मेट्रो, मोनोमुळे मुंबई कोणाची राहील?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:03 PM2018-10-15T21:03:38+5:302018-10-15T21:03:56+5:30
मेट्रो, मोनो स्थानकांजवळ उत्तुंग इमारतींना परवानगी देण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
- विनायक पात्रुडकर
मेट्रो, मोनो स्थानकांजवळ उत्तुंग इमारतींना परवानगी देण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. घर आणि कार्यालयाजवळ सार्वजनिक वाहतूक या उपक्रमांतर्गत हा विचार सुरू आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या, वाहने यांचे नियोजन करण्यासाठी असा विचार होणे आवश्यकच आहे. हा विचार प्रत्यक्षात अंमलात आणताना अडचणींचा डोंगर समोर असून, आधी त्याचा आढावा प्रशासनाने घ्यायला हवा. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या सर्वोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे मेट्रो, मोनो स्थानकाजवळ उत्तुंग इमारती उभ्या राहिल्यानंतर हा प्रश्न सुटेल, याची शाश्वती कोणालाच देता येणार नाही. मुळात मुंबईत घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्या भविष्यातही वाढतच राहणार आहेत. एखादे नवीन रेल्वे स्थानक होणार असेल, तर त्या विभागातील घरांच्या, जमिनींच्या किमती चौपटीने वाढतात. असे असेल तर मोनो, मेट्रो स्थानकाजवळील घरांच्या किमती नक्कीच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतील. कार्यालयांच्या किमतीही गगनाला भिडतील, हे स्वतंत्र सांगायला नको. त्यातूनही मेट्रो, मोनोजवळ कोणती कार्यालये असतील, तेथील अधिकारी, कर्मचारी व कामगारांची गुणवत्ता काय असेल. त्यांच्यापैकी किती जण मेट्रो, मोनोचा वापर करतील, याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. अन्यथा या योजनेची अवस्थादेखील मोनोप्रमाणे होईल. म्हणजे योजना अंमलात येऊन उत्तुंग इमारती उभ्या राहतील; पण तेथील घरे व कार्यालये रिकामी राहतील. मुळात आता मोनोची जी स्थानके आहेत, तेथे जवळपास औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे तेथे निवासी इमारती उभारून काहीच उपयोग होणार नाही. येथे औद्योगिक क्षेत्र उभारणेही शक्य नाही़ मोनोचे कारशेड असलेल्या भक्ती पार्क परिसरात सध्या कोट्यवधी रुपयांचे खासगी बिल्डरांचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्यालाही हवे तसे गि-हाईक नाही. या ठिकाणी आता मेट्रोचेही कारशेड होणार आहे. त्यामुळे येथील घरांची मागणी वाढेल. आताच ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. भविष्यात तर नक्कीच येथे सर्वसामान्य राहणार नाहीत. मेट्रोच्या दुस-या स्थानकांचा विचार केला, तर तेथे झोपडपट्टी अधिक आहे. मेट्रो मार्गाला लागूनच इमारतीदेखील आहेत. तेथे नव्याने प्रकल्प उभारणे तूर्त तरी शक्य नाही. अगदी ओढूनताणून प्रकल्प उभारायचे ठरविले, तरी त्याला कितपत यश मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. तेव्हा प्रशासनाने पूर्णपणे विचार करूनच मेट्रो, मोनो स्थानकांजवळील इमारतींचा विचार करायला हवा. याआधीही घर, कार्यालय तेथे सार्वजनिक वाहतूक, असा विचार झाला होता. रेल्वे स्थानकेच चार मजली उभारायची, म्हणजे रेल्वेतून उतरल्यानंतर थेट कार्यालय, अशी योजना होती. प्रत्यक्षात ही योजना राबविताना अनेक अडचणी आल्या. परिणामी, ही योजना बारगळली. मुंबईसाठी नियोजन व्हायलाच हवे. येथे सर्वसामान्य कसा राहू शकेल, याचाही विचार व्हायलाच हवा. तरच कोणतीही योजना सफल होऊ शकेल.