उद्याच्या फायनलमध्ये कोणाला चान्स द्यावा? क्रिकेट एपवर बेटिंग...अशी आहे कायद्याची सेटिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 12:08 PM2023-05-27T12:08:23+5:302023-05-27T12:20:20+5:30

मॅच सुरू होण्याआधी टीम निवडायची. आपण निवडलेले खेळाडूच प्रत्यक्ष टीममध्येही खेळले आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला, तर तुम्ही मालामाल!

Who should be given a chance in tomorrow's final? cricket betting apps name of fantacy | उद्याच्या फायनलमध्ये कोणाला चान्स द्यावा? क्रिकेट एपवर बेटिंग...अशी आहे कायद्याची सेटिंग...

उद्याच्या फायनलमध्ये कोणाला चान्स द्यावा? क्रिकेट एपवर बेटिंग...अशी आहे कायद्याची सेटिंग...

googlenewsNext

-प्रसाद शिरगावकर, मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षक आणि वक्ते

‘अरे यार, आज परत राहुलला घेतलं, गिलला चान्स द्यायला पाहिजे होता’ किंवा ‘बघ मी बोलत होतो जडेजाला घेतलं पाहिजे बॉलिंगसाठी, तीन विकेट घेतल्या त्याने!’, प्रत्येक क्रिकेटप्रेमी माणसानं ही किंवा अशी वाक्यं आयुष्यात कधीतरी ऐकली किंवा उच्चारली असतील नक्कीच! क्रिकेट हा आपण लांबून बघत असलेला जरी खेळ असला, तरी तो अत्यंत पॅशनने अनुभवला जाणारा आणि आपणच त्यात आहोत, असं मानून जगला जाणारा खेळ आहे भारतात. 

आपण भारतीय लोक क्रिकेटसाठी इतके वेडे आहोत की, ‘टीममध्ये अमुक अमुक लोकांना घ्यायला पाहिजे होतं,’ या प्रत्येक क्रिकेटप्रेमी माणसाच्या मनात असलेल्या इच्छेची सुमारे ७ हजार कोटी रुपयांची बाजारपेठ आज झालेली आहे. या बाजारपेठेचं नाव आहे ‘फॅन्टसी स्पोर्ट्स’. गेली काही वर्षं क्रिकेटच्या मॅचेस, त्यातही विशेषतः आयपीएल बघताना आपण ‘ड्रीम इलेव्हन’च्या जाहिराती बघितल्या असतील. ड्रीम इलेव्हन ही भारतातली आघाडीची फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी आहे. ड्रीम इलेव्हन सारख्याच My11Circle, Fanwall, Mobile Premier League अशा सुमारे तीनेकशे ॲप्स किंवा वेबसाइट्सवर आजमितीस फॅन्टसी स्पोर्ट्स खेळलं जातं.

फॅन्टसी स्पोर्ट्स खेळण्याची कल्पना तशी साधी सरळ आहे. एखाद्या खऱ्या क्रिकेट मॅचच्या दिवशी ती मॅच खेळणाऱ्या संघांमध्ये कोणते खेळाडू असावेत, हे आपण मॅच सुरू व्हायच्या आधी निवडून ठेवायचं. आपण निवडलेले खेळाडू त्या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स करतील, त्यानुसार आपल्याला पॉइंट्स मिळतात. सर्वात जास्त पॉइंट्स मिळालेला माणूस फॅन्टसी स्पोर्ट्सची ती मॅच जिंकतो. यामध्ये आपण खेळाचा, मैदानाचा, परिस्थितीचा नीट अभ्यास करून, खेळाडूंच्या मागील कामगिरीचे विश्लेषण करून टीम निवडणे हा कौशल्याचा भाग असतो. आपण निवडलेल्या टीममधील सर्व किंवा बहुसंख्य खेळाडू त्या दिवशीच्या प्रत्यक्ष संघात निवडली जाणं, हा खरं तर काहीसा नशिबाचा भाग असतो आणि निवडलेल्या खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स करणं, हेही आपल्या हाताबाहेर असतं. थोडक्यात, काहीसं कौशल्य, काहीसा अभ्यास आणि बरेचसे योगायोग यांच्या आधाराने खेळला जाणारा खेळ म्हणजे फॅन्टसी स्पोर्ट्स.

