दंगल कुणाला हवी होती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 04:10 AM2018-05-15T04:10:55+5:302018-05-15T04:10:55+5:30

भीष्म सहानींच्या ‘तमस’ या प्रसिद्ध कादंबरीत एक वाक्य आहे. ‘हर दंगे की वजह होती है’ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी दंगलीची आणि ती आठवण्याचे कारण औरंगाबाद येथे अचानक उसळलेली दंगल.

Who wanted a riot? | दंगल कुणाला हवी होती?

दंगल कुणाला हवी होती?

Next

भीष्म सहानींच्या ‘तमस’ या प्रसिद्ध कादंबरीत एक वाक्य आहे. ‘हर दंगे की वजह होती है’ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी दंगलीची आणि ती आठवण्याचे कारण औरंगाबाद येथे अचानक उसळलेली दंगल. रात्री उशिरा अचानक दंगल उसळते, दोन जणांचा बळी जातो. जाळपोळीत स्थावर मालमत्तांचे प्रचंड नुकसान होते आणि हे सर्व घडते शहराच्या मध्यवर्ती भागात. विशेष म्हणजे चार-पाच गल्ल्या सोडल्या, तर दंगलीचे पडसाद शहरात कुठेही उमटले नाहीत. दंगल औरंगाबादसाठी नवीन नाही. किंबहुना दंगलीच्या इतिहासामुळेच हे शहर संवेदनशील आहे. शहराला दंगलीचा मोठा इतिहास आहे. तसा मोसमही ठरलेला. जसा पावसाळ्यात पाऊस पडतो, तशा निवडणुकांच्या वर्षभर अगोदर येथे तणावाच्या छुटपूट घटना घडत असतात. वातावरण तापत मतांचे ध्रुवीकरण होते आणि पुढे सारे आलबेल असते, अशी पार्श्वभूमी असताना या दंगलीचे कवित्व तपासताना एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली ती अशी की, पोलिसांचा नाकर्तेपणा. त्यांना दंगल हाताळता आली नाही हे खुद्द अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांनीच कबूल केले. शुक्रवारी रात्री १२ ते ३ या काळात जाळपोळ, दगडफेक चालू होती. तरुणांची टोळकी मुक्तपणे फिरत असताना पोलिसांनी अटकाव केला नाही. दंगलीचे स्वरूप पाहता ती पूर्वनियोजित होती, असेच दिसते. म्हणजे शहरातील वातावरण बिघडत आहे, याकडे गुप्तचर यंत्रणेचे लक्ष नसावे किंवा त्याकडे डोळेझाक केली असावी. कारण आठवडाभर अगोदर घडलेल्या घटनाही पोलिसांनी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. संवेदनशील शहर असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून येथील पोलीस आयुक्तपद रिक्त आहे. शिवसेना यासाठी भाजपला जबाबदार ठरवते; पण हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत आणि सेनेनेसुद्धा पोलीस आयुक्त तातडीने द्या, अशी मागणी केली नव्हती. भाडेकरूंची घरे, दुकाने या दंगलीत लक्ष्य झालेली दिसतात. याचाच अर्थ भूखंडाचेही अर्थकारण असल्याचे दिसते. हे काही असले तरी सरकारने या शहराचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. पावणेतीन महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे; परंतु दोन महिन्यांपासून महापालिकेला आयुक्त नाही. पोलीस आयुक्त नाही. जिल्हाधिकारी नवे आहेत. विशेष म्हणजे दंगलीनंतर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप नाट्य सुरू झाले. त्यापैकी एकानेही वरील पदांवर अधिकारी नेमण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, की कचरा, पाण्याचा प्रश्न सोडविण्याची तसदी घेतली नाही. शहराचे वातावरण दूषित झाले. हे कोरेगाव-भीमा किंवा कचºयाच्या प्रश्नावर. मिटमिटा येथे झालेल्या उद्रेकावरूनच लक्षात आले होते. तरीही या घटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच छोट्या घटना नजरेआड केल्या. वास्तविक अशा घटना भविष्यात काय घडणार याचे संकेत मिळत असतात. या घडामोडी किंवा त्या दिवशी रात्री जाळपोळ चालू असताना घेतलेली बघ्याची भूमिकासुद्धा तेवढीच जबाबदार आहे. याला नागरी प्रश्नही कारणीभूत आहेत. कचºयाचा गंभीर प्रश्न अजून सुटला नाही. तोच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हे दोन प्रश्न सोडविण्याऐवजी शहरातील हातगाड्यांचा प्रश्न पुढे करण्यात आला. आपल्यासमोर दोन गंभीर प्रश्न आहेत, ते सुटत नाहीत, असे असताना हातगाड्यांचा प्रश्न उकरून काढणे यामागे निश्चित कारण दिसते. कारण यावरून तणाव निर्माण होणे निश्चित होते. या घटनांची साखळी जोडण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच यामागचा हेतू स्पष्ट होईल. दंगलीच्या मागे कोणतेही राजकारण असो; पण त्यामुळे या शहराची प्रतिमा मलीन झाली आहे आणि त्याचा परिणाम विकासावर होईल. व्यापार उद्योगांना फटका बसणार हे निश्चित आहे. दंगल पूर्वनियोजित होती, असे आरोप दोन्ही गट करतात; परंतु दंगलीचे कारण काय होते हे नेमके कुणी सांगत नाही. तेच शोधण्याचे आव्हान आहे. ही दंगल तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना नकोच होती, मग ती कुणाला हवी होती?

Web Title: Who wanted a riot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.