भाजपातील ‘त्यागी’ कोण?
By किरण अग्रवाल | Published: November 2, 2017 07:27 AM2017-11-02T07:27:42+5:302017-11-02T07:28:05+5:30
भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचविणारे सत्तेबाहेर आहेत, पक्षातील निष्ठावानांना कोणीही विचारत नसल्याने ते अडगळीत पडले आहेत; हे जे काही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे ते खरे असेलही.
भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचविणारे सत्तेबाहेर आहेत, पक्षातील निष्ठावानांना कोणीही विचारत नसल्याने ते अडगळीत पडले आहेत; हे जे काही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे ते खरे असेलही. त्यातून राज्यातील भाजपा सरकारचे तीन वर्षांचे प्रगतीपुस्तक तपासले जात असताना खर्या त्यागींचे काय, असा प्रश्नदेखील नक्कीच उपस्थित करता येणारा आहे, परंतु तो करताना ‘त्यागा’ची व्याख्या वा संकल्पनेची स्पष्टता होऊन गेली असती तर अधिक बरे झाले असते, कारण त्याखेरीज सत्ता अगर संघटनेच्या कसल्याही लाभापासून वंचित राहिलेल्या व सारे काही मिळून, उपभोगूनही स्वत:ची गणना त्यागींच्या यादीत करू पाहणार्यामध्ये भेद करता येणे शक्य नाही.
पुण्यातील भोसरी येथील जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण पुढे आल्यानंतर भाजपा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांना घरी बसणे भाग पडले आहे. सदर प्रकरणाच्या व आरोपाच्या निमित्ताने उगाच आपला बळी घेतला गेल्याची त्यांची भावना असल्याने तेव्हापासून संधी मिळेल तिथे खडसे यासंबंधीची मळमळ व्यक्त करीत स्वपक्षालाच ‘घरचे अहेर’ देताना दिसून येतात. याच मालिकेत धुळे येथील एका कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या पुढ्यात बोलतानाही त्यांनी भाजपातील निष्ठावानांप्रतीची आपली ‘तळमळ’ बोलून दाखविली. यावेळळी पक्षासोबत येऊ घघातलेल्या नारायण राणे यांना ‘त्यागी’ संबोधत भाजपातील त्यागींकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे खडसे यांनी लक्ष वेधलेच, शिवाय आपल्यासारख्या व आणीबाणीत यातना भोगणार्या कार्यकर्त्यांची भूमिका आता केवळ प्रशिक्षकाचीच राहणार असल्याचे सांगत स्वत:च स्वत:ला त्यागींच्या यादीत घुसवून घेण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केला. त्यामुळेच खडसे यांना अपेक्षित त्यागाची व्याख्या स्पष्ट होणे गरजेचे ठरून गेले आहे.
खडसे जे काही म्हणाले ते खरे असेलही, नव्हे आहेदेखील. विशेषत: राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे प्रगतीपुस्तक पाहिले जात असताना आणि राज्यातील विकास कुठे नेऊन ठेवल्याचा हिशेब मांडला जात असताना सत्ताधारी पक्षाशी संबंधित ही भळभळणारी जखम पुढे आणली गेल्याने त्याकडेही गांभीर्याने बघितले जायलाच हवे. परंतु मुद्दा व प्रश्न आहे तो, पक्षासाठी त्याग करून आजच्या पक्षाच्याच ‘अच्छे दिन’च्या काळात संधीपासून वंचित राहिलेल्यांना त्यागी मानायचे की सारे काही मिळवून आज काही कारणाने बाजूला ठेवले गेलेल्यांना? खडसे हे या विषयाचे कारक ठरले असले तरी ते स्वत: यातील दुसर्या प्रवर्गात मोडणारे आहेत हे येथे आवर्जून लक्षात घ्यायला हवे. खडसे यांनी भाजपासाठी खस्ता खाल्या वगैरे सारे खरे मानता येईल, त्यापोटी त्यांना पूर्वीच्या युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. तद्नंतर विरोधी पक्षनेतेपद त्यांना देण्यात आले. शिवाय विद्यमान सरकारच्या प्रारंभीच्या काळातही त्यांना महत्त्वाचे खाते दिले गेले होते. याहीखेरीज स्नुषेच्या निमित्ताने खासदारकी व पत्नीच्या निमित्ताने महानंदचे अध्यक्षपद त्यांच्याच घरात आहे. जिल्हा बँकेपासून अन्य संस्थाही तशा त्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत. हे सारे तसे त्यांना भरभरून मिळाल्याची पावती देणारे आहे. त्यामुळे आज गैरव्यवहाराच्या कारणामुळे त्यांना बाजूला ठेवावे लागले असेल तर ते त्यांच्या त्यागाच्या संकल्पनेत मोडावे का, हा यातील खरा प्रश्न आहे. खडसेंच्याच जिल्ह्यातील गुणवंत सरोदे हे एक नेते आहेत, जे आमदार व खासदारही राहिले, परंतु आज बाजूला पडल्यासारखे आहेत. लगतच्या नाशिक जिल्ह्यातील प्रतापराव सोनवणे आहेत, तेही आमदार व खासदार राहिले पण आज पक्षात कुणी विचारेनासे झाले आहेत. पण या दोघांच्याही प्रकृतीच्या कारणाने त्यांची ही अवस्था ओढवली आहे. खडसेंचे तसे नाही. मग त्यागी म्हणायचे कुणाला?
विशेष म्हणजे, खडसे हे भाजपात ज्येष्ठ असले तरी मुळात तसे काँग्रेसमधून आलेले आहेत. परंतु अभाविप या विद्यार्थी संघटनेपासून ते पक्षाची मातृसंस्था म्हणविणाºया संघ व जनसंघापासून भाजपाशी निष्ठेने नाळ जोडून असलेले अनेकजण नक्कीच आहेत की, जे भाजपाच्या आजच्या सत्ताकाळात संधीपासून दूर आहेत. त्यांची दखल ना पक्ष संघटनेत घेतली जाताना दिसते ना सत्तेत. जळगावचे गजानन जोशी, मालेगावचे प्रल्हाद शर्मा, नाशिकचे रामभाऊ जानोरकर, किसनराव विधाते, परशुराम दळवी, ताई कुलकर्णी, अकोल्यातील बंडू पंचभाई अशी अन्य ठिकाणचीही अनेक नावे देता येणारी आहेत की, ज्यांनी खरेच पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासाठी मोठे योगदान दिले. पण आज कुठे आहेत ते, असा प्रश्नच पडावा. खडसे यांच्या जळगाव शेजारील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार अनिल गोटे आदी नेते अलीकडच्या काळात भाजपात आले आणि संधी घेते झाले. पण डॉ. सुहास नटावदकर सारखे लोक आजही आहे तेथेच राहिल्याचे दिसून येतात. अर्थात पक्षासाठी लढलेली व आज सत्ताकाळात घरात बसून असलेली ही मंडळी स्वत:ला त्यागी म्हणून घेत नाही. आपण सत्तेपासून वंचित असल्याचे दु:खही त्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. पण अशांकडे भाजपाचे दुर्लक्ष झाले आहे किंवा ते अडगळीत पडल्यासारखी त्यांच्या समर्थकांची भावना आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी धुळे येथे बोलताना जी भावना व्यक्त केली ती सत्य असली तरी त्यातील पूर्ण व अर्धसत्य काय, हे त्यागाची व्याख्या स्पष्ट झाल्याखेरीज समजता येऊ नये.