भारतामध्ये खेळावरील सट्टेबाजी बेकायदेशीर आहे. असं असताना फॅन्टसी स्पोर्ट्सना भारतात परवानगी कशी, असा प्रश्न पडू शकतो. कुठल्याही खेळाच्या निकालाविषयी पैज लावणं ही सट्टेबाजी समजली जाते. उदा.अमुक टीम जिंकेल की हरेल, यावर काही पैसे लावणे ही सट्टेबाजी समजली जाते आणि त्याला भारतात बंदी आहे. मात्र, फॅन्टसी स्पोर्ट्सनी ‘निकालावर पैसे लावणे’ हा प्रकार न करता, ‘मॅचसाठी टीम निवडणे’ या कौशल्यावर जोर दिला आहे. निवडलेल्या टीमपैकी जे लोक प्रत्यक्षात चांगलं खेळतील. त्यानुसार, फॅन्टसी स्पोर्ट्स खेळणाऱ्यांना पॉइंट्स मिळतात आणि पॉइंट्सनुसार त्यांना पैसे मिळतात. भारतीय कायद्यानुसार, याला ‘गेम ऑफ चान्स’ न म्हणता, ‘गेम ऑफ स्किल’ असं म्हणतात, म्हणून ही सट्टेबाजी धरली जात नाही.

फॅन्टसी स्पोर्ट्समध्ये भाग घेणं हे खूप सोपं आणि सहजसाध्य आहे. ज्या कुठल्या फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, त्यांचं ॲप डाऊनलोड करणं आणि त्या-त्या दिवशीची मॅच सुरू होण्याआधी आपली टीम बनवणं, एवढंच त्यासाठी करावं लागतं. त्या खेळात बक्षीसं जिंकायची असतील, तर थोडं शुल्क भरावं लागतं. ते शुल्कही अगदी ५०-१०० रुपये इतकं नगण्य वाटणारं असतं. यामुळे ‘आपल्याला क्रिकेटमधलं खरोखर खूप काही कळतं’ असं वाटणाऱ्या लोकांना यात भाग घेणं अगदी सहज जमू शकतं. फॅन्टसी स्पोर्ट्समध्ये बक्षिसांची भरपूर खिरापत वाटली जाते. सगळ्यात मोठं बक्षीस तर एक-दीड कोटी रुपये इतकंही असतं. 

आपल्या खेळाविषयीच्या ज्ञानाचा वापर करून आणि फक्त पन्नास-शंभर रुपये भरून, आपण एक दीड कोटी रुपये कमावू शकू, या आशेवर अक्षरशः कोट्यवधी लोक हा खेळ खेळू लागले आहेत. यातले जे मूठभर लोक खरोखर एक-दीड कोटी रुपये जिंकतात, त्यांची उदाहरणं दाखवून आणि त्याच्या जाहिराती करून, अधिकाधिक लोकांना हा खेळ खेळायला प्रवृत्त केलं जात आहे. या साऱ्यामुळे फॅन्टसी स्पोर्ट्स ही भारतातली सगळ्यात वेगाने वाढणारी बाजारपेठ बनली आहे. आजमितीस सुमारे १८ कोटी लोक फॅन्टसी स्पोर्ट्स खेळतात आणि पुढील पाच वर्षांमध्ये ही बाजारपेठ सुमारे २५,००० कोटी रुपयांची होण्याची शक्यता आहे. मात्र, फॅन्टसी स्पोर्ट्सच्या बाबतीत अनेक धोकेही आहेत. सगळ्यांत महत्त्वाचा धोका म्हणजे, घरबसल्या पैसे कमावण्याचा सोपा उपाय म्हणून याकडे बघितलं जाऊ शकतं. याची सवय अथवा व्यसन लागू शकतं. याशिवाय, फॅन्टसी स्पोर्ट्समध्ये आपण किती पैसे लावू शकतो, यावर जिथे मर्यादा नसते. तिथे अनन्वित आर्थिक नुकसानही होऊ शकतं. आर्थिक नुकसान होत राहूनही भलामोठा जॅकपॉट आपल्याला लागेल, या आशेवर माणसं पैसे खर्च करत राहू शकतात. फॅन्टसी स्पोर्ट्सना नियमित आणि नियंत्रित करणारे कायदे अद्याप नाहीत, ही दुसरी मोठी धोक्याची बाजू आहे. कोट्यवधी लोक हजारो कोटी रुपये जेथे उधळत आहेत, तेथे लवकरात लवकर कायदेशीर चौकट लावणं गरजेचं आहे. ते होत नाही, तोवर सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनी अशा गेम्समध्ये जरा जपून आणि सारासार विचार न सोडता भाग घ्यावा, असं सुचवावंसं वाटतं.
prasad@aadii.net

Web Title: Who should be given a chance in tomorrow's final? cricket betting apps name of fantacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.