दिल्लीत मंत्रिपदाच्या खुर्च्या कुणाकुणाला मिळणार?; हालचाली सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 01:21 AM2020-11-12T01:21:33+5:302020-11-12T06:59:56+5:30
काही मतभेदामुळे संयुक्त जनता दल भाजपचा जवळचा मित्रपक्ष असला तरी तो मंत्रिमंडळात नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यासाठी मार्ग मोकळा केला जात आहे. दिवाळीनंतर हा बदल केव्हाही होईल असे दिसते. गेल्या महिन्यात भाजपात पक्ष संघटनात्मक बदल झाल्यापासून मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची प्रतीक्षा आहे. पक्षाने चार सरचिटणिसांना पदावरून दूर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खांदेपालट अनेकांना धक्का देईल, असेही म्हटले जाते. पंतप्रधानांसह सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात २२ कॅबिनेट मंत्री आहेत. आजवरची ही सर्वात कमी संख्या आहे. अकाली दलाच्या हरसिमरत कौर, शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला.
रामविलास पासवान यांचे निधन झाले. या घटनांनी गुंतागुंत वाढली. काही मतभेदामुळे संयुक्त जनता दल भाजपचा जवळचा मित्रपक्ष असला तरी तो मंत्रिमंडळात नाही. आता बिहारची निवडणूक झाली असल्याने जदयूचा समावेश अटळ झाला आहे. पंतप्रधानांनी गेल्या दोन महिन्यात काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यांच्यातल्या काहीना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी बोलवा आहे. खान्देपालटाला उशीर झाल्याने नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे चार तर पीयूष गोयल यांच्याकडे तीन खाती आहेत. प्रकाश जावडेकर यांच्याकडेही तीन खाती आहेत.
पंतप्रधानांनी जहाजबांधणी मंत्रालयाची पुनर्रचना करायचे ठरवल्याने मनसुखलाल मंडविया यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ते मंत्रिमंडळातले तिसरे कॅबिनेट मंत्री असतील. सध्या ते जहाज बांधणी मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार तसेच खत आणि रसायन मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद सांभाळत आहेत.
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मे महिन्यात निवडणूक होत आहे. या राज्यातून केंद्रात एकही कॅबिनेट मंत्री नाही. बंगालमधून दोन आणि आसामातून एक राज्यमंत्री आहे. बंगालमधून एक कॅबिनेट मंत्री घ्यावा, असा प्रस्ताव आहे. मध्य प्रदेशात भाजपने चमक दाखवल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांना सन्मान मिळणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातून कोणी केंद्रात येईल का, हे मात्र कोणालाच माहीत नाही.
राजभवनात कोण कोण जाणार?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले की राज्यपालांच्या नेमणुका होण्याचीही शक्याता आहे. बऱ्याच राजभवनात राज्यपाल नाहीत. सत्यपाल मलिक यांची मेघालयात बदली झाल्याने गोव्याला राज्यपाल नाही. तथागत राय यांनी मेघालयातील राज्यपालपद सोडले. ते बंगालच्या राजकारणात परतले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशाचीही जबाबदारी देण्यात आली. तिथले राज्यपाल बल्ररामजी दास टंडन यांचे नुकतेच निधन झाले.
द्रौपदी मुरमू (झारखंड) आणि वजुभाई वाला (कर्नाटक) यांचाही कार्यकाळ संपला आहे. पुदुच्चेरीच्या किरण बेदी आणि दिल्लीचे अनिल बैजल बहिर्गमन कक्षात वाट पाहत आहेत. प्रभात झा, रेणू देवी, श्याम जाजू, अविनाश राय खन्ना यांना राज्यपाल पद मिळू शकते. उमा भारती यांचाही नंबर लागला असता; पण बहुधा त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली असावी.
आता बंगालसाठी लढाई
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालच्या झंझावाती दौऱ्यात पक्षातल्या गटबाजीचे दर्शन घडले. लोकसभा निवडणुकीत तृणमूलमध्ये पक्षाला यश मिळवून देणारे मुकुल रॉय नाराज आहेत. अमित शहा आले तेव्हा ते स्वागताला विमानतळावर न जाता बांकुरा या आपल्या क्षेत्रातच राहिले. भाजपात बरीच मंडळी अन्य पक्षातून आलेली असल्याने जुन्या निष्ठावंतांचे त्यांच्याशी जमत नाही. यामुळे बऱ्याच ठिकाणी नाराजी उफाळून आलेली दिसली. राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव समोर ठेवायचे यावरूनही धुसफूस आहे.
सौरभ गांगुली तसेच संगीत क्षेत्रातील मोठे नाव असलेले अजय चक्रवर्ती यांना अजमावण्याचा भाजपचा विचार आहे. मात्र आपलेच नाव पुढे केले जावे, अशी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांचीही अपेक्षा आहे. बाबुल सुप्रियो आणि रूपा गांगुली मागे पडले आहेत. ममताविरुद्ध दमदार चेहऱ्याचा शोध भाजपला घ्यावा लागणार आहे.