पण विधवांचा प्रश्न मांडताना स्त्रीच्या या अवस्थेबाबतचे सर्व पैलू व्यक्त होतील असा जवळचा शब्द दुसरा दिसत नाही. एकल शब्दात ते येत नाही.
९. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील १०० तालुक्यांत कोणतीही आर्थिक मदत न मागता, न घेता पदरमोड करून शेकडो कार्यकर्ते या महिलांच्या पुनर्वसनासाठी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. या विधवांच्या जगण्यातील सर्व पैलूंना स्पर्श करताना त्यातला एक छोटा मुद्दा पुन्हा नव्याने सहजीवन सुरू करण्याच्या शक्यतेचा आहे. हे समजावून न घेता, आम्हाला स्त्रीविरोधी पुरुषवादी ठरवायचे हे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निराश करणारे आहे.